राजा दाहिर

अनाम वीरांच्या शौर्याची गाथा - भाग १

राजा दाहिर मुख्य फोटो
मुख्य फोटो

अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त

स्तंभ तिथे ना कोणी बांधला, पेटली ना वात

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या या ओळी ऐकल्या, की आठवतात भारतातले ते असंख्य वीर ज्यांचा इतिहास आपण विसरलो आहोत. परंतु आपले वर्तमान त्यांच्या अमूल्य बलिदानाने सुरक्षित आहे आणि म्हणूनच आपल्या भविष्यकालीन पिढीला या अनाम वीरांची माहिती कळावी हाच या लेखमालेचा उद्देश आहे. या लेखमालिकेत आपण अशा काही स्त्री-पुरुष वीरांची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांचा इतिहास आपल्याला फारसा माहीत नाही. परंतु त्यांचे बलिदान तितकेच श्रेष्ठ आहे. भारताचा इतिहास आपण वाचतो, तेव्हा आपल्याला प्रकर्षाने जाणवते की काही कालखंड, काही व्यक्तिरेखा, त्यांचे शौर्य, त्यांचे बलिदान उपेक्षित राहिले आहे. ते का उपेक्षित राहिले, की त्यांना जाणूनबुजून उपेक्षित ठेवले गेले, या प्रश्नाला उत्तर नाही; मात्र या लेखमालिकेतून आपण अशाच अनाम वीरांना न्याय द्यायचा प्रयत्न करणार आहोत.

या मालिकेतील पहिले अनाम वीर म्हणजे सिंध प्रांताचे हिंदू राजे दाहिर. या राजाचा कालखंड जवळजवळ १३०० वर्षे जुना आहे. त्या वेळी भारतावर परकीय आक्रमणांना, विशेषत: अरब आक्रमणांना सुरुवात झाली होती. या दाहिर राजाचे शौर्य जाणून घेण्याआधी आपण त्याच्या भूभागाचा म्हणजेच सिंध प्रांताचा इतिहास जाणून घेऊ या. भारतात मौर्य कार्यकाळात मध्यवर्ती शासनव्यवस्था बळकट होती. मौर्य साम्राज्यानंतर गुप्त साम्राज्य, नंतर वर्धन घराणे आले. या घराण्यानंतर भारताच्या या बळकट मध्यवर्ती साम्राज्याची विभागणी अनेक छोट्या-छोट्या तुकड्यांत झाली. काश्मीर, माळवा, काबूल, चितोड असे अनेक छोटे-छोटे प्रांत निर्माण झाले. या सर्वच प्रांतांत वेगवेगळे शासक होते. त्यातलाच एक प्रांत म्हणजे सिंध प्रांत. त्या वेळी सिंधच्या उत्तरेला पंजाब व काश्मीर, पश्चिमेला बलुचिस्तान (त्या वेळी त्याला मकरान हे नाव होते), पूर्वेला राजस्थानचे वाळवंट आणि त्यापलीकडे माळवा प्रांत होते. दक्षिणेला देवल बंदर आणि अरबी समुद्र होता. हा सिंध प्रांत आताच्या सिंधपेक्षा बराच मोठा होता. त्या वेळी या सिंध प्रांताची राजधानी होती आलोर. म्हणजे आताच्या पाकिस्तानच्या सकर जिल्ह्यात रोहरी नावाचे गाव आहे, त्या गावापासून पूर्वेला आठ किलोमीटर अंतरावर असलेला भाग. आजही या गावात आलोरचे अवशेष सापडतात. भारतावर जी काही परकीय आक्रमणे झाली, ती या सिंध प्रांतातील बोलन खिंड आणि खैबर खिंड इथून आणि मग खाली अरबी समुद्रातून झाली. या प्रांताचा आणखी प्राचीन इतिहास म्हणजे सिंधची प्राचीन नोंद महाभारतात येते. दुःशला (दुर्योधनाची बहीण) हिचा विवाह सिंध सौवीरचा राजा जयद्रथ याच्याशी झाला होता. कौरव-पांडव युद्धात तो कौरवांकडून लढला होता. अभिमन्यूला कपटाने मारण्यात त्याचा सहभाग होता. दुसऱ्याच दिवशी कृष्णाने 'हा सूर्य आणि हा जयद्रथ' म्हणून गर्दीत तो कुठे आहे हे दाखवताच अर्जुनाच्या बाणाने त्याचा वेध घेतला होता. असा हा सिंध प्रांताचा प्राचीन इतिहास आहे.

दाहिरचे घराणे उच्चवर्णीय ब्राह्मण पुरोहित घराणे होते. त्याच्या घराण्याचा मूळपुरुष होता बसास. दाहिरच्या आधी सहाव्या शतकात सिंधचा श्रेष्ठ राजा चाचने सिंध, बलोच व पलीकडे इराणचादेखील थोडा भाग आपल्या अखत्यारीत आणला. राजा चाचनंतर दाहिर सिंधचा राजा/शासक बनला. हा दाहिर शक्तिशाली आणि बलाढ्य होता. त्याची देहयष्टी मजबूत होती. तो धनुर्विद्येत तरबेज होता. तो एक खास शस्त्र चालविण्यात माहीर होता. हत्तीच्या अंबारीत योद्धे असायचे, त्यांच्या हातात हे खास शस्त्र असायचे. दोरीला बांधलेले हे शस्त्र म्हणजे एक धारदार चक्र होते. ते त्या बसलेल्या जागेवरून फिरवले की समोरच्या व्यक्तीचा शिरच्छेद करून पुन्हा आपल्या जागी येत असे.

अरबांनी भारतावर जी आक्रमणे केली, ती अबू बकर हा इस्लाम धर्माचा पहिला खलिफा झाल्यावर केली. साधारण ६३८ ते ७१२ अशी जवळजवळ ७० वर्षे ही आक्रमणे भारताने परतवली; मात्र मोहम्मद बिन कासीमने सिंध प्रांतावर विजय मिळवला. या आक्रमणाचा इतिहास पाहिला, की समजते, की जेव्हा जेव्हा राजकारणात अनाठायी महत्त्वाकांक्षा येते, त्याची नीतिमत्ता घसरते, तेव्हा तेव्हा इतिहास क्रूर मार्गाने जाऊ लागतो. राजा दाहिर आणि अरब यांच्यातील संघर्ष हा अरबी समुद्रातील अरब व्यापारी आणि समुद्री चाच्यांशी संबंधित घटनांच्या निमित्ताने उद्भवला. प्राचीन अरब स्रोतांनुसार, आताच्या श्रीलंकेच्या म्हणजे त्या काळच्या सरानदीपच्या राजाने अरब खलिफा वलीदला काही भेटी पाठवल्या होत्या. त्यात काही हिरे, माणके, सोने, काही हबशी गुलाम स्त्रिया होत्या. ही सगळी जहाजे श्रीलंकेहून निघाली आणि सिंध प्रांताच्या सागरी प्रदेशातून जात असताना, त्यांना भयानक वादळाला सामोरे जावे लागले. या वादळापासून आश्रय मिळावा म्हणून ती जहाजे कराचीजवळील देवलच्या किनाऱ्यावर आली होती. तिथे काही समुद्री डाकूंनी त्यावर हल्ला केला. 

खरे तर या सगळ्या प्रकरणाचा दाहिरशी संबंध नव्हता. परंतु याचे निमित्त करून खलिफाने दाहिरला धमकीवजा पत्र लिहिले. ती जहाजे आणि त्यावरील सर्व सोने आणि स्त्रिया दाहिरने सोडवून खलिफाला द्यावी. दाहिरने सांगितले, की जिथे हे जहाज लुटीचे प्रकरण झाले आहे, तो भाग सिंध राज्याचा भाग नाही. त्यामुळे ते सोडवण्याचा आणि हिरे-माणके व गुलाम स्त्रियांना परत करण्याचा प्रश्नच येत नाही. या नकाराने खलिफा चिडला व त्याने त्याचा तरुण सेनापती मुहम्मद बिन कासीमच्या नेतृत्वाखाली सन ७११मध्ये सिंधवर आक्रमणाचे आदेश दिले.

सुमारे सहा हजार सीरियन आणि इराकी सैनिकांचा समावेश असलेल्या अरब सैन्याने मकरानमधून सिंधमध्ये आगेकूच केली. अरबांनी भीषण वेढा घालून देवल हे बंदर शहर ताब्यात घेतले. शहरातील मुख्य मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले आणि त्याची संपत्ती जप्त करण्यात आली. त्यानंतर मुहम्मद बिन कासीमने नेरून आणि सिविस्तानच्या दिशेने कूच केले आणि आलोरजवळ सिंधू नदीच्या काठावर राजा दाहिरच्या सैन्याशी सामना करण्यापूर्वी तो प्रदेश ताब्यात घेतला. 

राजा दाहिरला त्याच्या मंत्र्याने सांगितले, 'तुझ्या कुटुंबीयांना राजस्थानातील हिंदू राजांकडे आश्रयाला पाठव. तू अरबांशी लढत असल्यामुळे राजस्थानला, गुजरातला संरक्षण मिळत आहे, ते निश्चित मदत करतील;' पण राजाने नकार दिला. तो म्हणाला, 'मी माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी पाठवले, तर माझ्या सरदारांना कोणत्या तोंडाने लढण्यास सांगू? या युद्धात मी जिंकलो, तर आपले राज्य महासत्ता होईल! आणि हरलो, तर शौर्याने लढलो म्हणून माझे नाव अरब व हिंदच्या गाथांमधून अमर होईल!' इ.स. ७१२मध्ये झालेल्या एका निर्णायक लढाईत, दाहिरच्या सैन्याने शौर्याने लढा दिला. परंतु अखेरीस त्यांचा पराभव झाला. सिंधू नदीच्या काठी दाहिर व कासीमचे घनघोर युद्ध झाले. राजा दाहिर व त्याचा पुत्र जयसिंह धारातीर्थी पडले. कासीमने राजाचे धडावेगळे केलेले शीर व त्याच्या मुली - सूर्यादेवी व प्रेमलदेवी भेट म्हणून खलिफाला पाठवल्या. त्यांनी खलिफाला सांगितले, की कासीमने त्यांचा उपभोग घेतला असल्याने त्या खलिफासाठी लायक नाहीत! त्या वक्तव्याने संतापलेल्या खलिफाने कासीमला मृत्युदंड ठोठावला. कासीमच्या मृत्यूनंतर खलिफाला त्याची चूक लक्षात आली. तेव्हा त्याने राजा दाहिरच्या दोन बहादूर मुलींना भिंतीत चिणून मारले.

राजा दाहिर व त्याच्या पुत्रांच्या शौर्याची व त्याच्या मुलींनी घेतलेल्या सुडाची कथा अरबांनी लिहिलेल्या 'चाचनामा'मध्ये आहे; पण हिंदच्या एकाही लेखात, गाथेत किंवा पोवाड्यातसुद्धा त्यांचे नाव नाही. त्या राजाने, त्याच्या कुटुंबाने आणि त्याच्या हजारो सैनिकांनी दिलेल्या बलिदानाची हिंदमध्ये कोणीही दखल घेतली नाही. 

असे म्हणतात, की 'दुष्टांच्या गाथा ते गेल्यानंतरही स्मरणात ठेवल्या जातात; मात्र पराक्रमी, देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीरांची गाथा मात्र विस्मरणात जाते!' राजा दाहिर आणि त्यांच्या पूर्वजांमुळे जवळजवळ ७८ वर्षे अरब भारतात येऊ शकले नाहीत. या अनाम वीराला आणि त्याच्या शौर्याला शतशः नमन!

(संकलित)

(क्रमश:)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 26-05-2026 News publication date | Time: 02:01 PM News publication time | Views: 386 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 26-05-2026 News publication date | Time: 02:01 PM News publication time | Views: 386 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

S
Sharad Godbole
26-05-2026 05:10 PM

खरोखरच सुंदर लेखमाला अनाम वीरांची चालू केल्याबद्दल अमृत महाराष्ट्र चे अभिनंदन. राजा दाहीर चा हा इतिहास वाचण्यात आला नव्हता. ह्या लेख मालिका चा उद्देश नक्कीच सफल होईल

Write a Comment
0 / 50 words
Advertisement