हॉस्पिटलसाठी घेतलेल्या कर्जावर डॉ. श्रेयस गिल्डा यांना ₹ ७० हजार व्याजपरतावा
नांदेड : स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या, तसेच असलेल्या व्यवसायाची वृद्धी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खरोखरच वरदान ठरत आहे. खुल्या प्रवर्गाच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेच्या अनेक योजनांपैकी वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा ही योजना विशेष लोकप्रिय असून, नांदेडचे प्रसिद्ध दंतरोगतज्ज्ञ डॉ. श्रेयस गिल्डा यांनाही त्या योजनेचा लाभ मिळाला आहे.
डॉ. गिल्डा यांनी आपल्या हॉस्पिटलसाठी १५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. अमृत संस्थेच्या योजनेतून आतापर्यंत त्यांना ७० हजार रुपयांचा व्याजपरतावा मिळाला आहे. या योजनेअंतर्गत दोन वर्षांपर्यंत व्याजपरतावा मिळतो. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. अमृत संस्थेच्या या पाठबळामुळे डॉ. गिलडा यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला असून, त्यांची ही यशोगाथा इतर सुशिक्षित तरुणांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
डॉ. गिल्डा यांनी या योजनेची वैशिष्ट्ये स्वानुभवावरून सांगितली. केवळ नेहमीच्या, मूलभूत कागदपत्रांच्या आधारे या योजनेचा लाभ त्यांना मिळाला. अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी आणि ओमकार शेटे यांच्या सहकार्यामुळे योजनेचा लाभ मिळण्याची प्रक्रिया सुलभ झाली, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
'अमृत संस्था तरुणांच्या स्वप्नांना बळ देण्याचे उत्तम काम करत आहे. सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा,' असे आवाहन त्यांनी 'अमृत महाराष्ट्र'चे आदित्य कुलकर्णी यांच्याशी बोलताना केले.
अमृत संस्थेचा लक्ष्यित गट कोणता?
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
तुम्हीही घेऊ शकता या योजनेचा लाभ; कशी आहे योजना?
वैयक्तिक व्याजपरतावा योजना ही विशेषतः व्यावसायिक कर्ज घेतलेल्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. योग्य कागदपत्रे सादर करून आणि वेळेत अर्ज केल्यास या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. लक्ष्यित गटातील जातींमधील व्यावसायिकांनी वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्याचा १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे दिला जातो. यासाठी लाभार्थ्यांनी कर्जफेड नियमितपणे करणे बंधनकारक असून, व्याजासह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment