बोधकथा- ५०
आज आपण सगळीकडे एक अस्वस्थता आणि जीवघेणी स्पर्धा अनुभवतो. दुसऱ्याचा द्वेष करणे, एखाद्याविषयी वैरभावना मनात ठेवणे यामुळे आपल्या आजूबाजूला अनेक वाईट गोष्टी घडत आहेत. ही विकृत मानसिकता समाजासाठी घातक आहे. नैतिक-अनैतिक यांचा विचार न करता आपला स्वार्थ साधणे अत्यंत वाईट आहे. जाणून घेऊया या संदर्भातील एक छोटीशी कथा- अंगुलीमाल नावाचा एक डाकू होता. त्याने शंभर माणसांची हत्या करून त्यांच्या अंगठ्यांची माळ करून गळ्यात घालायची असे ठरवले होते. म्हणूनच त्याला ‘अंगुलीमाल’ असे नाव पडले होते. एकदा त्या जंगलातून भगवान बुद्ध चालले होते. अंगुलीमालाने इतर वाटसरुंसारखे त्यांनाही अडवले. त्यांचा अंगठा कापून तो माळेत अडकवणार असल्याचेही सांगितले. भगवान बुद्ध यामुळे विचलित झाले नाहीत. त्यांनी अंगुलीमालाला एक फांदी तोडायला सांगितली. अंगुलीमालाने त्याप्रमाणे फांदी तोडली. भगवान बुद्धांनी त्याला ती फांदी जिथून तोडली, तिथेच पुन्हा जोडण्यास सांगितले. भगवान बुद्धांच्या या विचित्र आज्ञेमुळे अंगुलीमाल गोंधळला. ती फांदी पुन्हा झाडाला कशी जोडता येईल? ते शक्यच नव्हते. तेव्हा भगवान बुद्ध त्याला म्हणाले, “ज्याला जोडता येत नाही, त्याने ते तोडू नये. जर आपल्याला कोणाला जीवन देता येत नसेल, तर आपण कोणाला मृत्यूही देऊ शकत नाही.” अंगुलीमाल त्यांच्या या बोलण्याने स्तब्ध झाला. त्याला त्याचा अपराध समजला होता. त्याने भगवान बुद्धांचे शिष्यत्व स्वीकारले. पुढे त्याच्यात अमुलाग्र बदल घडला. अशाप्रकारे आपणही जे आपले आहे तेच घेऊ शकतो. दुसऱ्याच्या कोणत्याही गोष्टीवर आपला अधिकार नाही. त्यामुळे आपण आपल्यात सुधारणा करणे, चांगल्या सवयी जोपासणे आणि आपली प्रगती आपण स्वतः साध्य करणे हेच श्रेयस्कर आहे, नाही का?
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment