वडिलांच्या अकाली निधनानंतरही जिद्द न हरता त्यांनी हिमतीने निभावली कुटुंबाची जबाबदारी

अमृत परिवार सर्वेक्षणातून उलगडले दोन कुटुंबांचे संघर्षमय वास्तव

वडिलांच्या अकाली निधनानंतरही जिद्द न हरता त्यांनी हिमतीने निभावली कुटुंबाची जबाबदारी मुख्य फोटो
वडिलांच्या अकाली निधनानंतरही जिद्द न हरता त्यांनी हिमतीने निभावली कुटुंबाची जबाबदारी अतिरिक्त फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यातील हृदयस्पर्शी अनुभव...

अमृत परिवार सर्वेक्षणासाठी माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे गेलो होतो. तेव्हा आर्य वैश्य समाजातील दोन कुटुंबांची अत्यंत हृदयस्पर्शी आणि संघर्षमय परिस्थिती कळली. या दोन्ही कुटुंबांतील कर्ते पुरुष मुले लहान असतानाच आकस्मिक मृत्युमुखी पडले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

पहिल्या कुटुंबात आई आणि मुलगा असे दोघेच राहतात. वडिलांच्या निधनाचा मोठा मानसिक आघात झाल्याने आईची मानसिक स्थिती अस्थिर झाली आहे. अशा कठीण परिस्थितीतही त्या मुलाने हार न मानता स्वतःचे शिक्षण सुरू ठेवले असून, तो सध्या बीकॉमच्या अंतिम वर्षात शिकत आहे. शिक्षणासोबतच तो छोटेसे किराणा दुकान चालवून आईची जबाबदारी सांभाळत आहे. त्याची जिद्द आणि कुटुंबासाठीची धडपड प्रेरणादायी आहे.

दुसऱ्या कुटुंबात मुलगा, त्याची आई आणि अविवाहित बहीण असा परिवार आहे. वडिलांच्या निधनानंतर घराची सर्व जबाबदारी त्या मुलावर आली. तो भांड्याचे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. व्यवसाय वाढवण्याची इच्छा असूनही आर्थिक अडचणींमुळे आणि बँकेकडून कर्ज मिळण्यात होणाऱ्या अडथळ्यांमुळे त्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.

या दोन्ही कुटुंबांची एकंदर परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यामागील मुख्य कारण म्हणजे कुटुंबप्रमुखांचे आकस्मिक निधन होय. अमृत परिवार सर्वेक्षणाद्वारे त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आणि त्यांना बँकेमार्फत कर्ज स्वरूपात आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. अशा कुटुंबांना फक्त आर्थिक मदतीची नाही, तर मानसिक आधार, समाजाचा पाठिंबा आणि योग्य मार्गदर्शनाचीही गरज आहे. अमृत परिवाराच्या माध्यमातून अशा गरजू कुटुंबांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.

विश्वास बदापूरकर

अमृतमित्र, नांदेड


Publisher: Saurabh Kulkarni News publisher name | Date: 20-05-2026 News publication date | Time: 02:03 PM News publication time | Views: 331 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news
Publisher: Saurabh Kulkarni News publisher name | Date: 20-05-2026 News publication date | Time: 02:03 PM News publication time | Views: 331 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement