गोसंरक्षक डॉ. सोसम्मा इयपे - अमृत महाराष्ट्र

गोसंरक्षक डॉ. सोसम्मा इयपे

नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या वेचूर जातीच्या गायींच्या संवर्धनाचे कार्य करणाऱ्या डॉ. इयपे यांच्या कार्याचा अल्प परिचय...

गोसंरक्षक डॉ. सोसम्मा इयपे मुख्य फोटो
गोसंरक्षक डॉ. सोसम्मा इयपे अतिरिक्त फोटो

डॉ. सोसम्मा इयपे या केरळमधील त्रिशूर येथील पशुवैद्यकीय व पशुविज्ञान विद्यापीठातील सेवानिवृत्त प्राध्यापिका आहेत. गेल्या ३० वर्षांपासून त्या वेचूर गायींच्या संवर्धनासाठी अविरतपणे कार्यरत आहेत. ही देशी जात नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर होती. या गायींची संख्या वाढावी म्हणून त्यांनी अथक प्रयत्न केले. या प्रयत्नांची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.

१९८०च्या दशकात जेव्हा डॉ. सोसम्मा इयपे यांनी वेचूर गायींची नामशेष होत चाललेली जात वाचवण्याचा संकल्प केला, तेव्हा त्यांना अनेक अडचणी आल्या. गावोगावी फिरून या जातीच्या गायी शोधणे, शेतकऱ्यांना समजावणे, स्वतःच्याच लोकांकडून होणारा विरोध, तसेच गायींचा अकाली मृत्यू अशा असंख्य समस्यांना त्यांना सामोरे जावे लागले; मात्र त्यांनी कधीही हार मानली नाही आणि त्या सातत्याने संघर्ष करत राहिल्या. अलीकडेच त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा त्यांच्या दीर्घ आणि कठोर संघर्षाला मिळालेला सर्वांत योग्य व सार्थ सन्मान आहे.

वेचूर ही भारतातील देशी गायींची अशी जात आहे, की ज्याबद्दल अनेकांना फारशी माहिती नाही. कमी उंचीच्या असलेल्या या गायी तुलनेने भरपूर दूध देतात. त्या दुधामध्ये औषधी गुणधर्म विपुल प्रमाणात आढळतात. त्या गायींच्या देखभालीसाठी आणि चाऱ्यासाठीही फारसा खर्च लागत नाही. तरीही हळूहळू या गायींची संख्या घटत गेली. १९८०च्या दशकात तर ही जात नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. तेव्हाच डॉ. सोसम्मा पुढे सरसावल्या आणि वेचूर गायींच्या संवर्धनाला त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय बनवले. 

१९६०च्या दशकात दूध उत्पादन वाढवण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने पशुधनाच्या प्रजनन धोरणात बदल केले. त्यानंतर देशी गायींचा विदेशी जातींशी मोठ्या प्रमाणावर संकर (क्रॉस-ब्रीडिंग) सुरू झाला. परिणामी वेचूर गायीसारख्या अनेक देशी जातींची संख्या हळूहळू घटू लागली. आता डॉ. सोसम्मा यांच्या प्रयत्नांमुळे केरळमध्ये, तसेच देशाच्या इतर भागांमध्ये मिळून वेचूर जातीच्या पाच हजारांहून अधिक गाई आहेत. डॉ. सोसम्मा यांचे कार्य अन्न व कृषी संघटना आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडूनही वाखाणले गेले आहे. डॉ. सोसम्मा आजही सक्रिय असून वेचूर संरक्षण ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत आहेत.

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 28-03-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 37 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 28-03-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 37 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement