नवभारताच्या निर्मितीत राष्ट्रसंतांचे लोकोत्तर कार्य

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (३० एप्रिल) विशेष लेख

नवभारताच्या निर्मितीत राष्ट्रसंतांचे लोकोत्तर कार्य मुख्य फोटो
नवभारताच्या निर्मितीत राष्ट्रसंतांचे लोकोत्तर कार्य अतिरिक्त फोटो

भारतीय संतपरंपरा ही केवळ आध्यात्मिक नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचीही प्रभावी परंपरा मानली जाते. या परंपरेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे स्थान अत्यंत अग्रगण्य आहे. ३० एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जयंती दिन. त्यांचा जन्मदिवस ग्रामजयंती उत्सव म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली येथे ३० एप्रिल १९०९ रोजी झाला. नवभारताच्या निर्मितीत ज्या संतांनी एकसंघ भारत, समृद्ध भारत निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर प्रयत्न केले त्याचे अग्रणी आणि या कल्पनेचे नेतृत्व साकारणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आजच्या काळातही राष्ट्रसंत म्हणून वंदनीय ठरतात. संत परंपरेतील इतर संतांप्रमाणेच त्यांनी भजन, कीर्तन, प्रवचन यांचा उपयोग करुन जनजागृती केली; मात्र त्यांच्या कार्याचा व्याप केवळ धार्मिक मर्यादांमध्ये न राहता राष्ट्रनिर्मितीपर्यंत पोहोचला. त्यामुळेच त्यांना 'राष्ट्रसंत' ही उपाधी लाभली.

'नांदोत सुखे गरीब-अमीर एकमतानी…

दे वरचि असा दे, या भारतात बंधुभाव नित्य वसू दे…'

नागपूर विद्यापीठाने त्यांचे हे गीत विद्यापीठ गीत म्हणून स्वीकारले आहे. विद्यापीठाच्या गीतात उमटणारे राष्ट्रसंतांचे भजन ऐकले की आजही मन भरून येते. या ओळी केवळ भजन नाहीत, तर भारताच्या अस्तित्वाचा मूलमंत्र आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'बंधुता टिकली तरच राष्ट्र टिकते' हा विचार ठामपणे मांडला. त्याच धर्तीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपले भजन, कीर्तन आणि ग्रामविकासाच्या कार्यातून सर्व धर्म, पंथ आणि समाजघटकांना एकत्र आणण्याचा लोकोत्तर प्रयत्न केला. त्यांनी १९४३ साली अमरावती-नागपूर महामार्गावरील 'मोझरी' येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. हे स्थळ सर्वधर्मीय समन्वयाचे तीर्थक्षेत्र बनले आहे. 'सब के लिए खुला है मंदिर यह हमारा' या ब्रीदाखाली येथील कामकाज चालते. येथील प्रार्थना मंदिरात सर्व धर्माच्या संतांना समान स्थान देण्यात आले आहे.

संतपरंपरेचा आधुनिक विस्तार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्या परंपरेचा वारसा पुढे नेला; मात्र त्यात आधुनिक राष्ट्रनिर्मितीची जोड दिली. त्यांनी भक्तीला केवळ वैयक्तिक साधना न ठेवता सामाजिक जबाबदारीशी जोडले. देशाच्या उत्थानात अध्यात्माला पुढे केले.

त्यांच्या भजनांमधील साधेपणा आणि स्पष्टता जनमानसाला थेट भिडणारी आहे. 'देह मंदिर, मन पुजारी, सेवा हीच आरती', 'मानवा जागा हो रे, सेवा धर्म पाळ रे' तसेच 'मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव... देव बाजारचा भाजीपाला नाही रे' या ओळींमधून त्यांनी अंधश्रद्धा, दिखाऊ भक्ती आणि कर्मकांडांवर प्रखर प्रहार केला. त्यांचे साहित्य हे केवळ आध्यात्मिक नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन होते.

साहित्य आणि समाजजागृतीचा सेतू

राष्ट्रसंतांचे साहित्य हे 'लोकसाहित्य' होते ज्यात श्रम, माणुसकी आणि नैतिकता यांचा संगम आहे. ते स्वतः म्हणतात 'मी पोथी वाचीत न बसता जीवनाचा ग्रंथ वाचला.' त्यांच्या ओळी - 'पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या...दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या' - जगण्यासाठी लागणाऱ्या मूल्यापेक्षा अन्य श्रीमंतीला महत्त्व देणे अयोग्य असल्याचे सांगतात. चित्ती असावे समाधान यावर त्यांच्या साहित्याचा अधिक भर राहिला आहे. त्यांच्या साहित्याच्या ओळी अशा जनसामान्यात रुजलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात शेकडो गावांमध्ये रोज सायंकाळी होणारी सामुदायिक प्रार्थना सर्वधर्मसमभावाचा दररोजचा उत्सव आहे. यामध्ये सर्व समाजाचे सर्व जातीपंथांचे नागरिक सहभागी होतात. ही प्रार्थना केवळ आध्यात्मिक प्रार्थना न राहता माणसाला माणुसकीच्या समान पातळीवर सन्मानाने आणणारी आराधना बनून जाते... त्यांनी आपल्या साहित्यामध्येदेखील सामान्यातल्या सामान्य माणसाच्या भूमिका अपेक्षा आणि शुभचिंतनाला मांडले आहे. त्यांनी साहित्याच्या भूमिकेतून अंधश्रद्धेवर प्रहार केला.

देवाचिया नावाखाली । काही देतात जीव बळी

बंद करावी प्रथा असली । भावना सुधोरीनी लोकांची

साहित्य हे झोपडीतल्या माणसाला समजावे, शेतकऱ्याच्या नांगरात उमटावे आणि समाजातील अन्याय दूर करणारे असावे, अशी त्यांची भावना होती. त्यामुळेच त्यांचे साहित्य हे जनतेचे, जनतेसाठी आणि जनतेकडून निर्माण झालेले मानले जाते. श्रमाचा त्यांनी सत्कार केला; आपल्या लेखनात त्याचा पुरस्कारही केला. श्रमनिष्ठेचा करावा प्रचार । सर्वास आपुलकी वाटे पुरेपूर

ऐसी व्यवस्था करावी सुंदर । गावचे उत्पादन वाढवोनी

स्वातंत्र्यलढ्यातील राष्ट्रभक्ती

स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रसंतांनी जनतेमध्ये स्वातंत्र्याची ज्वाला पेटवली. चिमूर-आष्टी आंदोलनाच्या काळात त्यांच्या भजनांनी लोकांमध्ये प्रचंड प्रेरणा निर्माण केली. 'पत्थर सारे बम बनेंगे, भक्त बनेगी सेना...' यातून त्यांनी ब्रिटिश सरकारच्या अन्यायाला इशारा दिला होता. त्यांच्या राष्ट्रभक्तिपर कार्यामुळे ब्रिटिश सत्तेला ते खटकले आणि त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यांनी महात्मा गांधी यांच्या चळवळींना पाठिंबा दिला,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची पाठराखण केली, अस्पृश्यता निवारणासाठी कार्यही केले, महात्मा गांधी यांच्यासोबत त्यांनी सेवाग्राम आश्रमातही वास्तव्य केले. त्यामुळे ते केवळ संत न राहता राष्ट्रनिर्मितीचे सक्रिय सहभागी ठरले. लेखन, समाजसेवा, ग्रामविकास, राष्ट्रोन्नती, राष्ट्रविकास आणि बलशाली एकजूट भारतासाठी देश-विदेशाचे भ्रमण, चिंतन हेच त्यांचे आयुष्य राहिले.

स्वातंत्र्यानंतरचे राष्ट्रनिर्माण

स्वातंत्र्यानंतर राष्ट्रनिर्मितीत संतांचा सहभाग असावा, यासाठी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना आमंत्रित केले. आज उभ्या असलेल्या राष्ट्रपती भवनात १९५२च्या सुमारास त्यांच्या खंजिरीची थाप निनादली आहे. राष्ट्रपतिभवनात त्यांच्या खंजिरी भजनाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. ही घटना लोकसंस्कृतीच्या गौरवाचे प्रतिक ठरली. तसेच त्यांनी विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि समाजसेवेचा मार्ग अधिक व्यापक केला. देशाच्या उभारणीत सर्व धर्मीय संत पंरपरेला एकत्रित करण्याचे कार्य त्यांनी केले.

ग्रामगीता : ग्रामविकासाचा आराखडा

राष्ट्रसंतांचे सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे 'ग्रामगीता.' या ग्रंथात त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडला. 'गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा' ग्रामगीतेत स्वच्छता, शिक्षण, सहकार, नैतिकता आणि स्वावलंबन यांचा समन्वय दिसतो. 'ग्रामजयंतीचा मंत्र घ्या हो नवा, देशात समता नांदवा' हा त्यांचा संदेश आजही ग्रामीण विकासासाठी मार्गदर्शक आहे. त्यांनी 'प्रत्येक गावच पंढरपूर व्हावे' ही संकल्पना मांडून स्थानिक विकासाला आध्यात्मिक उंची दिली. गावगाडा बळकट करण्यासाठी त्यांनी ग्रामगीतेत मांडणी केली. स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सहकार, शांतता, आर्थिक विकास सर्वच पातळीवर लेखन केले.

सर्वांनी स्वच्छ, शिस्तबद्ध व्हावे । परस्परांशी प्रेम करावे

तरीच गाव स्वर्ग व्हावे । सर्वतोपरी

गावाचा प्रत्येक सज्ञान । यांचे असावे सहकार्य पूर्ण

हाक देता सर्वजण । जमोनि यावेत एकत्र महाराष्ट्राच्या ग्रामविकासाचा खरा पाया तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आहे.

गावचे राज्य गावचि करी ।

कोणाचीच न चाले हुशारी ।

आमुचे आम्हीच सर्वतोपरी

नांदू गावी ।

या ग्रामगीतेच्या ओळीला पंचायतराज व्यवस्थेतून गती मिळाली आहे. गावागावांसी जागवा । भेदाभेद हा समूळ मिटवा ।

उजळा ग्रामोन्नतीचा दिवा । तुकड्या म्हणे ।।

हा राष्ट्रसंताचा संदेश अनेक योजनांचा पाया ठरला आहे. समता, मानवता आणि धर्मदृष्टी

राष्ट्रसंतांनी धर्माची व्याख्या करताना माणुसकीला केंद्रस्थानी ठेवले. 'जो कोणी सत्यसिद्धांती... समजावा चित्ती आपुलाचि' त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे कौतुक करताना 'मानवतेचे मंदिर उभारले' असे गौरवोद्गार काढले. त्यांच्या भजनांमध्ये सर्वधर्मसमभावाचा स्पष्ट संदेश आहे. 'मग हिंदू असो, ख्रिश्चन वा हो इस्लामी...' ही विचारसरणी भारतीय संविधानातील बंधुता आणि समतेच्या मूल्यांशी सुसंगत आहे.

आंतरराष्ट्रीय कार्य आणि विश्वशांती

१९५५मध्ये जपानमध्ये आयोजित जागतिक धार्मिक परिषदेत सहभागी होऊन त्यांनी 'वसुधैव कुटुंबकम्'चा संदेश दिला. मानवधर्म, विश्वशांती आणि समाजसेवा या मूल्यांचा त्यांनी जागतिक स्तरावर प्रचार केला. यामुळे त्यांच्या कार्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. भारतभर प्रवास करून त्यांनी संतांचे मेळावे घेतले आणि या संतांना राष्ट्रनिर्मितीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. जापानमध्ये त्यांनी भारतीय विविधतेतील एकतेचा संदेश दिला.

गुरुकुंज मोझरी : कार्याचा केंद्रबिंदू

अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी हे त्यांच्या कार्याचे केंद्र आहे. त्या ठिकाणी १९४३मध्ये त्यांनी आश्रम स्थापन केला. येथे सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक उपक्रम आजही सुरू आहेत. महाराष्ट्र शासनाने मोझरी विकास आराखड्याद्वारे पायाभूत सुविधा आणि तीर्थक्षेत्र विकासासाठी मोठी तरतूद केली आहे. तसेच नागपूर विद्यापीठाला त्यांच्या नावाने ओळख देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. गुरुकुंज आश्रमातील प्रत्येक उपक्रम ग्रामगीतेच्या विचाराशी सुसंगत आहे. आदर्श ग्रामजीवनाचा पुरस्कार या आश्रमाची शिकवण देतो. केंद्र सरकारने ग्रामगीतेच्या माध्यमातून या आश्रमातून सुरू असलेल्या या कार्याची दखल घेतली आहे. आश्रमाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे यांना २६ जानेवारी २०२६ रोजी पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

आजच्या काळातील संदर्भ

आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगातही राष्ट्रसंतांचे विचार अत्यंत उपयुक्त आहेत. सामाजिक विभाजन, जातिभेद-धर्मभेद, ग्रामीण अधोगती आणि नैतिकतेचा अभाव या समस्यांवर त्यांच्या विचारांमध्ये उपाय दिसतो. त्यांनी दिलेला संदेश स्पष्ट आहे. 'बैसू चला सर्व एकाचि रांगे…'बंधुता, समता आणि सेवा या मूल्यांवर आधारित समाजरचना हीच खऱ्या अर्थाने नवभारताची पायाभरणी आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कार्य हे केवळ आध्यात्मिक नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीच्या व्यापक ध्येयाशी निगडित आहे. त्यांनी भजन, साहित्य, समाजकार्य आणि ग्रामविकास यांच्या माध्यमातून भारताला एकात्मतेचा मार्ग दाखवला.

त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या विचारांचे स्मरण करताना, त्यांची अंमलबजावणी करणे हीच खरी आदरांजली ठरेल. 'दे वरचि असा दे, या भारतात बंधुभाव नित्य वसू दे' ही प्रार्थना केवळ शब्द न राहता, भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या आचरणात उतरली, तरच राष्ट्रसंतांचे स्वप्न साकार होईल.

- प्रवीण टाके

माहिती उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 30-04-2026 News publication date | Time: 11:56 AM News publication time | Views: 273 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 30-04-2026 News publication date | Time: 11:56 AM News publication time | Views: 273 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement