अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खुल्या झाल्या करिअरच्या नव्या संधी
अकोला : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे ड्रोन ऑपरेटर (पायलट) प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातो. त्यामुळे युवकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी खुल्या होत आहेत. विशेष म्हणजे, खासगी संस्थांमध्ये लाखो रुपये खर्च करून घ्यावे लागणारे हे प्रशिक्षण अमृत संस्थेमार्फत लक्ष्यित घटकांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. अकोल्यातील अनेक जणांनी या संधीचा लाभ घेतला.
अकोला येथील निखिल चांडक यांनी अमृत संस्थेमार्फत कर्जत येथे कृषी क्षेत्रातील ड्रोन पायलट प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. या प्रशिक्षणाद्वारे पिकांची पाहणी, फवारणी, शेती व्यवस्थापनासाठी ड्रोनचा प्रभावी वापर, तसेच आधुनिक शेतीत तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करता येतो याचे सखोल प्रात्यक्षिक ज्ञान त्यांना मिळाले. यामुळे शेतीपूरक व्यवसायाकडे वाटचाल करण्याकरिता त्यांना आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
यश भालेराव यांनी अमृत संस्थेमार्फत पुण्यात ड्रोन मॅपिंग व सर्व्हेइंग प्रशिक्षण पूर्ण केले. भू-सर्वेक्षण, नकाशे तयार करणे, बांधकाम व नियोजन क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा याचे सखोल प्रशिक्षण त्यांना मिळाले. त्यामुळे रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने नवे मार्ग खुले झाले आहेत.
संजय काळे यांनी रायगडमध्ये ड्रोन मॅपिंग व सर्व्हेंइंगचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणामध्ये सुरक्षित उड्डाण नियमावली, आधुनिक ड्रोन हाताळणी याचे उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले. तसेच प्रत्यक्ष सरावही झाला.
प्रशिक्षणाच्या कालावधीत निवास, भोजन, प्रशिक्षण साहित्य व तांत्रिक सुविधा उत्तम दर्जाच्या होत्या. अनुभवी व तज्ज्ञ प्रशिक्षकांनी अतिशय सोप्या, व्यवहार्य व प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या पद्धतीने प्रशिक्षण दिले. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना काम करण्याचा आत्मविश्वास व कौशल्य या दोन्ही गोष्टी प्राप्त झाल्या.
लाखो रुपये खर्च करून घ्यावे लागणारे ड्रोन पायलट प्रशिक्षण अमृत संस्थेमार्फत मोफत उपलब्ध झाल्याने मोठा लाभ झाला असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय किंवा चांगल्या रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा मार्ग या प्रशिक्षणामुळे खुला झाला आहे, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया या लाभार्थ्यांनी व्यक्त केली. अमृत संस्थेचे हे उपक्रम युवकांच्या भविष्यासाठी निश्चितच दिशादर्शक ठरत आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9730151450
अकोला कार्यालय : 9112227636
अर्ज करण्यासाठी लिंक : https://app.mahaamrut.org.in/amrut-new/scheme/245
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment