अमृत संस्थेतून मोफत ड्रोन प्रशिक्षण घेतल्यानंतर सुरू करत आहेत स्वतःचा व्यवसाय
लातूर : एखादी गोष्ट प्राप्त करण्याची जिद्द आणि त्या जिद्दीला योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली, की सर्वसामान्य व्यक्तीही गगनात भरारी घेऊ शकते, याचे एक उदाहरण लातूरमध्ये पाहायला मिळत आहे. त्या व्यक्तीचे नाव विवेक रामचंद्र जोशी. अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रमातून विवेक यांनी नवीन कौशल्य तर आत्मसात केलेच; पण आता ते स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करून उद्योजकतेच्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत.
विवेक जोशी यांनी अमृत संस्थेद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ड्रोन पायलट प्रशिक्षणात सहभाग घेतला होता. हे प्रशिक्षण पूर्णतः मोफत होते. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि ड्रोन हाताळणीचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणापूर्वी रोजगाराच्या शोधात असलेल्या विवेक यांना या संधीमुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक नवी दिशा सापडली.
विवेक यांच्या या यशात अमृत संस्थेचे लातूर जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर आणि उपव्यवस्थापक विनोद अपसिंगेकर यांच्या मार्गदर्शनाचाही मोलाचा वाटा आहे. प्रशिक्षणात आलेले तांत्रिक अडथळे दूर करण्यापासून ते व्यवसाय सुरू करण्याची मानसिकता तयार करेपर्यंत या टीमने विवेक यांना खंबीर पाठबळ दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज लातूरचा हा तरुण एका नवीन स्टार्टअप सुरू करत आहे.
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या उंबरठ्यावर असताना विवेक जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते म्हणतात, 'आज मी स्वतःचा व्यवसाय सुरू करू पाहत आहे, ते केवळ अमृत संस्थेमुळेच शक्य झाले आहे. माझ्या आयुष्यातील कठीण प्रसंगी हे प्रशिक्षण खरोखर 'अमृत' ठरले असून, त्याने माझे संपूर्ण जीवन बदलून टाकले आहे.'
नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क :
शुभम मुळजकर - 7391065470
लातूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत कार्यालय, पहिला मजला, पितृछाया बिल्डिंग,
मयुरेश्वर अपार्टमेंट, सिग्नल कॅम्प, विद्यानगर, लातूर
तालुका-जिल्हा लातूर - 413512
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment