बिबट्याला शत्रू ठरवायचं की मित्र हे आपल्याच हातात!

आंतरराष्ट्रीय बिबट्या दिनानिमित्त (तीन मे) विशेष लेख...

बिबट्याला शत्रू ठरवायचं की मित्र हे आपल्याच हातात! मुख्य फोटो
बिबट्याला शत्रू ठरवायचं की मित्र हे आपल्याच हातात! अतिरिक्त फोटो

एखाद्या वन्यप्राण्याची भीती वाटण्याचं मुख्य कारण हे त्याची पूर्णपणे माहिती नसण्यामध्ये आहे. जेवढं त्याच्या जवळ जातो, जेवढं त्याचं विश्व कळायला लागतं तेवढ्या त्याच्या मनोभूमिका कळायला लागतात आणि मग त्याचा उमदा स्वभाव समजू लागला, की भीतीची जागा आदर घेतो. बिबट्याचंही तसंच झालं आहे. आजही मला तो पहिला दिवस आठवतो. पाचवीत असताना आम्ही मित्रमंडळी सायकली घेऊन फिरायला गेलो होतो. संध्याकाळचे पाच-सहा वाजले होते. त्या वेळचे डांबरी रस्तेसुद्धा जंगलाचा भाग असावेत असेच होते. गप्पा आणि गोंधळात अचानक एक जनावर आडवं गेलं. अर्ध्याहून जास्त मित्रांना तर काही दिसलंच नाही; पण तरीही शार्दूलने तो बिबट्या होता हे सांगताच उडालेली गाळण आजही आठवते. तेवढेच अंगावर आलेले रोमांचही चांगलेच स्मरणात आहेत. ज्या वेगाने सायकली फिरवून आम्ही घर गाठलं होतं, ते आठवून आजही सर्वांच्या मनात हास्याचे फवारे उडतात.

बिबट्याची पहिली ओळख ही अशी लहानपणीच झालेली. तिथपासून आजवर झालेला बिबट्याच्या जवळ जाणारा प्रवास हा दुःख, तिरस्कार, हेटाळणीपासून प्रेमात बदलण्यास अक्षरश वीसेक वर्षं लोटली असावीत.

प्राणिप्रेमाची हौस लहानपणापासूनच दांडगी. अर्थात त्याचं पर्यवसान रस्त्यावरची कुत्र्याची पिल्लं घरी आणणं आणि त्यांच्यात रमून जाणं हे तसं अगदी नैसर्गिक. तसंच एक कुत्र्याचं पिल्लू, ज्याच्या आईला बिबट्याने नेल्यावर अक्षरशः अंगावर पडलं... डोळे उघडण्याच्या आतच त्याचं मातृछत्र हिरावलं गेलं होतं. आईविना वाढलेली ती पिल्लं माझ्या घरात कशी पोहोचली ते आता आठवत नाही; पण एक कुत्री आणि एक कुत्रा मात्र आमच्याकडे वाढला. बाकी दोन पिल्लं दुसऱ्या ओळखीच्या लोकांत गेली. अगदी डोळे न उघडलेली पिल्लं असल्यामुळे त्याचं सगळंच करावं लागत होतं; पण ती जोमाने वाढली. त्यातला तांबडा कुत्रा, नंतर त्याचं नाव लाल्या असंच पडलं. मस्त वाढला. लहानपणीच्या धक्क्याने असेल किंवा आणि काही असेल, पण तो अगदी रागीट बनला होता. गेटची कडी जरी वाजली, तरी लांबवरून क्षणार्धात प्रकट होणारा आणि अख्खं घर डोक्यावर घेणारा तो कुत्रा सर्वत्रच फेमस झाला होता. त्याच्यासाठी पिंजरा बनवला होता. पौर्णिमेच्या चांदण्यात आजूबाजूचे आवाज घेऊन रात्र जागवताना अक्षरश त्याला आवरावं लागायचं. इतका सावध, की खुट्ट वाजलं तरी तो सावध होत असे. लहानपणी त्याने चुकवलेलं मरण शेवटी त्याला एकदा तरी गाठेल अशी कोणतीच शक्यता वाटत नव्हती; पण एका अमावास्येच्या काळया रात्री तो असाच गायब होता. उशिरापर्यंत न आल्याने पिंजऱ्यात जाण्याचा प्रश्नच नाही. उशिरा तो परत आला. मग कडी लावून पिंजरा बंद केला, ती त्याची आणि माझी शेवटची भेट. पहाटे पिंजऱ्याची कडी निघालेली होती आणि अंगणात उठलेले पंजे... त्यापुढे काय झालं हे केव्हाच कळलं नाही. कारण तो परत दिसलाच नाही. तरुण वयात अगदी आवडता कुत्रा असा बिबट्याने नेणं हे या बिबट्याचा तिरस्कार करण्यासाठी अगदी योग्य कारण. मी जंगल फिरत असताना तो कायम बरोबर असणं. समोर आलेली जनावरं बघून भुंकणं आणि प्रत्येक वेळेला त्याने दिलेली साथ आठवून अनेक दिवस त्याच्या आठवणी अशाच येत राहिल्या. त्यामुळे बिबट्याचा तिरस्कार वाढतच गेला. हे असंच होत राहिलं पुढेही... अनेक पिल्लं आली... मोठी झाली... त्यातली अनेक बिबट्याच्या पोटात गेली. यांना दुसरं खायला काही नाही काय... ते अगदी यांचा बंदोबस्त करायलाच पाहिजे असे अनेक विचार येत असत.

आता अनेक वर्षे शार्दूलबरोबर कॅमेरा ट्रॅप लावताना. बिबट्यांचा माग काढताना आणि त्याचं विश्व समजून घेताना त्यांची मजबुरी समजलीय. रात्र रात्र जंगलं पालथी घालून, हजारो तासांचे कॅमेरा फुटेज बघून जेव्हा एखादाही प्राणी नजरेस पडत नाही हे बघून माणसांनी जंगलाची अवस्था काय केलीय हे कळू लागलंय. सर्वत्र पडलेल्या कचऱ्याच्या राशी, त्यावर पोसलेले घुशी, उंदीर, भटकी कुत्री, मांजरं... त्यांची वाढलेली संख्या बघून लक्षात येतंय की बिबटे का दिसत आहेत; पण आज उशीर झाला आहे. कधी काळी बिबट्या बघण्यासाठी जंगलात जावं लागायचं आता रात्री उशिरा घरी आलं, तर घराच्या गेटमध्येच तो दिसेल याची खात्री वाटू लागली आहे.

शार्दूलच्या व्यवसायामुळे रात्री अपरात्री फिरणं नेहमीच. रस्त्यावर कडेला बसलेला बिबट्या दिसणं हेही तितकंच सवयीचं. रस्त्यावर मरून पडलेला एखादा उंदीर किंवा बेडूक खाण्यासाठी येणारा बिबट्या गाडीचा लाइट पडला की साइडपट्टीवर गवतात गायब व्हायचा. असंच अनेकदा घडल्यावर मग शार्दूलने एकदा गाडीतून उतरून त्याला अगदी जवळून पाहिलं. माणसांपासून, गाड्यांपासून लांब राहण्यासाठी रस्त्यावरून बाजूला जाऊन डोकं खाली घेऊन मुरून बसलेला बिबट्या वारंवार नजरेस पडू लागला. जेवढी भीती आम्हाला होती, तेवढीच त्याला माणसांची भीती वाटते हे कळू लागलं. गाडीचा प्रकाश चुकवून माणसं जायची वाट बघणारा आणि ती गेली की परत रस्त्यावर येऊन ते पडलेलं खाद्य खाणारा बिबट्या आता बिचारा वाटू लागला. वाडीत, वस्तीत अगदी सावध पावलांनी फिरणारा, आपला कानोसाही न लागू देणारा बिबट्या शार्दूलच्या कॅमेरात वेळोवेळी येऊ लागला. दोन-तीन वेळेला त्याने मारलेल्या पाडीजवळ कॅमेरा लावून गेल्यावर दुसऱ्या-तिसऱ्या मिनिटाला हजर झाला. हे पाहून त्याचा स्वभावही कळून गेला. बिबट्याला पाहण्यासाठी चाललेली धडपड त्याने आपल्याला आधीच बघितलेलं असतं हे कळण्यापर्यंत येऊन पोहोचली. त्याच्याविषयी वाटणारी भीती, तिरस्कार या बाबी आता कुतुहलात बदलल्या.

अजूनही बिबट्या पूर्ण कळला आहे असं म्हणणं बरोबर नाही. कष्टाने पाळलेली कोंबडी, बकरी, गुरं, पाडसं एक रात्रीत नेणारा बिबट्या कदाचित कहाणीचा खलनायकपण ठरतो आहे. त्याच्या वावराने लागणारी संचारबंदी, त्याच्या भीतीने बंद होणारं खेळणं-बागडणं या सगळ्या गोष्टी तितक्याच आहेत; पण पायवाटेवरून चालताना अगदी वीस-पंचवीस फुटांवर असणारा मान खाली घालून लपण्याचा प्रयत्न करणारा आणि तुम्ही जायची आतुरतेने वाट बघणारा बिबट्याही तितकाच खरा आहे. भरधाव गाडीने उडवलेला बिबट्या, फासकीमध्ये अडकून मरणाची संथपणे वाट पाहणारा, उघड्या विहिरीत पडून सुटकेची वाट पाहणारा, आईपासून ताटातूट होऊन दुधाची वाट बघणारा बिबट्या... तो आहे... तो कुठेही जाणार नाही. तो असणारच आहे. आता त्याला शत्रू ठरवायचं की मित्र एवढंच आपल्या हातात आहे.

- प्रतीक मोरे, देवरूख, रत्नागिरी (लेखक सह्याद्री संकल्प सोसायटीच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण-संवर्धनाचे कार्य करत असून, मानद वन्यजीव रक्षक म्हणूनही वन विभागानेच अलीकडेच त्यांची नियुक्ती केली आहे.)

(लेखातील छायाचित्रे : शार्दूल केळकर)

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 03-05-2026 News publication date | Time: 03:48 PM News publication time | Views: 369 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 03-05-2026 News publication date | Time: 03:48 PM News publication time | Views: 369 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement