स्वयंरोजगारासाठी बँक कर्जाकरिता सहकार्य
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यातील अनुभव...
नांदेडच्या सिडको परिसरात राहणाऱ्या सौ. सुनंदा काहता यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, त्यांच्या कुटुंबावर अनेक संकटांचा डोंगर कोसळला आहे. मोठा मुलगा गेल्या आठ महिन्यांपासून घर सोडून गेला असून, त्यांचा आठ वर्षांचा लहान मुलगा मतिमंद आहे. घरात उत्पन्नाचे कोणतेही स्थिर साधन नसल्याने कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्याचबरोबर कर्जबाजारीपणामुळे अनेकांकडून त्यांना मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे.
अशा कठीण परिस्थितीत अमृत परिवार सर्वेक्षणाच्या माध्यमातून त्या कुटुंबाला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. कुटुंबाची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याचे लक्षात आल्यानंतर स्वयंरोजगाराच्या संधीतून मदतीकरिता पुढाकार घेतला.
उद्योजकतेच्या माध्यमातून कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी बँकेमार्फत एक लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्यात आले. तसेच अमृत संस्थेच्या माध्यमातून मिळणाऱ्या व्याज परताव्याबाबतही संबंधित कुटुंबाला माहिती देण्यात आली. संकटात सापडलेल्या कुटुंबाला या सहकार्यामुळे नव्याने उभे राहण्याची आशा निर्माण झाली असून, समाजातील गरजू कुटुंबांना योग्य मार्गदर्शन आणि आधार मिळाल्यास त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
मनीषा जयंत कुनसावळीकर
अमृतसखी, नांदेड
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment