मनाची ताकद ओळखा - अमृत महाराष्ट्र

मनाची ताकद ओळखा

बोधकथा - ३६

मनाची ताकद ओळखा मुख्य फोटो
मनाची ताकद ओळखा अतिरिक्त फोटो

जुन्या काळातील गोष्ट आहे. एका राज्याच्या राजाचा एक अत्यंत आवडता हत्ती होता. हत्ती तरुण असताना त्याच्या पाठीवर बसून राजाने अनेक लढाया केल्या होत्या आणि विजयसुद्धा मिळवले होते. काळाच्या ओघात हत्ती म्हातारा झाला. त्यामुळे राजाने त्याला युद्धावर नेणे थांबवले; तरीही तो हत्ती त्याचा लाडका असल्याने त्याची उत्तम काळजी घेतली जात होती.

एके दिवशी तो हत्ती नेहमीप्रमाणे तलावात आंघोळीसाठी गेला. पाण्यात खेळताना तो अचानक तलावात चिखल जास्त असलेल्या बाजूला गेला आणि रुतून बसला. कितीही प्रयत्न केले, तरी त्याला त्यातून बाहेर पडता येईना. तो व्याकूळ होऊन मोठ्याने किंचाळू लागला. माहूत धावत आले. त्यांनी त्याला दोरखंड बांधून ओढण्याचा प्रयत्न केला, कुणी भाल्याने टोचून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला; पण काहीच उपयोग झाला नाही. उलट त्या प्रयत्नांनी हत्ती अधिकच, बावरला हैराण झाला आणि मनोधैर्य गमावून बसला.

घडलेला प्रकार राजाला कळताच त्याने हत्तीच्या जुन्या, अनुभवी माहुताला पाचारण केले. त्याने परिस्थिती पाहिली आणि राजाला विनंती केली, “महाराज, लगेच रणशिंगे फुंकण्याचा आणि युद्धनगारे वाजवण्याचा हुकूम द्या. युद्धाच्या वेळी देतात तशा घोषणा देण्यासाठी काही सैनिकांना इथे बोलवावे.” राजाने तत्काळ तशी आज्ञा केली. काही वेळातच रणदुंदुभी, नगारे वाजू लागले, सैनिकांची धावपळ सुरू झाली आणि सगळ्या वातावरणात एक वेगळाच उत्साह पसरला.

हे दृश्य पाहताच त्या वृद्ध हत्तीच्या अंगात पुन्हा जोश संचारला. तो पुन्हा रणांगणात उभा आहे, अशी भावना त्याच्या मनात जागी झाली. आपण आता काहीच करू शकत नाही, अशा नकारात्मक विचाराने खचलेले त्याचे मन पुन्हा प्रफुल्लित झाले. नव्या उत्साहाने त्याने शरीराला एक जोरदार झटका दिला आणि स्वतःला चिखलातून सोडवण्यात तो यशस्वी झाला.

तात्पर्य : मन खचले तर शरीर साथ देत नाही; पण आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार जागे झाले, तर कठीण परिस्थितीवरही मात करता येते.

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 23-02-2026 News publication date | Time: 11:13 AM News publication time | Views: 50 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 23-02-2026 News publication date | Time: 11:13 AM News publication time | Views: 50 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement