जळगाव जिल्हा अनेक पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध आहे; शिवाय वैशिष्ट्यपूर्ण अशा स्थानिक खाद्यपदार्थांसाठी तो ओळखला जातो. पर्यटन हे स्थानिक शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन आहे.
जळगाव जिल्ह्यातील मनूदेवी हे ठिकाण यावल तालुक्यात आडगाव या ठिकाणी सातपुडा पर्वतरांगेत वसलेले आहे. देशभरातून भक्तगण या ठिकाणी येत असतात. नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते. नवसाला पावणारी मनूमातादेवी म्हणून ही प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात या ठिकाणी उंचावरून कोसळणारे धबधबे खूप आनंददायी असतात. म्हणून पर्यटक आपसूकच तिकडे वळताना दिसतात. फेसाळणाऱ्या धबधब्यांचा पर्यटक मनमुरादपणे आनंद घेताना दिसतात. येथे पाण्याचा खोल असा डोहही आहे. पट्टीचे पोहणारे येथे पोहण्याचा आनंद घेतात. पूर्वी या ठिकाणचे रस्ते चांगले नव्हते; मात्र आता येथे जाणे खूप सुलभ झाले आहे. येथे दाट जंगल आहे.
व्होकल फॉर लोकल
जळगाव जिल्ह्याच्या यावल, रावेर या दोन तालुक्यांच्या पट्ट्यात केळी हे बागायती नगदी पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यात कांदेबाग आणि मिरग बाग असे दोन प्रकार आहेत. पावसाळ्यात केळीच्या खोडाची लावणी केली जाते, ती मिरग बाग. रोपलावणीच्या मोसमात कांदे लावतात, ती कांदेबाग. हे दोन वर्षांचे पीक असते. बागेच्या जवळ अथवा रस्त्याच्या कडेला शेतकरी अथवा व्यावसायिक केळ्यांच्या चिप्ससाठी मातीची भट्टी स्वतः तयार करतात. लाकडाचे जळण तयार असतेच. बायका केळीची साल काढून देतात व पुरुष मंडळी भट्टीचे काम करताना दिसतात. वेळप्रसंगी महिलाही भट्टीचे काम करताना दिसतात. त्यात काही नवल नाही. केळ्यांपासून वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स बनवले जातात. तसेच केळीचे पीठ, केळीचे पापड अशा पदार्थांचा येणारे पर्यटक आस्वाद घेतात. यातून स्थानिक लोकांना व्यवसाय मिळतो. हे खाद्यपदार्थ मोठमोठ्या शहरातही पाठवले जातात. या तालुक्यातील भरताची वांगीही प्रसिद्ध आहेत. येथील भरीत आणि कळण्याच्या भाकरीही खूप चविष्ट असतात. बाहेरचे पर्यटक इकडे फिरायला आले, की ते अगोदर भरीत-भाकरीच्या मेनूची मागणी करतात. थंडीच्या दिवसांत भरीत-भाकरीची चव न्यारीच लागते! एकंदरीतच, पर्यटनातून या भागात अर्थप्राप्ती होताना दिसते.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment