जागतिक दूरसंचार दिन

जागतिक दूरसंचार दिनानिमित्त (१७ मे) अधिक माहिती...

जागतिक दूरसंचार दिन मुख्य फोटो
मुख्य फोटो

मानवाने बुद्धीच्या जोरावर विविध शोध लावून विस्मयकारक प्रगती केली. आज त्याची प्रचिती आपणा सर्वांना येतच आहे. यातील महत्त्वपूर्ण शोध म्हणजे इंटरनेट, संगणक आणि मोबाइलचा शोध. या सर्वांचा शोध लागण्यापूर्वीही, म्हणजेच राजेरजवाड्यांच्या युगातही संदेशवहन होत होते; मात्र त्या संदेशवहनासाठी बराच वेळ वाया जात असे. एकोणिसाव्या शतकापासून मानवाने दळणवळणाच्या साधनांमध्ये अनेक आश्चर्यकारक शोध लावले. त्यामुळे मानवाची प्रचंड वेगाने प्रगती होऊ लागली. टेलिफोनच्या शोधाने संदेशवहनाचे अवघड काम सोपे झाले. याचे सर्व श्रेय अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांना जाते. 

ध्वनीची कंपने विद्युतप्रवाहाच्या साह्याने तारेतून पाठवता येणे शक्य आहे, असे लक्षात येताच बेल यांनी प्रयत्नपूर्वक टेलिफोनचे पहिले ओबडधोबड यंत्र बनवले. संदेशवहनाचे अवघड काम सोपे झाले. जगभरातील दूरसंचार क्षेत्रासाठीचे नियमन करण्यासाठी १७ मे १८६५ रोजी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेची (इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनची स्थापना झाली. त्या दिवसाचे औचित्य साधून १९७३पासून १७ मे हा दिवस जगभर दूरसंचार दिन म्हणून साजरा केला जातो. पुढे संगणकाच्या आगमनाबरोबर दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञानाची प्रगती अफाट वेगाने होऊ लागली. कालांतराने संगणकाला इंटरनेटची जोड मिळून सर्व संगणक दूरध्वनीच्या माध्यमातून एकमेकांशी जोडल्याने संगणकाचे जाळे तयार झाले. या महाजालामुळेच एका गणकयंत्रावर टाइप केलेले संदेश दुसर्‍या गणकयंत्रावर दिसू लागले. अशा प्रकारे संगणक, इंटरनेट आणि दूरध्वनीच्या शोधाने जग जवळ आले. 

नव्या संकल्पनांची देवाणघेवाण, राष्ट्रीय संकल्पनेवरील वादविवाद आणि चर्चा आदी कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. परिणामी बिनतारी संपर्क दिन आणि माहितीच्या पतपेढीचा दिवस हे दोन्ही एकत्रित साजरे होऊ लागले. आज विकसित तंत्रज्ञानामुळे केवळ संवादापुरत्या मर्यादित असलेल्या दूरध्वनीचा इतर व्यवहारोपयोगी कामांसाठीही उपयोग होऊ लागला. दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनीच्या साहाय्याने त्वरित संपर्क साधणे शक्य झाले आहे.

आधुनिक युगात फोन, मोबाइल, इंटरनेट हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. या दिनानिमित्त डिजिटल दरी कमी करणे, तंत्रज्ञानाद्वारे माहितीची देवाणघेवाण सुलभ करणे आणि दुर्गम भागापर्यंत कनेक्टिव्हिटी पोहोचवणे यावर भर दिला जातो. आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ ही माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानासाठीची संयुक्त राष्ट्रांची विशेष संस्था आहे. तिचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. हा दिवस केवळ तांत्रिक प्रगतीचा उत्सव नसून, डिजिटल समावेश आणि मानवी विकासासाठी तंत्रज्ञानाच्या जबाबदार वापरासंदर्भात जागृती करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.

आज माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाच्या जोरावर शेती ते शिक्षण, आरोग्य ते ऊर्जा व्यवस्थापन सर्व क्षेत्रांत क्रांती होत आहे. स्मार्ट शेती शेतकऱ्यांना हवामानाशी जुळवून घेत पीक वाढवायला मदत करते. डिजिटल ऊर्जा प्रणाली सौर आणि पवन ऊर्जा सक्षम करते. डिस्टन्स लर्निंगमुळे दुर्गम भागातही शिक्षण पोहोचतेय. टेलिमेडिसीनमुळे आरोग्यसेवा आता गावपातळीवर पोहोचली आहे. आज अनेक दूरसंचार साधनांमुळे जग जवळ येत आहे. आजच्या जागतिक दूरसंचार दिनानिमित्त आपण सर्वांनी एक काळजी घेणे खूप गरजेचे आहे. या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आपण फक्त एक साधन म्हणून करायला हवा. शेवटी आपणा सर्वांचा थेट संवाद आणि त्यातून निर्माण होणारे नाते हे कोणत्याही तंत्रज्ञानापेक्षा मोठे आहे. कारण आपल्यासाठी तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञानासाठी आपण नाही. शेवटी हे मानवनिर्मित आहे. त्यामुळे याच्या आहारी न जाता संयमाने आणि आपली नैसर्गिक बुद्धी शाबूत ठेवून आपण याचा वापर करायला हवा. हाच संकल्प आपण या दिनानिमित्त करू या!

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 17-05-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 236 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 17-05-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 236 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement