उन्हाळ्याचे रौद्र रूप आणि उष्माघाताचे संकट

सावधगिरीचे उपाय

उन्हाळ्याचे रौद्र रूप आणि उष्माघाताचे संकट मुख्य फोटो
मुख्य फोटो

निसर्गाचे चक्र बदलत असून, यंदा उन्हाळ्याने रौद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा चाळिशीपार गेला असून, सूर्याच्या प्रखर किरणांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते, २०२६ हे भारताच्या हवामान इतिहासातील सर्वांत उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे. या भीषण परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने ‘हीट वेव्ह’ अर्थात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

जागतिक हवामानबदलामध्ये ‘सुपर एल निनो’ ही घटना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. समुद्रसपाटीचे तापमान वाढल्यामुळे जगभरातील हवामानावर याचे विपरीत परिणाम होतात. यामुळे भारतात मान्सूनवर विपरीत परिणाम होण्याची आणि उन्हाळ्याची तीव्रता कमालीची वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक राज्यांत तापमान ४५ अंश सेल्सिअसवर जाण्याचे संकेत आहेत.

भारतीय हवामान विभागाच्या मानकानुसार किनारी प्रदेशात सलग दोन दिवस कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहिल्यास म्हणजेच तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा ४.५ अंश सेल्सिअस ते ६.४ अंश सेल्सिअसने वाढते, तेव्हा त्याला ‘उष्णतेची लाट’ म्हणतात. जेव्हा तापमान सरासरीपेक्षा ६.५ अंश सेल्सिअसहून अधिक वाढते, तेव्हा त्याला अतिउष्णतेची लाट म्हणतात. सीव्हीअर हीट वेव्ह ही स्थिती जीवघेणी ठरू शकते.

उष्माघाताची लक्षणे : वेळीच ओळखा धोका

उष्माघात ही केवळ थकव्याची अवस्था नसून, ती एक वैद्यकीय आणीबाणी आहे. खालील लक्षणे दिसताच सावध व्हावे.

१. शरीराचे तापमान कमालीचे वाढणे; पण घाम न येणे.

२. चक्कर येणे, डोकेदुखी किंवा मळमळणे.

३. त्वचा कोरडी आणि लाल होणे.

४. तीव्र तहान लागणे आणि लघवीचे प्रमाण कमी होणे.

५. लहान मुलांमध्ये प्रचंड चिडचिड आणि सुस्ती येणे. उष्णतेपासून बचावासाठी ‘या गोष्टी’ करा...

जलसंजीवन मंत्र

तहान लागलेली नसली तरीही दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या.

नैसर्गिक पेये आहारात ठेवा. लिंबू सरबत, ताक, शहाळ्याचे पाणी, कोकम सरबत आणि घरगुती पन्हे ही पेये शरीरातील ओलावा टिकवून ठेवतात.

पोशाख आणि घराबाहेर पडताना घ्यायची काळजी

बाहेर पडताना नेहमी सुती, हलके आणि पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे कपडे घाला.

डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल्स वापरा.

शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर पडणे टाळा.

आहारातील बदल

उच्च प्रथिनयुक्त (हाय प्रोटीन) आहार आणि मांसाहार उन्हाळ्यात कमी करावा. कारण तो पचायला जड असतो.

बाहेरील उघड्यावरचे पदार्थ किंवा शिळे अन्न खाणे टाळा.

अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड कोल्ड ड्रिंक्स टाळा. कारण यामुळे शरीरातील पाणी कमी होते.

घरातील व्यवस्थापन

दुपारच्या वेळी खिडक्यांना पडदे लावून ठेवा. रात्री हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा.

घरातील वृद्धांची आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्या.

सामाजिक जबाबदारी

आपण आपल्यासोबतच मुक्या प्राण्यांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. घराबाहेर किंवा बाल्कनीत पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे ठेवा. पाळीव प्राण्यांना सावलीत बांधा आणि त्यांना पुरेसे पाणी द्या.

लक्षात ठेवा - उन्हाळ्याची ही तीव्रता केवळ निसर्गाचा कोप नसून, वाढते औद्योगिकीकरण आणि जंगलतोडीचा परिणाम आहे. स्वतःचे रक्षण करण्यासोबतच पर्यावरणाचे रक्षण करणे, हेच उन्हाळ्यावरील कायमस्वरूपी उत्तर आहे.

आपत्कालीन संपर्क : तब्येत बिघडल्यास वेळ न घालवता जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा १०८ या हेल्पलाइनवर रुग्णवाहिकेसाठी कॉल करा.

सावध राहा, सुरक्षित राहा आणि उन्हाळ्याला धैर्याने सामोरे जा!

- प्रवीण डोंगरदिवे

(कोकण विभागीय माहिती कार्यालय)

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 30-04-2026 News publication date | Time: 07:49 PM News publication time | Views: 397 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 30-04-2026 News publication date | Time: 07:49 PM News publication time | Views: 397 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement