ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांचा २८ एप्रिल हा जन्मदिन.
प्रसिद्ध मराठी साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी गेल्या सहा-सात दशकांत सातत्यपूर्ण लेखन करून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या समृद्ध आणि वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत. त्यांनी कथा, कादंबरी व ललित गद्य या वाङ्मयप्रकारात विपुल निर्मिती केली. याबरोबरच कविता, नाटक ,चरित्र व आत्मचरित्र हे वाङ्मयप्रकारही हाताळले. त्यांचे कथा आणि कादंबरी वाङ्मयप्रकारातील योगदान लक्षणीय आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध स्तरातील साहित्य आणि संस्कृती विषयक संस्थांवर त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. साहित्यनिर्मिती आणि साहित्यविषयक कार्यामुळे त्यांना बरीच लोकप्रियता लाभली आहे.
मधू मंगेश कर्णिक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील करूळ गावचे. त्यांचे मूळ नाव आरस. कर्णिक ही त्यांच्या पूर्वजांना इंग्रजांनी दिलेली सनद. त्यावरून त्यांचे नाव कर्णिक पडले. २८ एप्रिल १९३१ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील ब्रिटिशांच्या काळात खोत होते. ते सातव्या इयत्तेपर्यंत शिकले होते. मधू मंगेश कर्णिक चार वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या आईचे निधन झाले. परिणामी त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागले. कर्णिक कुटुंबातील दहा अपत्यांपैकी मधू मंगेश कर्णिक नवव्या क्रमांकाचे होते. त्यांचे शालेय शिक्षण करूळ आणि कणकवलीत झाले. तेव्हा त्यांच्यावर मोडक व साळवी मास्तरांचा विशेष प्रभाव पडला. कणकवली येथील माध्यमिक विद्यालयातून ते १९५१ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. कोकणातील जैतापूरजवळील विजयदुर्ग बंदर या ठिकाणी परिवहन खात्यात लेखनिक म्हणून १९५२मध्ये त्यांच्या नोकरीची सुरुवात झाली. १९५६मध्ये त्यांची मुंबईला बदली झाली. मुंबईतील अनुभवामुळे त्यांच्या लेखनाचा परीघ विस्तारत गेला. अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम करत ३० सप्टेंबर १९८३ रोजी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
कर्णिक यांच्या साहित्यनिर्मितीचा आरंभ त्यांच्या शालेय जीवनापासून झाला. ते इंग्रजी चौथीत असताना मालवणच्या पारूजी नारायण मिसाळ यांच्या बालसन्मित्र पाक्षिकात त्यांची पहिली कविता छापून आली. तिथून प्रेरणा घेऊन मधू मंगेश कर्णिक लिहू लागले. १९५१मध्ये रत्नाकर या साप्ताहिकात त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्या कथेचे नाव 'कृष्णाची राधा.' विजय तेंडुलकर संपादित 'वसुधा' मासिकात, मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या 'कथासृष्टी' मासिकात त्यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. व्यंकटेश माडगूळकरांच्या 'माणदेशी माणसं' या कादंबरीचा फार मोठा प्रभाव पडला. १९५८ साली मालवणच्या मराठी साहित्य संमेलनात पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते ‘कोकणी गं वस्ती’ या त्यांच्या पहिल्या कथासंग्रहाचे प्रकाशन झाले. त्यानंतर वाङ्मयशोभा, किर्लोस्कर, वसंत, वसुधा, सत्यकथा या मासिकामध्ये त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. याशिवाय काही दूरदर्शन मालिका, मराठी-हिंदी चित्रपटांच्या पटकथा, आकाशवाणीवरील नभोनाट्ये, श्रुतिका, भाषणे, अनुवाद, स्तंभलेखन यातही त्यांचे भरीव योगदान आहे. लघुउद्योग या मासिकाचे संपादन त्यांनी केले आहे. लघुउद्योगांविषयी चार ग्रंथ आणि लघुउद्योग नावाचे पुस्तकही त्यांच्या नावावर आहे.
माहीमची खाडी, भाकरी आणि फूल व संधिकाल या मधू मंगेश कर्णिकांच्या कादंबऱ्या मराठी कादंबरी परंपरेत महत्त्वाच्या ठरतात. कथा आणि कादंबरी या दोन्ही प्रकारांत कर्णिकांनी समरसून लिहिले. मानवी व्यवहाराचे सूक्ष्म निरीक्षण, मनुष्यस्वभावाचे अचूक ज्ञान, कमालीचा आत्मविश्वास, प्रचंड कष्ट घेण्याची तयारी, सदैव हसतमुख, जन्मजात प्रतिभा आणि समृद्ध अनुभवविश्व या कारणामुळे कर्णिकांच्या कथात्मक लेखनात मानवी जीवन आणि निसर्ग निर्मितीबद्दलचे कुतूहल प्रकटले आहे. अनेक जातीची, धर्माची, पंथाची माणसे त्यांच्या कादंबरीत पहावयास मिळतात. नातेसंबंधातील गुंतागुंत, नियतीशरणता, मन आणि देहबोलीतील उत्कटता, दरिद्री माणसाबद्दलची करुणा, परंपरा आणि आधुनिकता यातील संघर्ष त्यांच्या कथात्मक साहित्यात पहावयास मिळतो. महानगर आणि ग्रामीण जीवन म्हणजेच मुंबई आणि कोकण हे कर्णिकांच्या लेखनाचे केंद्र राहिले आहे. तसेच जीवन अनुभवातील विविधता हे त्यांच्या वाङ्मयाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कथात्मक साहित्याबरोबरच त्यांनी ललित गद्य लेखनही केले आहे.
लागेबांधे आणि अबीर गुलाल या त्यांच्या व्यक्तिचित्रणात्मक ग्रंथांतून कोकणी माणसाचे सचित्र दर्शन घडते. जगन्नाथ आणि कंपनी, शाळेबाहेरील सवंगडी, चिमणचारा अशी पुस्तके लिहून त्यांनी बालसाहित्यात हजेरी लावली आहे. देवकी, केला तुका झाला माका या नाटकांतून त्यांनी वेगळ्या जीवन अनुभवांचे दर्शन घडवले. 'शब्दांनो मागुते या' हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. करूळ गावाबद्दल त्यांच्या मनात अपार प्रेम आहे. त्या प्रेमाला त्यांनी 'करूळचा मुलगा' या आत्मचरित्रामध्ये शब्दबद्ध केले आहे.
मधू मंगेश कर्णिक यांचा पिंड जसा साहित्यिकाचा आहे. तसाच तो सामाजिक-सांस्कृतिक कार्यकर्त्याचाही आहे. कोकणी माणूस आणि कोकणी मुलूख हा त्यांच्या निष्ठेचा विषय आहे. या निष्ठेतून कोकण मराठी साहित्य परिषद, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, करूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, केशवसुत स्मारक, कोकण कला अकादमी अशा कितीतरी चांगल्या गोष्टी त्यांनी निर्माण केल्या. १९९० साली रत्नागिरीत भरलेल्या ६४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. अस्मितादर्श साहित्य मेळाव्याचे अध्यक्षपदही त्यांना लाभले. केंद्र शासनाच्या पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. तोरण (१९६४), तहान (१९६६), माहीमची खाडी (१९६९) या पुस्तकांसाठी त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळाले. मॅजेस्टिक पुरस्कार, मॅग्नम फाउंडेशन पुरस्कार, भैरूरतन दमाणी पुरस्कार, रणजित देसाई पुरस्कार इत्यादी पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
(संदर्भ : मराठी विश्वकोश)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment