बोरगाव बाजार येथील कायस्थ बंधूंची भावना
३० डिसेंबर २०२५ रोजी प्रवास करत असताना बोरगाव बाजार येथील नवतरुण व होतकरू व्यावसायिक मयूर कायस्थ व हर्षल कायस्थ यांच्या घरी जाऊन भेट घेतली. ग्रामीण भागात वास्तव्यास असलेले हे दोन्ही भाऊ केटर्स थेटर या व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करतात. लग्नसमारंभात स्वयंपाकाचे काम करून चालणारा हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय असून, त्याचबरोबर त्यांनी आपले शिक्षणही सुरू ठेवले आहे. त्यांचे आई-वडीलदेखील हाच व्यवसाय करीत आहेत.
या भेटीमध्ये अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांची सविस्तर माहिती त्यांना दिली. त्या वेळी मयूर व हर्षल कायस्थ यांनी सांगितले, की “आम्हाला बेकरी व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती; मात्र नेमके कसे करावे, कुठून सुरुवात करावी हे माहिती नव्हते. आज मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आणि अमृतच्या योजनांमुळे आमच्यासारख्या नवतरुणांना निश्चितच नवी दिशा मिळणार आहे.”
मयूर कायस्थ म्हणाले, “मी आमच्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला आवाहन करतो, की अमृत या संस्थेच्या माध्यमातून समाजाने सक्षम व्हावे. व्याजपरतावा योजना व इतर व्यावसायिक योजनांचा लाभ घेऊन पारंपरिक व्यवसायाला नवे स्वरूप द्यावे आणि अमृत संस्थेच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक व्हावे.”
या वेळी अमृत संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी घेतल्या जाणाऱ्या मोफत उद्योजक प्रशिक्षण कार्यक्रमाची माहितीही देण्यात आली. त्यामध्ये अमृत सौंदर्यप्रसाधन केंद्र प्रशिक्षण, आरी वर्क प्रशिक्षण, शिवण क्लास प्रशिक्षण, अमृत अलंकार, अमृत अन्नपूर्णा यांसारख्या विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजनांचा समावेश आहे. तसेच शैक्षणिकदृष्ट्या सुरू असलेल्या टंकलेखन आदी योजनांचीही माहिती देण्यात आली.
अमृत संस्थेच्या योजना ऐकल्यानंतर दोन्ही भावांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसून आला. या वेळी त्यांच्या आईने भावना व्यक्त करताना सांगितले, की, “आतापर्यंत कोणत्याही शासकीय योजनेची माहिती आमच्यापर्यंत घरपोच आली नव्हती. आज तुमच्या माध्यमातून अमृतच्या योजना आमच्यापर्यंत आल्या आहेत. आम्ही त्यांचा नक्कीच लाभ घेऊ व समाजानेही या योजनांचा फायदा घ्यावा.”
अधिक माहितीसाठी संपर्क :
योगेश भास्करराव रोडे - 9403200606
छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत संस्थेचे विभागीय व जिल्हा कार्यालय, पुंडलिक नगर रोड,
सेक्टर -४ सिडको, पाण्याच्या टाकीजवळ,
छत्रपती संभाजीनगर - ४३१००९
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
https://mahaamrut.org.in/
Comments 1 Comments
SANKET SURYAKANT SATHE
very nice .. !
Write a Comment