इतिहासाने कधीही न सांगितलेली एक रक्तरंजित कहाणी: ‘रावलापाणी हत्याकांड’

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील रावलापाणी संघर्ष म्हणजे खानदेशातील जालियानवाला बाग हत्याकांड असेच म्हटले पाहिजे; ज्याची नोंद इतिहासात नाही, परंतु आजसुद्धा त्याठिकाणी झालेल्या गोळीबाराच्या खुणा आहेत. इतिहासाच्या पानांवर कदाचित ही कथा नसेल, पण या धरतीवर झालेल्या रक्तरंजित संघर्षाची गाथा आजही येथील मातीच्या कणाकणात जिवंत आहे.

इतिहासाने कधीही न सांगितलेली एक रक्तरंजित कहाणी: ‘रावलापाणी हत्याकांड’ मुख्य फोटो
इतिहासाने कधीही न सांगितलेली एक रक्तरंजित कहाणी: ‘रावलापाणी हत्याकांड’ अतिरिक्त फोटो

रावलापाणीच्या जंगलात २ मार्च १९४३ च्या त्या रात्री नेमकं काय घडलं...?

जालियनवाला बाग हत्याकांडासारखेच एक हत्याकांड नंदुरबारच्या रावलापाणी येथे झाले होते. आदिवासी बांधवांच्या संदर्भात ही घटना घडली होती. मात्र भारताच्या इतिहासाच्या पानांवर याची कुठेही नोंद नव्हती. असे असले तरी रावलापाणी संग्रामस्थळी अंदाधुंद गोळीबाराच्या निशाणा तेथील कातळावर आजही इतिहासाच्या स्मृती जाग्या करतात. आदिवासींचे हे हत्याकांड घडले होते; २ मार्च १९४३ या दिवशी नंदुरबार जिल्ह्यातील पूर्वीच्या अक्राणी महाल आणि सध्याच्या धडगाव तालुक्यातील ‘रावलापाणी’ येथे आदिवासी सत्याग्रहींवर ब्रिटिशांनी केलेल्या बेछूट गोळीबारात अनेक आदिवासी शहीद झाले होते. या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देशभर चळवळी, सत्याग्रह आणि आंदोलने झाली. यात नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींचेही योगदान उल्लेखनीय आहे. भलेही त्यांनी केलेल्या बलिदानाची नोंद घेतली गेली नाही, परंतु तरीही त्याचे मोल कमी होऊ शकत नाही.

संत गुलामहाराज आणि त्यांची ‘आपधर्म’ चळवळ-

देशात स्वातंत्र्याचे वारे जोराने वाहत होते. यात धुळे जिल्ह्यातील आदिवासीबहुल तळोदे तालुका कसा मागे राहील? १९३० नंतरच्या काळात स्वतः आदिवासी समुदायाचे असलेले संत गुला महाराज यांनी समाजबांधवांसाठी उभी केलेली आत्मसन्मानाची चळवळ बाळसे धरू लागली होती. दारूबंदी, आत्म व बाह्यशुद्धी, आत्मसन्मानासाठी व कौटुंबिक स्थैर्यासाठी याला चळवळीचे रूप प्राप्त झाले होते. ‘आपधर्मा’च्या स्थापनेतून आत्मसन्मानाचा विचार रुजू लागला होता. ब्रिटिश राजवटीविरोधात आदिवासींची ‘आपधर्म’ चळवळ एकवटली होती. हद्दपारीत त्याच समाजातील रामदास महाराज मोरवडहून मध्य हिंदुस्थानातील राजघाट (चिखलदरा) येथे आपले कुटुंब व अनुयायांसह गेले. याच काळात देशात ‘चले जाव’ चळवळ जोरात होती. तत्कालीन धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी रामदास महाराजांना पत्र लिहून हद्दपारीची मुदत संपण्याची वाट न पाहता साम्राज्यवाद्यांच्या विरोधातील संघर्षात सामील होण्याचे आवाहन केले. नानासाहेब ठक्कर स्वतः रामदास महाराजांना विनंती करण्यास राजघाटला गेले. या सर्वांचा परिपाक म्हणून रामदास महाराज नर्मदा नदी पार करून जिल्ह्यात परत यावयास निघाले. रस्त्यात त्यांच्याबरोबर त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने सामील होऊ लागले. महाराज परतत असल्याबाबतची खबर वरिष्ठांना आधीच कळविण्यात आली होती. सरकार त्यांच्या वाटचालीवर बारीक लक्ष ठेवून होते. सर्वात आधी ‘बोरद’ गाव लुटले जाईल, अशी खोटी अफवा पसरविण्यात आली. परिसरात अविश्वासाचे व भीतीचे वातावरण झाले. १ मार्च १९४३ ला ‘बन’ या गावी १ पलटण इंग्रज सैनिक पोहोचवण्यात आले. सैनिकांनी रात्रीतून पायी जाऊन रामदास महाराजांच्या ‘कारव्या’ला नाल्याच्या दोन्ही बाजूने घेरले. २ मार्चला सूर्योदयापूर्वी हा ‘कारवा’ मार्गस्थ असताना अचानक दोन्ही बाजूंनी नि:शस्त्र जमावावर बेछूट गोळीबार केला गेला. हे ठिकाण एवढे विचित्र आहे की, येथून पुढे वा मागे जाण्यास कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. महाराजांना गोळी लागू नये म्हणून त्यांच्या अनुयायांनी त्यांना ढालीसारखे घेरले. या एकतर्फी संघर्षात ४० जणांना जागेवरच हौतात्म्य मिळाले व २८ जखमी झाले. अशी ही रावलापाणीची आजरामर, इतिहासात नोंद नसलेली घटना. त्या अनाम वीरांच्या संघर्षाची कोठेही नोंद नाही, पण तरीही त्यांचे हे बलिदान अमुल्य आहे. त्या अनाम वीरांना शतश: नमन!

-संकलित

Publisher: Yogesh Ahire News publisher name | Date: 02-06-2026 News publication date | Time: 04:07 PM News publication time | Views: 33 Number of times this news has been viewed | District: Nandurbar Related district of the news
Publisher: Yogesh Ahire News publisher name | Date: 02-06-2026 News publication date | Time: 04:07 PM News publication time | Views: 33 Number of times this news has been viewed | District: Nandurbar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement