अरुण दाते

सुप्रसिद्ध भावगीत गायक अरुण दाते यांच्या जन्मदिनानिमित्त (४ मे) त्यांचा अल्प परिचय...

अरुण दाते मुख्य फोटो
मुख्य फोटो

मराठी भावगीत गायकीला गझलसदृश मुलायम वळण देणारे प्रथितयश गायक म्हणजे अरुण दाते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर येथे ४ मे १९३४ रोजी झाला. त्यांचे वडील रामूभैया हे शासकीय अधिकारी आणि साहित्याचे व शास्त्रीय संगीताचे जाणकार होते. त्यांच्या आई माणिकबाई या गृहिणी होत्या. अरुण दातेंच्या घरात अल्लादियाखाँ, अहमदजान थिरकवा, गोविंदराव टेंबे, हिराबाई बडोदेकर, बेगम अख्तर अशा संगीत कलावंतांचा व वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे, ना. सी. फडके अशा साहित्यिकांचा सहज वावर असे. त्यांच्या चर्चांतून, मैफलींतून तसेच वडलांच्या संग्रहातील ध्वनिमुद्रिकांच्या श्रवणातून शास्त्रीय संगीताचे, साहित्याचे व उर्दू शायरीचे संस्कार अरुण दाते यांच्यावर झाले. त्यांना उर्दू गझल व हिंदी गाणी म्हणण्याचा छंद जडला. त्यांच्या मूळच्या मुलायम आवाजाला, गळ्यातील उत्तम फिरतीला शब्दानुरूप उच्चारांच्या पोताची जोड होती. या त्यांच्या गायनवैशिष्ट्यांना त्यांच्या वडिलांनी सुरेलपणाचे कोंदण दिले. अरुण दाते यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण इंदूरला झाले. त्या वयात त्यांना क्रिकेटची व नाट्याभिनयाचीही आवड होती. 

प्रख्यात गायक तलत मेहमूद हे अरुण दातेंचे गायनातील आदर्श होते. दाते कुमार गंधर्वांकडून गझलगायन शिकले. त्यानंतर सुगम संगीतातील गुरू के. महावीर (मुंबई) यांच्याकडे इंदूरला त्यांचे पद्धतशीर गंडाबंधन झाले. ते मुंबईत हार्मोनियमवर तालीम व रियाझ करत. हे करतानाच मर्फी मेट्रो गायन स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. तेथे त्यांना यश मिळाले (१९५८). नंतर त्यांनी हिंदी गाण्यांचे जाहीर कार्यक्रम करायला सुरुवात केली. आकाशवाणीची हिंदी गाण्यांची चाचणी पास झाल्यानंतर (१९६०) त्यांनी आकाशवाणीच्या भावसरगम कार्यक्रमात हिंदी गीतांचे व गझलांचे गायन केले. तेथेच त्यांचा मराठीतील ख्यातनाम संगीतकार यशवंत देव यांच्याशी परिचय झाला. ते मूळचे इंदूरचे असल्याने त्यांना मराठीचा फारसा सराव नव्हता. त्यामुळेच सुरुवातीला त्यांनी मराठीतील प्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांनी दिलेल्या गायनाच्या निमंत्रणालाही नकार दिला; पण खळे यांच्या आग्रही पाठपुराव्याला यश मिळाले. १९६०मध्ये त्यांनी सुधा मल्होत्रा यांच्यासह गायलेल्या आणि पुढे लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या ‘शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी’ या गाण्याचे ध्वनिमुद्रण केले. आकाशवाणीच्या ‘मासिक गीत’ या कार्यक्रमात या गाण्याचे प्रक्षेपण झाले. आकाशवाणीवर अनवधनाने गायकाचे नाव ‘अरविंद’ ऐवजी ‘अरुण’ सांगितले गेले आणि तेच नाव पुढे कायम झाले. 

त्याच वर्षी त्यांची ‘अखेरचे येतील माझ्या’, ‘सखी शेजारिणी’ इत्यादी आणखी चार गाणी (पाचही गीतांचे गीतकार मंगेश पाडगावकर) एचएमव्हीने ध्वनिमुद्रित केली. ती सर्व गाणी व त्याचबरोबरीने गायक म्हणून अरुण दातेही लोकप्रिय होत गेले. याचदम्यान त्यांनी मुंबईतील व्हीजेटीआय या शैक्षणिक संस्थेतून टेक्स्टाइल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि पुढे बिर्ला (सिमको), टाटा, मफतलाल इत्यादी प्रथितयश संस्थामध्ये काम केले. १९६० ते ७० हा त्यांच्या गायन कारकीर्दीचा सुवर्णकाळ ठरला. त्यांनी गायलेल्या गाण्यांपैकी अनेक गाणी अतिशय लोकप्रिय झाली. त्यांची ग्वाल्हेरला बदली झाल्यावर भोपाळ आकाशवाणीवर त्यांचे कार्यक्रम प्रसारित होऊ लागले. १९८७मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्णवेळ संगीताला वाहून घेतले. 

अरुण दातेंनी गायलेली ‘शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी’, ‘येशील येशील येशील, राणी पहाटे पहाटे येशील’, ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘अखेरचे येतील माझ्या, तेच शब्द ओठी’, ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भेट तुझी माझी स्मरते’, ‘संधिकाली या अशा’ इत्यादी गाणी खूप गाजली व ती आजही श्रोत्यांना आवडतात. अरुण दाते यांना श्रीनिवास खळे, यशवंत देव, हृदयनाथ मंगेशकर असे दर्जेदार संगीतकार लाभले. सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल, लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, कुंदा बोकील, अनुराधा मराठे व कविता कृष्णमूर्ती इत्यादी नामवंत सहगायिकांसोबत गायलेली त्यांची अनेक गाणी खूप प्रसिद्ध झाली. भारतात व अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, मस्कत इत्यादी विविध देशांत मिळून त्यांचे गायनाचे सुमारे दोन हजार कार्यक्रम झाले.

शतदा प्रेम करावे हे तर त्यांच्या कार्यक्रमांचे, ध्वनिमुद्रिकेचे व आत्मचरित्राचेही शीर्षक आहे. त्याशिवाय ‘शुक्रतारा मंदवारा’ या शीर्षकाखालीही त्यांनी अनेक कार्यक्रम केले. वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यावर पुणे महानगरपालिकेतर्फे महापौरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याशिवाय १९९३मध्ये अमेरिकेतल्या तुसाँ सिटीतर्फे मानद नागरिकत्व त्यांना देण्यात आले. ते गजाननराव वाटवे पुरस्काराचे व महेंद्र कपूर पुरस्काराचे पहिले मानकरी होते. महाराष्ट्र पत्रकार संघाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. अशा या थोर गायकाचे ६ मे २०१८ रोजी मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या प्रतिभेला वंदन!

(संदर्भ : मराठी विश्वकोश)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 04-05-2026 News publication date | Time: 06:55 AM News publication time | Views: 217 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 04-05-2026 News publication date | Time: 06:55 AM News publication time | Views: 217 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement