कुकडी नदीच्या पात्रात निसर्गाची अद्भुत निर्मिती पाहायला मिळते. येथे २०० मीटर लांब आणि ६० मीटर रुंद परिसरात अनेक रांजणखळगे तयार झाले असून, त्यांनी चित्तवेधक शिल्परचना घडवली आहे.
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्याच्या शेवटी असलेले टाकळीहाजी गाव आणि नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गाव यांच्या सीमेवरून कुकडी नदी वाहते. या नदीच्या दोन्ही काठांवर बेसॉल्ट खडक पसरलेले आहेत. नदीच्या प्रवाहाबरोबर वाहून येणारे दगड-गोटे खडकांवरील खोलगट भागात अडकतात. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे हे दगड-गोटे त्या जागी गोलाकार फिरत राहतात आणि कालांतराने खोलगट भागांचे अर्धगोलाकार खड्ड्यांमध्ये रूपांतर होते. ही प्रक्रिया हजारो वर्षे चालते आणि पुढे हे खड्डे रांजणाकार खळग्यांच्या रूपात विकसित होतात.
पुण्याहून अहिल्यानगरकडे जाताना शिक्रापूरमध्ये प्रवेश केल्यानंतर उजवीकडे मलठण फाटा लागतो. तेथून ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर कुकडी नदीच्या काठावर वसलेली टाकळी हाजी आणि निघोज ही गावे आहेत. हे क्षेत्र पारनेर आणि शिरूर तालुक्यांच्या सीमेवर आहे. निघोजचे ग्रामदैवत मळगंगा देवी असून, तिचे मंदिर संपूर्ण संगमरवरात कोरलेले आहे. मंदिरासमोर सुमारे २५ फुटी दीपमाळ उभी आहे.
या मंदिरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर कुकडी नदीच्या पात्रात निसर्गाची अद्भुत निर्मिती पाहायला मिळते. येथे २०० मीटर लांब आणि ६० मीटर रुंद परिसरात अनेक रांजणखळगे तयार झाले असून, त्यांनी चित्तवेधक शिल्परचना घडवली आहे. नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकांचे स्तर एकाआड एक आढळतात. वेगाने वाहणाऱ्या पाण्याबरोबर आलेल्या दगड-गोट्यांच्या सततच्या घर्षणामुळे मृदू खडक झिजतो, तर कठीण खडकाचा भाग तसाच टिकून राहतो. या दीर्घकालीन प्रक्रियेतूनच रांजणखळग्यांची निर्मिती होते.
हे रांजणखळगे आशियातील सर्वांत मोठे कुंड म्हणून ख्यातकीर्त आहेत आणि शालेय शिक्षण अभ्यासक्रमात त्यांची नोंद आहे. कित्येक शतकांपासून या रांजणांमध्ये सतत पाणी साठलेले असते. दुष्काळाच्या काळातही येथे पाणी आटत नाही. १९९०च्या सुमारास गिनीज बुकने या ठिकाणाला जगातील अनवट स्थान म्हणून मानाचा दर्जा देऊन गौरवले आहे.
रांजणखळगे हे नदीच्या खननकार्यातून तयार झालेले एक महत्त्वाचे भूरूप आहे. रांजणखळग्यांतून खळाळणारे पाणी आणि खळग्यांमध्ये पाण्याची सततची हालचाल हा अनुभव वेगळाच असतो. येथे मोठी, मध्यम आणि छोटी अशी तीन प्रकारची खळगी दिसतात. मोठी खळगी शांत व संयमी भासतात, मध्यम आकाराची निराकार स्वरूपाची आहेत, तर छोटी खळगी पाण्याशी सतत मस्ती करणारी व अल्लडपणे वागणारी वाटतात. एकूणच हा संपूर्ण परिसर पाहणाऱ्याला थक्क करून सोडतो.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment