इतिहास अभ्यासक निनाद बेडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त (१० मे) त्यांचा अल्प परिचय...
निनाद बेडेकर हे इतिहास संशोधक, शिवचरित्र आणि मराठेशाहीच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक, लेखक आणि प्रभावी वक्ते होते. त्यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४९ रोजी पुण्यामध्ये झाला. मॉडर्न शाळेतील शिक्षणानंतर त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन येथून अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केला. निनाद बेडेकर यांच्या मातोश्री सरदार रास्ते कुटुंबातील होत्या. स्वातंत्र्यसैनिक, तसेच स्त्रियांसाठी कार्य करणाऱ्या म्हणून त्या परिचित होत्या. त्यांच्या आईमुळेच त्यांना इतिहासाची गोडी निर्माण झाली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी किर्लोस्कर कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम केले. नोकरीच्या निमित्ताने ते राज्यात, देशात, तसेच विदेशांत सर्वत्र फिरले. इतिहासाचे मूळचे प्रेम या प्रवासातूनही त्यांनी जोपासले. अभ्यासू वृत्ती, प्रतिभा, नव्याचा डोळसपणे स्वीकार करणे आणि विश्लेषणात्मक व चिकित्सक विचारपद्धती यातून बेडेकरांचे कर्तृत्व बहरत गेले.
इतिहासाविषयी त्यांना आंधळे वा भाबडे प्रेम नव्हते. अत्यंत तर्कसंगत, बुद्धिनिष्ठ पद्धतीने बेडेकरांनी इतिहासाकडे, शिवचरित्राकडे तसेच मराठेशाहीच्या कारभाराकडे पाहिले आणि त्यानंतरच आपले विचार त्यांनी लेखनातून, व्याख्यानांतून प्रभावीपणे मांडले. देश-विदेशात बेडेकरांनी साडेपाच हजारांहून अधिक व्याख्याने मराठी, हिंदी व इंग्रजीतून दिली. इतिहासाच्या अभ्यासासाठी त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजीप्रमाणेच संस्कृत, मोडी, फार्सी, पर्शियन व पाली-प्राकृतचाही अभ्यास केला. कवी भूषण हा बेडेकरांच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांचे संपूर्ण काव्य बेडेकरांना मुखोद्गत होते.
निनाद बेडेकरांनी २००९मध्ये देशातले ६१ किल्ले चढण्याचा संकल्प केला आणि युवा मित्रांना सोबत घेऊन तो पूर्णत्वासही नेला. महाराष्ट्रातील सुमारे साडेतीनशे किल्ल्यांचा इतिहास, बांधणी, भौगोलिक व सामरिक महत्त्व यावर बेडेकर अतिशय अधिकारवाणीने बोलत आणि ऐकणाऱ्यांना मंत्रमुग्ध करत. इतिहासाच्या अभ्यासासाठी त्यांनी मोडी, फार्सी, उर्दू या लिपींवर प्रभुत्व मिळवले. या लिपीमध्ये असलेली हस्तलिखिते आणि कागदपत्रांचे वाचन करून त्यांनी साहित्यनिर्मिती केली. त्याचबरोबरीने बेडेकर यांनी पर्शियन, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रजी या परकीय भाषा आत्मसात केल्या. शिवचरित्र आणि १८व्या शतकात देशभर विस्तारलेले मराठी साम्राज्य या विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. राज्यातील आणि देशातील किल्ल्यांवर भ्रमंती करून शिवकालीन इतिहासामध्ये ते रममाण झाले होते. शिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाहीसंदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून लेखन केले. शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी या पैलूंचा स्वतंत्रपणे अभ्यास करून त्यांनी लेखन केले होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलू शकणारे शिवचरित्राचे अभ्यासक अशी त्यांची ख्याती होती. गड-किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून निनाद बेडेकर यांची नियुक्ती झाली होती. लालित्यपूर्ण शैलीमध्ये ऐतिहासिक लेखन करणार्या बेडेकर यांची ‘शिवभूषण’, ‘थोरलं राजं सांगून गेलं’, ‘गजकथा’, ‘हसरा इतिहास’, ‘दुर्गकथा’, ‘विजयदुर्गचे रहस्य’, ‘समरांगण’ आणि ‘झंझावात’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी ३५ पुस्तकांसह शेकडो लेख आणि शोधनिबंध लिहिले. निनाद बेडेकर यांना शिवभूषण, दुर्ग साहित्य पुरस्कार, जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार, पुराण पुरुष पुरस्कार, शिवपुण्यतिथी रायगड पुरस्कार या पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. अशा या प्रख्यात इतिहासकाराचे १० मे २०१५ रोजी निधन झाले.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment