कौशल्यप्राप्तीबरोबरच व्यवसाय सुरू करण्याचा आत्मविश्वासही मिळाल्याचा प्रशिक्षणार्थ्यांचा अनुभव; प्रमाणपत्रे वितरित
परतवाडा (जि. अमरावती) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी विविध योजना आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. त्याअंतर्गत अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील परतवाडा येथे गेला महिनाभर ॲडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाची नुकतीच सांगता झाली आणि १२ फेब्रुवारी रोजी त्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
या प्रशिक्षण कार्यक्रमात ३२ लाभार्थी सहभागी झाले होते. प्रमाणपत्र स्वीकारताना त्यांच्या चेहऱ्यावर कौशल्यप्राप्तीचे समाधान आणि उज्ज्व भविष्याचे स्वप्न तरळताना दिसत होते. या समारंभाला अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, उपव्यवस्थापक ऋषिकेश कथलकर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे (एमसीईडी) प्रकल्प अधिकारी राजेश सुने, आयोजक गणेश बहाड, प्रशिक्षिका जोत्स्ना राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी लाभार्थ्यांनी प्रशिक्षणावेळचे अनुभव सांगितले आणि आपला आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले. काहींनी स्वतःचा व्यवसाय सुरू केल्याची माहिती देऊन यशाची पहिली पायरी गाठल्याचे नमूद केले.
विभागीय व्यवस्थापकांनी सर्वांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन केले. व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक ते सर्व पाठबळ अमृत व 'एमसीईडी'मार्फत दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
एमसीईडी प्रकल्प अधिकाऱ्यांनीही लाभार्थ्यांना सीएमईजीपी योजनेचा लाभ घेऊन यशस्वीपणे व्यवसाय उभारण्याचे मार्गदर्शन केले. एकंदरीतच, लाभार्थ्यांनी प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत व्यक्त केले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment