बालकवी

पाच मे या स्मृतिदिनानिमित्त बालकवींचा हा अल्प परिचय...

बालकवी मुख्य फोटो
मुख्य फोटो

बालकवी म्हणजे एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी. त्यांचे पूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे १३ ऑगस्ट १८९० रोजी झाला. बालकवींच्या वडिलांची पोलीस खात्यातील नोकरी फिरतीची असल्यामुळे त्यांच्या शिक्षणाची आबाळ झाली. एरंडोल, यावल, जामनेर, बेटावद अशा निरनिराळ्या ठिकाणी त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. श्रीसमर्थभक्त शंकरराव देव यांचे धुळे येथील प्रिपरेटरी स्कूल आणि अहिल्यानगर येथील अमेरिकन मिशन हायस्कूल या शाळांमध्ये त्यांचे इंग्रजी शिक्षण झाले. देशभक्तीच्या तत्कालीन कल्पनांच्या प्रभावामुळे बालकवींना, तसेच त्यांच्या वडिलांना, इंग्रजी शिक्षणाबाबत फारसा उत्साह नव्हता. त्यामुळे त्यांनी बराचसा अभ्यास घरीच केला. बालकवींची वडील बहीण जिजी हिने त्यांना संस्कृताचे आरंभीचे पाठ दिले. कवितेची गोडीही तिनेच लावली. पुढे त्यांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळविले. त्यांच्या कवितेतील शब्दयोजनेत संस्कृतचा प्रभाव जाणवतो. पंडिती कविता आणि शाहिरी कविता यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. इंग्रजी कवितेचे त्यांचे वाचन मर्यादित असले, तरी इंग्रजी कवितेची त्यांची समज उत्तम होती. अहिल्यानगरच्या मिशन स्कूलमध्ये, तसेच महाबळेश्वर येथील ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या एका शाळेत ते काही काळ अध्यापक होते.

वयाच्या तेराव्या वर्षी नवापूर येथे असताना त्यांनी आपली पहिली कविता लिहिली. त्या कवितेला त्यांनी शीर्षक दिलेले नव्हते. कवितेच्या लयीची जाणीव, निसर्गप्रेम, श्रद्धा ही बालकवींच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये त्यांच्या या पहिल्या कवितेत बीजरूपाने जाणवतात. पुढे तीन-चार वर्षांत त्यांची कविता अधिकाधिक खुलत गेली आणि जळगाव येथे भरलेल्या पहिल्या मराठी कविसंमेलनात (१९०७) त्यांनी केलेल्या काव्यवाचनामुळे प्रभावित होऊन संमेलनाध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्यांना ‘बालकवी’ हे नाव देऊन त्यांचा गौरव केला. त्यानंतर लवकरच मराठीतील श्रेष्ठ कवी म्हणून त्यांचा लौकिक झाला आणि ‘बालकवी’ हे नावही रूढ झाले.

बालकवींची विशेष ख्याती आहे ती निसर्गकवी म्हणून. किंबहुना त्यांच्या बहुतेकशां कवितांमध्ये निसर्ग मध्यवर्ती आहे. त्यांच्या काही नामांकित कवितांची शीर्षकेच पाहा : ‘निर्झरास’,‘फुलराणी’,‘संध्या-रजनी’,‘अरुण;’पण रूढ अर्थाने निसर्गसौंदर्याचे वर्णन हा अशा कवितांचा हेतू नाही. निसर्गाशी एकरूप झालेल्या कविमनाचे ते शब्द आहेत. निसर्गातील विविध दृश्यांमध्ये त्यांना मानवी भावना दिसतात. विषयाशी असे एकरूपत्व ज्या संवेदनाशक्तीमुळे बालकवींना साध्य होऊ शकले, ती आधुनिक मराठी कवितेत काहीशी अनोखी होती. बालकवींचा पिंडच निराळा होता पण बालकवी म्हणजे स्वप्नाळू, निरागस बालवृत्तीचे कवी नव्हते तर त्यांच्या उत्तर आयुष्यातील काही कवितांचा सूर अगदी निराळा आहे. बालभावाने बांधलेली आणि जोपासलेली स्वप्नसृष्टी काजळत आणि कोलमडत आहे या दुःखाची तडफड ‘कविबाळे’ या कवितेत आहे. सृष्टीची खिन्न, उजाड रूपे त्यांच्या मनाला घेरताना दिसतात. ‘काय बोचते ते समजेना, हृदयाच्या अंतर्हृदयाला’ अशी जीवघेणी अस्वस्थता त्यांना विफल करते. 

‘आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे’ म्हणून बागडणाऱ्या बालकवींइतकेच हे त्यांच्या ‘पारव्या’प्रमाणे खिन्न, नीरस एकांतगीत गाणारे बालकवी खरे आहेत. बालकवींनी काही बालगीतेही लिहिली. त्यांतील गीतगुण सहजसुंदर आहे आणि बालवृत्तीही. त्यांतील पक्ष्यांविषयीची गीते विशेष सुंदर आहेत. बालकवींच्या सर्वच कवितांच्या रचनेतील नादमयता आणि चित्रगुण अकृत्रिम आणि असामान्य आहेत. अशा या थोर कवीने अगदी आकस्मिकरीत्या जगाचा निरोप घेतला. ५ मे १९१८ रोजी जळगावजवळील भादली स्टेशनपाशी रेल्वेचे रूळ ओलांडताना रेल्वेखाली सापडून बालकवींना मरण आले. या थोर साहित्यिकाला वंदन!

(संदर्भ : मराठी विश्वकोश)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 05-05-2026 News publication date | Time: 06:55 AM News publication time | Views: 195 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 05-05-2026 News publication date | Time: 06:55 AM News publication time | Views: 195 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement