भारतीय संस्कृती आणि भारतीय जीवनपद्धती हे भारतीय संविधानाचे मूळ

भारतीय संविधानाचे मूळ हिंदून्यायतत्त्वशास्त्राच्या आधारावरच आहे, याची प्रचीती आपल्याला संविधानाच्या अभ्यासावरून येतेच.

भारतीय संस्कृती आणि भारतीय जीवनपद्धती हे भारतीय संविधानाचे मूळ मुख्य फोटो
मुख्य फोटो

जगातील सर्वांत मोठे लिखित संविधान (राज्यघटना), जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीची धारणा करणारे संविधान ७५ वर्षांचे झाले. ही वाटचाल सव्वाशे सुधारणांचीही असली, तरी या अनेक दुरुस्त्यांनी संविधानाचे सामर्थ्य वाढवलेच आहे. भारतीय संविधानात हिंदू न्यायशास्त्राची प्रचीती आपल्या सर्वांना येते. भारतीय संविधानाचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये आपण बघितली, तर आपल्या लक्षात येईल, की भारतीय संविधानात असलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तिन्ही तत्त्वे हिंदू न्यायशास्त्रात अधोरेखित आहेत. 

भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणभूमीत अर्जुनाला भगवद्गीतेचे ज्ञान दिले. योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथी होऊन गीतेचे ज्ञान देत असतानाचे चित्र संविधानाच्या भाग चारमध्ये आहे. विशेष म्हणजे संविधानाचा भाग चार हा राज्याला राज्य कसे करावे याची निर्देशक तत्त्वे सांगतो आणि भगवान श्रीकृष्णसुद्धा अर्जुनाला धर्माची निर्देशक तत्त्वे सांगत आहेत. या दोन्ही बाबींमध्ये फारसा फरक नाही.

आजचा काळसुद्धा हिंदू समाजातील राजकर्त्यांसाठी धर्मयुद्धासारखाच आहे. आजचे कुरुक्षेत्र म्हणजे आपले आपले मतदारक्षेत्र. त्यामुळे आपल्या मतदार क्षेत्रात काम करतांना अधर्माच्या मुसक्या आवळून धर्माची बाजू घ्यावी लागणार आहे. आजची रणभूमी, युद्धभूमी ही देशविघातक शक्ती आहेत, मतांतरण आहे, धर्मांतरण आहे, भारतीय संविधानाचा अपप्रचार करणारी टोळी आहे. ज्या प्रकारे भगवान श्रीकृष्णाच्या धर्माबद्दलच्या निर्देशक तत्त्वांचे पालन अर्जुनाने केले आणि धर्मयुद्ध जिंकले, त्याचप्रमाणे आजच्या सत्ताधाऱ्यांनी संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांना पूर्णत्वाला घेऊन जायचे कार्य करायचे आहे. भारतीय संविधानाचे मूळ हिंदून्यायतत्त्वशास्त्राच्या आधारावरच आहे, याची प्रचीती आपल्याला संविधानाच्या अभ्यासावरून येतेच.

संविधानकर्ते किती दूरदृष्टीचे होते! त्यांनी संविधान तयार करताना मार्गदर्शक तत्त्वांबरोबर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करतानाचे चित्र देऊन राज्यकर्त्यांना धर्माचे म्हणजेच सत्याचे पालन करण्याचे मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. हिंदू ही एक जीवनपद्धती आहे. ती एकच ग्रंथ, एकच प्रेषित, एकाच प्रकारची उपासना पद्धती, अशी एकेश्वरवादी, एक ग्रंथप्रामाण्यवादी उपासना पद्धती नाही. ही संकल्पना सर्वप्रथम समजून घ्यावी लागते. या जीवनपद्धतीचे पहिले वैशिष्ट्य आहे ते सर्वसमावेशकतेचे आणि आपली राज्यघटना ‘कलम एक’पासून सर्वसमावेशक आहे. भारतातील मुसलमानांनी आंदोलन करून पाकिस्तान निर्माण केले, म्हणून आपले संविधान भारतातील मुसलमानांना नागरिकत्व नाकारीत नाही, धर्माच्या आधारे त्यांना वेगळी वागणूक देत नाही. हा सर्वांचा देश आहे, ही संविधानाची भूमिका पहिल्या कलमापासून आहे. 

जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत, ते ‘कलम १३’पासून ‘३२’पर्यंत आहेत. हे सगळे मूलभूत अधिकार भारतात राहणाऱ्या सर्व लोकांसाठी आहेत, मुसलमानांसाठी, ज्यूंसाठी आहेत. ही सर्वसमावेशकता आपले जीवनमूल्य आहे. ते यातून व्यक्त होते. आता हे स्पष्ट करायचे असेल, तर जगातील काही संविधानांची तुलना करावी लागते. १७८७ साली अमेरिकेचे पहिले लिखित संविधान निर्माण झाले. हे संविधान अमेरिकेतील फक्त गोऱ्या लोकांसाठी होते. तिथल्या निग्रो लोकांना त्यात काही अधिकार नव्हते. स्त्रियांनादेखील काही अधिकार नव्हते. नंतर हळूहळू काळ बदलत गेला आणि संविधानात सुधारणा होत गेल्या. परंतु, हे संविधान निर्माण करत असताना ते 'एक्स्क्लुझिव्ह' संविधान आहे, इन्क्लुझिव्ह' नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे. 

१९२० साली लेनिनने रशियाचे संविधान निर्माण केले. या संविधानाने फक्त श्रमिकालाच अधिकार दिले. भांडवलदार, राजघराण्यातील लोक, सरदार, उमराव वगैरे मंडळींना काही राजकीय अधिकार दिलेले नव्हते. मतदानाचादेखील अधिकार नव्हता. रेशन मिळण्याचादेखील अधिकार नव्हता, अशी त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली. याला एक्स्क्लुझिव्ह संविधान म्हणतात. आपले संविधान इन्क्लुझिव्ह आहे. भारताचे दुसरे सनातन मूल्य असे आहे, की परमेश्वराची आराधना ज्याला त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. आपल मत दुसऱ्यावर लादायचे नाही. नुसता हिंदू हा शब्द घेतला, तरी निरीश्वरवादी, ईश्वर मानणाऱ्यांना, मूर्तिपूजा करणाऱ्यांना, मूर्ती नाकारणाऱ्यांनाही हिंदूच म्हणतात. एखाद्या महान संतांची पूजा करू, गोरखनाथांची पूजा करू, स्वामी समर्थांची पूजा करू असे म्हणणारेदेखील हिंदूच असतात. तेव्हा प्रत्येकाला त्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे उपासनेचे स्वातंत्र्य आपल्याकडे दिलेले आहे. राज्यघटनेने कलम २५-२६मध्ये हे सर्व अधिकार नागरिकांना दिलेले आहेत. म्हणजे सर्वांना त्यांच्या त्यांच्या आवडीने ईश्वराची उपासना करण्याच्या स्वातंत्र्याचे अधिकार दिले आहेत ही आपली सनातन परंपरा आहे. अशा प्रकारची मूल्ये आपण घेतलेली आहेत. स्त्रीकडे बघण्याची आपली दृष्टी शक्तिरूप असते आणि म्हणूनच स्त्रियांना नाकारायचे नाही, त्यांचे अधिकार नाकारायचे नाहीत म्हणून लिंगभेदाचे तत्त्व संविधानाने नाकारले. जे अधिकार पुरुषांना तेच स्त्रियांना. त्यामुळे भारतीय संविधान हिंदू जीवनपद्धतीला अनुसरूनच आहे आणि हेच या संविधानाचे वैशिष्ट्य आहे.

– ॲड. संकेत राव

(संदर्भ : भारतीय संविधान; स संविधानाचा - रमेश पतंगे.)

Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 29-04-2026 News publication date | Time: 11:52 AM News publication time | Views: 885 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news
Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 29-04-2026 News publication date | Time: 11:52 AM News publication time | Views: 885 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement