जीसीसी-टीबीसी शुल्क परतावा योजनेचा १० विद्यार्थ्यांना फायदा
अकोला : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी व कौशल्यविकासाच्या योजना राबवते. त्याचाच एक भाग म्हणून जीसीसी-टीबीसी (शासकीय टंकलेखन व लघुलेखन) परीक्षा शुल्क परतावा योजना प्रभावीपणे अंमलात आणली जात आहे. या योजनेचा लाभ अकोला जिल्ह्यातील १० विद्यार्थ्यांना मिळाला आहे.
शासकीय सेवेमध्ये टंकलेखन व लघुलेखन ही अत्यंत आवश्यक व महत्त्वाची पात्रता मानली जाते. मराठी व इंग्रजी टायपिंग, तसेच लघुलेखनाची परीक्षा (Mar-30, Mar-40, Eng-30, Eng-40, Eng-60, Eng-100) जून २०२५मध्ये यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्यानंतर अकोला जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील १० विद्यार्थ्यांना अमृत संस्थेमार्फत संपूर्ण प्रशिक्षण व परीक्षा शुल्काचा परतावा देण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला ₹६५०० प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना मिळून एकूण ७१ हजार ५०० रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली. सर्व लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासून ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. लाभार्थ्यांमध्ये मोनू सुरेखा, अक्षता देव, निशिका अग्रवाल, तन्मय देव, राहुल ठाकूर, कुणाल ठाकूर, अर्चना तिवारी, दर्शन शर्मा, वैभवी नेरवैया व प्रियंका शर्मा यांचा समावेश आहे.
आर्थिक अडचणींमुळे शिक्षण व प्रशिक्षणाचा खर्च पेलणे कठीण जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना मोठा दिलासा ठरली आहे. या आर्थिक साह्यामुळे प्रशिक्षणाचा भार कमी झाला असून, पुढील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीही आत्मविश्वास वाढला आहे, अशी भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे. शासकीय टंकलेखक व लघुलेखक पदासाठी आवश्यक पात्रता मिळाल्याने या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी खुल्या झाल्या असून, शासकीय सेवेकडे वाटचाल करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या आर्थिक मदतीमुळे मोठा दिलासा मिळाल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले.
या उपक्रमाबाबत माहिती देताना अमृत संस्थेचे अकोला जिल्हा व्यवस्थापक धनंजय कुळकर्णी यांनी सांगितले, की 'खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तरुणांनी शिक्षण व तांत्रिक कौशल्यांच्या माध्यमातून सक्षम व्हावे, हा अमृत संस्थेचा मुख्य उद्देश आहे. अकोला जिल्ह्यातील अधिकाधिक तरुणांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा.'
अमृत संस्थेच्या या उपक्रमामुळे अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये समाधान, उत्साह व सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही असे शैक्षणिक व कौशल्यविकासाचे उपक्रम सातत्याने राबवले जाणार असल्याचे अमृत संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment