थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा २६ एप्रिल हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा अल्प परिचय...
रामानुजन यांचा जन्म त्या वेळच्या मद्रास इलाख्यातील तंजावर जिल्ह्यातील एरोड येथे २२ डिसेंबर १८८७ रोजी गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. कुंभकोणम या जवळच्या गावात त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांनी प्रारंभी स्वतःच त्रिकोणमितीचा अभ्यास केला व वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी लेनर्ड ऑयलर (१७०७-८३) यांनी पूर्वसूचित केलेली ‘ज्या व कोज्या’(Sine-Cosine) यांसंबंधीची प्रमेये मांडली. १९०३मध्ये त्यांना जी. एस. कार यांचा ‘सिनॉप्सिस ऑफ एलिमेंटरी रिझल्ट्स इन प्युअर अँड ॲप्लाइड मॅथेमॅटिक्स’ हा ग्रंथ अभ्यासण्याची संधी मिळाली. या ग्रंथात सुमारे ६००० प्रमेये होती व ती सर्व १८६० सालापूर्वीची होती. या ग्रंथामुळे रामानुजन यांच्या कुशाग्र बुद्धीला चालना मिळाली. १९०४मध्ये कुंभकोणम येथील गव्हर्न्मेंट कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश मिळाला व शिष्यवृत्तीही मिळाली. त्यांचे प्राध्यापक पी. व्ही. शेषू अय्यर यांनी रामानुजन यांचे गणितातील असामान्य प्रभुत्व हेरले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली रामानुजन यांचे वाचन व संशोधन चालू झाले. गणित या एकाच विषयावर लक्ष केंद्रित केल्यामुळे ते इंग्रजी व इतर विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाले व त्यामुळे त्यांची शिष्यवृत्ती बंद झाली. त्यानंतर ते प्रथम विशाखापट्टणमला व नंतर मद्रासला गेले. पुढील काही वर्षे त्यांचा निश्चित असा कोणताच व्यवसाय नव्हता; पण त्यांनी गणितातील आपले स्वतंत्र कार्य पुढे चालू ठेवले. नेल्लोरचे जिल्हाधिकारी रामचंद्र राव यांनी त्यांच्या चरितार्थाला काही काळ मदत केली व शिष्यवृत्ती मिळवण्यासाठीही प्रयत्न केले. हे प्रयत्नही निष्फळ ठरल्यावर १९१२मध्ये रामानुजन यांना मद्रास बंदर विश्वस्त मंडळाच्या (पोर्ट ट्रस्टच्या) कार्यालयात नोकरी मिळवण्यात यश आले. याच वेळी त्यांनी जर्नल ऑफ द इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी या नियतकालिकात आपले लेखन प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. त्यांपैकी पहिला निबंध बेर्नुली संख्यासंबंधी होता आणि त्यानंतर श्रेणी व अनंत गुणाकार आणि πचे मूल्य काढण्यासाठी भूमितीय रचना यांसंबंधी त्यांनी लिहिले.
त्यांच्या गणितीय कार्यात रस असलेल्या काही मित्रांनी प्रोत्साहन दिल्याने रामानुजन यांनी केंब्रिज येथील गणिताचे प्राध्यापक सर गॉडफ्री हॅरल्ड हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. पहिल्या पत्रात त्यांनी अविभाज्य संख्यांच्या वितरणासंबंधीच्या आपल्या संशोधनाविषयी, तसेच गणिताच्या विविध शाखांत स्वतः शोधलेल्या शंभराहून अधिक प्रमेयांसंबंधी लिहिले. या पत्रव्यवहाराने हार्डी प्रभावित झाले व त्यांनी रामानुजन यांना केंब्रिजला येण्याचे निमंत्रण दिले परंतु त्यांनी धार्मिक कारणास्तव ते नाकारले व त्यामुळे मद्रास विद्यापीठाची दोन वर्षांची शिष्यवृत्ती त्यांना मिळण्याची व्यवस्था करण्यात आली. पुढे हार्डी यांचे सहकारी ई. एच. नेव्हिल हे मद्रासला आलेले असता त्यांनी प्रयत्न करून रामानुजन यांची संमती मिळविली आणि १९१४मध्ये रामानुजन यांना केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजात प्रवेश देण्यात आला. हार्डी व जे. ई. लिटलवुड यांच्या मार्गदर्शनाखाली रामानुजन यांचा झपाट्याने विकास झाला. त्यांच्या मदतीने रामानुजन यांचे निबंध इंग्लिश व इतर युरोपीय नियतकालिकांत प्रकाशित झाले. इंग्लंडमधील पाच वर्षांच्या वास्तव्यात त्यांचे २१ निबंध प्रसिद्ध झाले व त्यांतील कित्येक हार्डी यांच्या सहकार्याने लिहिलेले होते. यांखेरीज इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या जर्नलमध्ये त्यांचे सुमारे १२ निबंध प्रसिद्ध झाले. केंब्रिज विद्यापीठातील अनुभवामुळे रामानुजन यांचे कार्य पुष्कळच विकसित झाले. हार्डी यांच्या मते रामानुजन यांची नैसर्गिक बुद्धिमत्ता त्यापूर्वीच ओळखली गेली असती, तर ते तुलनेने एक फार मोठे गणितज्ञ झाले असते.
रामानुजन यांचे गणितातील ज्ञान आश्चर्यकारक होते व त्यातील बहुतांश त्यांनी स्वतःच प्राप्त केलेले होते. पारंपरिक अपूर्णांकासंबंधी यापूर्वी काय विकसित केले गेलेले आहे यासंबंधी त्यांना अजिबात माहिती नव्हती, तरीही या विषयातील त्यांचे प्रावीण्य त्या काळच्या इतर गणितज्ञांच्या तुलनेने अनन्यसाधारण होते. इंग्लंडमधील वास्तव्यातील पहिल्या निबंधात त्यांनी π चे आसन्न मूल्य (खऱ्या मूल्याच्या जवळपास असणारे मूल्य) काढण्याच्या निरनिराळ्या पद्धती दिलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी विशेषत्वाने संख्या विभाजन फलनाच्या गुणधर्माविषयी काम केले व ते अतिशय मोलाचे मानले जाते. त्यांनी संख्या सिद्धांतात केलेले कार्य भौतिक व संगणक विज्ञानातील काही समस्या सोडवण्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याचे अलीकडे दिसून आले आहे. त्यांच्या कार्याचा विविध देशांतील गणितज्ञ अद्यापही अभ्यास करत आहेत. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त १९८७मध्ये अनेक देशांत त्यांच्या कार्यासंबंधी विचारविनिमय करण्यासाठी चर्चासत्रे व परिषदा आयोजित करण्यात आल्या होत्या.
इ. स. १९१७मध्ये रामानुजन क्षयरोगाने आजारी पडले व त्यामुळे इंग्लंडमधील त्यांचे उर्वरित वास्तव्य निरनिराळ्या आरोग्यधामांमध्ये गेले. १९१८मध्ये रॉयल सोसायटीचे सदस्य व ट्रिनिटी कॉलेजाचे अधिछात्र म्हणून त्यांची सन्मानपूर्वक निवड झाली. प्रकृती सुधारल्यावर १९१९मध्ये ते भारतात परत आले. मद्रास विद्यापीठाने दरसाल २५० पौंडांची शिष्यवृत्ती त्यांना पाच वर्षांकरिता मंजूर केली. परंतु मद्रासजवळील चेटपुट येथे २६ एप्रिल १९२० रोजी त्यांचे निधन झाले. अखेरपर्यंत ते गणितातील संशोधनात मग्न होते. त्यांचे सर्व संशोधन कार्य जी. एच. हार्डी, पी. व्ही. शेषू अय्यर व बी. एम. विल्सन यांनी संपादित करून ‘कलेक्टेड पेपर्स ऑफ श्रीनिवास रामानुजन (१९२७)’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केले. त्यांनी केलेली विविध टिपणे नोटबुक्स ऑफ श्रीनिवास रामानुजन (२ खंड, १९५७) या ग्रंथाद्वारे प्रसिद्ध झाली आहेत.
(संदर्भ : मराठी विश्वकोश)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment