महाराणा प्रताप

महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त (९ मे) त्यांच्या कार्याचा अल्प आढावा...

महाराणा प्रताप  मुख्य फोटो
मुख्य फोटो

भारत ही शूरवीरांची जन्मभूमी आहे. अशा शूरवीरांपैकी एक आहेत महाराणा प्रताप. महाराणा प्रताप यांचा जन्म वीरांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानात कुंभलगड येथे ९ मे १५४० रोजी झाला. त्यांनी मुघल सम्राट अकबराविरोधात कडवा संघर्ष केला. त्यांनी कधीही अकबरासमोर शरणागती पत्करली नाही. 

१५७२ साली उदयसिंह द्वितीय यांचे निधन झाले. महाराणा प्रताप सर्वांत मोठे पुत्र असूनही उदयसिंह यांनी आपला नववा पुत्र जगमालला आपला उत्तराधिकारी म्हणून निवडले; पण राज्याच्या मंत्र्यांनी आणि दरबाऱ्यांनी महाराणा प्रताप यांनाच गादीवर बसवले. त्यामुळे जगमालने रागात मेवाड सोडले. अकबराने जगमालला जहानपूर जहांगीर दिली होती. खरे तर महाराणा प्रताप यांनी गादीची जबाबदारी स्वीकारण्याआधीच म्हणजे १५६८मध्येच मेवाडची राजधानी चितोडवर मुघलांनी ताबा मिळवला होता. गादीवर येताच महाराणा प्रताप यांनी मुघलांशी संघर्ष सुरू केला.

हल्दीघाटचे युद्ध : २१ जून १५७६ला हल्दीघाटचे युद्ध झाले. अकबराच्या सैन्याचे नेतृत्व राजा मानसिंह करत होता. मुघलांची सैन्यसंख्या कित्येक पटींनी जास्त होती. मुघल सैन्य आणि महाराणा प्रतापांच्या सैन्यात भीषण संघर्ष सुरू झाला. युद्धात मानसिंह आणि महाराणा प्रताप समोरासमोर आले. त्या वेळी मानसिंह हत्तीवरून लढत होता, तर महाराणा प्रताप आपल्या चेतक घोड्यावर स्वार होते. महाराणा प्रताप यांनी भाल्याने मानसिंहच्या हत्तीला जखमी केलं; पण हत्तीच्या सोंडेला असलेली तलवार चेतकच्या पायाला लागली. चेतक जखमी झाला. मुघलांच्या सैन्याने महाराणा प्रताप यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर बाणांचा वर्षाव सुरू केला. त्या वेळी महाराणा प्रताप यांच्या सैन्याधिकाऱ्यांनी त्यांना युद्धक्षेत्र सोडण्याचा सल्ला दिला. त्या वेळी जखमी चेतकने वाऱ्याच्या वेगाने महाराणा प्रताप यांना युद्धभूमीबाहेर सुरक्षित स्थळी आणले. तेथेच हृदयविकाराच्या झटक्याने चेतकचा मृत्यू झाला. 

हल्दीघाटच्या युद्धानंतर महाराणा प्रताप यांनी आपल्या युद्धपद्धतीत बदल केला. त्यांनी मुघलांच्या सैन्याविरोधात गनिमी कावा पद्धत वापरण्यास सुरुवात केली. ते मुघलांच्या सैन्यावर हल्ला करायचे आणि नंतर जंगलात जाऊन लपायचे. महाराणा प्रताप यांनी आपले कुटुंब आणि विश्वासू साथीदारांसोबत खूप काळ जंगलात घालवला. अकबराने आपले सैन्य त्यांच्या मागे सोडले होते. महाराणा प्रताप यांनी मुघलांची रसद तोडणे, रस्ते बंद करणे, अचानक मुघल सैन्यावर हल्ला करणे अशा पद्धती वापरल्या. अशा प्रकारे त्यांनी मुघल सैन्याचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न केला. इतिहासकारांच्या माहितीनुसार, अकबराने अनेकदा महाराणा प्रताप यांच्यासोबत तह करण्याचा प्रयत्न केला; पण प्रत्येक वेळी त्यांनी प्रस्ताव नाकारला. राजपूत योद्ध्याचे कोणासमोर झुकणे त्यांना मान्य नव्हते. महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात देवेर येथे निर्णायक युद्ध झाले.

महाराणा प्रताप यांनी अनेक कवी, कलाकार, लेखकांना आपल्या दरबारात आश्रय दिला होता. शिकार करत असताना झालेल्या जखमांमुळे १९ जानेवारी १५९७ रोजी वयाच्या ५७व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा सर्वांत मोठा मुलगा अमरसिंह गादीवर बसला. महाराणा प्रताप यांनी मरणशय्येवर असताना आपल्या मुलाला सांगितले होते, की 'मुघलांना कधीही शरण जाऊ नको आणि चितोड पुन्हा जिंकून घे.' 

राजस्थानच नाही, तर संपूर्ण भारतात महाराणा प्रताप यांचे नाव सन्मानाने घेतले जाते. अनेक लोकगीतांमधून त्यांच्या शौर्यकथा सांगितल्या जातात. आपल्या मातृभूमीसाठी लढणारे आणि शत्रूला कधीही शरण न गेलेले महाराणा प्रताप यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांत नोंदले गेले आहे. इतिहासकार सतीश चंद्रा म्हणतात, 'महाराणा प्रताप यांनी बलाढ्य मुघलांशी एकट्याने, कोणाच्याही मदतीशिवाय सामना केला. आपल्या तत्त्वांसाठी जीवही देण्याची त्यांची तयारी होती. 

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 09-05-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 299 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 09-05-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 299 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement