अमृत संस्थेचे निबंधक सिद्धेश्वर वरणगावकर यांनी नवउद्योजकांना सांगितलेली एक प्रेरक सत्यकथा
कर्नाटक राज्यात सोन्याच्या खाणी आहेत. कर्नाटकातील कोलार हे क्षेत्र सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. तिथे घडलेली ही एक सत्य घटना साधारणतः १८८०च्या काळातील आहे. त्या वेळी देवेगौडा नावाच्या एका व्यापाऱ्याने आपली सर्व मालमत्ता विकून कोलार भागात सोन्याच्या आशेने खाणपट्टा विकत घेतला होता. खोदकाम सुरू होते; पण सोने काही मिळत नाही. आजूबाजूचे व्यापारी देवेगौडाला 'सोने लागणार नाही' असे म्हणतात; पण देवेगौडा खोदकाम सुरूच ठेवतो.
त्याच्याकडचे सगळे पैसे संपतात. मग तो नातेवाईक व मित्रमंडळींकडून पैसे गोळा करून खोदकाम करतो. तरीही सोने मिळत नाही. आता बायको व मुलेदेखील देवेगौडाला वेड्यात काढू लागतात आणि खाणपट्टा विकण्याचा सल्ला देतात. 'आता रिकामा उद्योग बंद करा आणि हे गाव सोडून दुसरीकडे चला' असे ते म्हणू लागतात. तोपर्यंत जमीन ९०० फूट खोल खोदली गेलेली असते. शेवटी नाईलाजास्तव देवेगौडा आपली जमीन विकण्यास काढतो. परंतु आता आजूबाजूचे कोणतेही व्यापारी ही जमीन घेण्यास तयार होत नाहीत. शेवटी एक व्यापारी अतिशय नाममात्र भावात जमीन विकत घेतो आणि देवेगौडा आपले जमीन विकून गाव सोडून निघून जातात.
दुसरा व्यापारी विचार करतो, की आपणही थोडे खोदून पाहू. ९०० फूट खोदलेली जमीन पुन्हा खोदायला सुरुवात केली जाते.आणि काय आश्चर्य! सात फूट खोदल्यानंतर जमिनीत सोने मिळते. म्हणजे ९०७ फुटांवर सोने असते. परंतु देवेगौडा व्यापारी ९०० फुटांपर्यंत खोदून निराश होऊन काम सोडून देतो. त्या वेळी यश त्याच्यापासून केवळ सात फूट अंतरावर असते.
यातून एक निष्कर्ष असा निघतो, की उद्योजकाने आपली लढाई निराश न होता सुरू ठेवावी. मिळालेल्या अपयशाने खचून जाऊ नये. इंग्रजीत अशी म्हण आहे - Every cloud has a silver lining. म्हणजे प्रत्येक संकटाला रूपेरी किनार असते.
नवउद्योजकांनी हे वाक्य कायम लक्षात ठेवावे - 'मी अजून हरलेलो नाही. कारण प्रयत्न अजून संपलेले नाहीत.'
अमृत कौशल्यविकास कार्यक्रमामधून प्रशिक्षण घेऊन आपण आपला उद्योग सुरू केला, तर निश्चितपणे आपला व राष्ट्राचा विकास साधला जाईल. त्यासाठी अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या आपापल्या जिल्ह्याच्या व्यवस्थापकांशी त्वरित संपर्क साधा आणि प्रशिक्षण घेऊन आपल्या आवडीचा उद्योग सुरू करा, असे सर्वांना आवाहन!
- सिद्धेश्वर वरणगावकर (निबंधक, अमृत, पुणे)
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
Comments 1 Comments
Snehal Dede
👌👍 स्तुत्य उपक्रम..
Write a Comment