रोजगाराच्या दृष्टीने कौशल्यप्राप्ती
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील रोहित विलास जोशी या विद्यार्थ्याला अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या योजनेमुळे कम्प्युटर टायपिंगचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत घेता आले. अमृत संस्था आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी, हिंदी व इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचे (३० व ४० शब्द प्रति मिनिट) प्रशिक्षण दिले जाते. रोहित जोशी यांनी गंगापूर येथील आकांक्षा कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये हे प्रशिक्षण घेतले. जून २०२५मध्ये प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर अमृत योजनेअंतर्गत परीक्षा फीचे साडेसहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. या यशाबद्दल अमृत संस्थेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि अमृतमित्र रामेश्वर साळुंके यांनी रोहित जोशी यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. ही योजना अनेक विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबत रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारी ठरत आहे.
योजना नेमकी काय आहे?
शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) आणि ऑनलाइन लघुलेखन परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील ‘अमृत’च्या लक्ष्यित गटातील जातीच्या आर्थिक दुर्बल घटकांतील उमेदवारांना उद्योगाभिमुख स्वयंरोजगारक्षम आणि रोजगारक्षम बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठलाही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत अशा योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील ‘अमृत’च्या लक्ष्यित गटातील जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी, युवक, युवती (वयोगट १६ ते ४५ वर्षे) या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
त्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व ऑनलाइन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अर्ज केल्यानंतर फीचे साडेसहा हजार रुपये संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जातात.
आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, अधिवास (डोमिसाइल) प्रमाणपत्र (वय, राष्ट्रीय आणि रहिवास प्रमाणपत्र), अमृत लक्ष्यित गटातील जातीचा उल्लेख असलेला शासकीय पुरावा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र किंवा आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, राष्ट्रीय बँक पासबुक किंवा पोस्ट खात्याचे आयएफएससी कोडसह तपशील.
संपर्क : अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत संस्थेचे विभागीय व जिल्हा कार्यालय, पुंडलिक नगर रोड,
सेक्टर -४ सिडको, पाण्याच्या टाकीजवळ,
छत्रपती संभाजीनगर - ४३१००९
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment