बोधकथा - ३८
नारदमुनींची गोष्ट आहे. त्यांना एकदा ईश्वरभक्तीचा गर्व झाला. आपल्यासारखा अन्य कोणीही भक्त या त्रिभुवनात नाही, असे त्यांना वाटू लागले. श्री विष्णूंच्या ते लक्षात आले. त्यांचा प्रिय भक्त कोण असे विचारले असता त्यांनी एका शेतकऱ्याचे नाव सांगितले आणि त्याची भेट घेण्यासाठी पृथ्वीवर पाठवले.
नारदमुनी पृथ्वीवर आले. त्यांनी त्या शेतकऱ्याचे निरीक्षण करायला सुरुवात केली. त्यांच्या असे लक्षात आले, की हा शेतकरी सकाळी उठल्यावर एकदाच हरिनाम घेऊन शेतात कामाला जातो. दिवस मावळेपर्यंत काम करून तो घरी येतो, जेवतो आणि पुन्हा एकदाच हरिनाम घेऊन झोपी जातो. हे पाहिल्यावर नारदमुनी पुन्हा श्री विष्णूंकडे आले. त्यांना ते म्हणाले, 'मी दिवसभर 'नारायण नारायण' म्हणत असतो. तरी तो शेतकरी तुमचा सर्वांत प्रिय भक्त आहे?'
मग विष्णूंनी नारदमुनींच्या हाती तेलाने काठोकाठ भरलेले एक पात्र दिले आणि त्यांना सांगितले, की 'यातील तेलाचा एक थेंबही न सांडता पृथ्वीप्रदक्षिणा करून ये.' त्याप्रमाणे पृथ्वीप्रदक्षिणा करून नारद परतले. विष्णूंनी विचारले, 'या कालावधीत माझे नामस्मरण किती वेळा केलेस?'
नारदमुनी म्हणाले, 'ते कसे करणार? माझे सगळे लक्ष तेल न सांडण्याकडे होते.'
श्री विष्णू म्हणाले, 'कुटुंबाच्या पालनपोषणासाठी शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करतो. तरीही तो दिवसातून दोनदा अत्यंत श्रद्धेने माझे नामस्मरण करतो. मग त्याची भक्ती का बरे श्रेष्ठ नसेल?
नारदमुनींना आपली चूक लक्षात आली.
बोध : काम कोणतेही असो, ते किती केले यापेक्षा कशा पद्धतीने आणि किती निष्ठापूर्वक केले, ही बाब महत्त्वाची.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment