बोधकथा - ३४
..... पुण्याच्या नैर्ऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय मोठे रमणीय स्थान होते. तेथे १६४५ साली एक विलक्षण प्रसंग घडला. शिवराय व आजूबाजूच्या खोर्यांमधली काही मावळे मंडळी मसलतीसाठी तिथे जमली होती. शिवराय तेव्हा वयाने कितीतरी लहान होते; पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती. त्यांनी एक मोठा घाट घातला होता. त्या देवालयात जमलेल्या सवंगड्यांना ते कळकळीने म्हणाले,
"गड्यांनो! मी आज तुम्हाला माझ्या मनातली एक गोष्ट सांगू का? आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत. त्यांनीच आम्हाला येथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे. दादाजीपंत या जहागिरीचा चोख कारभार पाहत आहेत. सर्व कसे छान चालले आहे; पण गड्यांनो मला यात मुळीच आनंद वाटत नाही. सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का? दुसर्याच्या ओंजळीनेच आपण पाणी प्यायचे का? आपल्या चारी बाजूंनी परकीय राजवटी आहेत. त्यांच्यामध्ये सारखी युद्धे चालू असतात. आपली माणसे त्यात नाहक मरतात. कुटुंबेच्या कुटुंबे देशोधडीला लागतात. आपल्या मुलखाची धूळधाण होते. आणि इतके सोसूनही आपल्या पदरी काय? तर गुलामगिरी! आपण हे किती दिवस सहन करायचे? दुसर्यासाठी आपण किती काळ खपायचे? सांगा, तुम्हीच सांगा! वतनांच्या लोभाने आपण हे असेच चालू द्यायचे का?"
शिवराय आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. बोलता बोलता ते थांबले. त्या तरुण सवंगड्यांकडे पाहू लागले. रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले. त्यांना नवीच दृष्टी मिळाली. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला,
"बोला बालराजे, बोला. आपला मनोदय सांगा आम्हाला. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत." "हो राजे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू! आमचे प्राणही देऊ."
ते सारे तेजस्वी तरुण वीर एका आवाजात बोलले.
मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले. एकेकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले, 'गड्यांनो! आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे, सर्वांनी खपायचे, सर्वांनी प्राणही अर्पण करायचे. ते आपले ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य. तुमचे, माझे, सर्वांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. परक्यांची गुलामी आता नको. उठा, या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू. स्वराज्यस्थापनेसाठी आम्ही आमचे सर्वस्व वाहणार.'
सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले. 'हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे, असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करू या.' शिवराय शेवटी निश्चयाने बोलले.
रायरेश्वराच्या देवालयातून सारे मावळे बाहेर पडले ते स्वराज्याच्या आणाभाका घेऊनच. शिवरायांचे मन उचंबळून आले. ते पुण्यास येताच तडक लाल महालात मातोश्रींकडे गेले. घडलेला प्रसंग त्यांनी आऊसाहेबांना सांगितला. त्या माऊलीला धन्य-धन्य वाटले. आपण मनी जे धरले ते बालराजे पूर्ण करणार अशी आशा, असा विश्वास त्यांना वाटू लागला.
(स्रोत : इयत्ता चौथीचे पाठ्यपुस्तक)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment