रामचंद्र सप्रे

भारतातील पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते रामचंद्र सप्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त (१८ मे) त्यांचा अल्प परिचय...

रामचंद्र सप्रे मुख्य फोटो
मुख्य फोटो

भारतातील पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते म्हणून रामचंद्र भार्गव सप्रे यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. ते एक उत्कृष्ट बुद्धिबळ खेळाडू आणि विश्लेषक होते. रामचंद्र सप्रे यांचा जन्म ४ मार्च १९१५ रोजी अकोला येथे झाला. त्यांचे वडील भार्गव काशिनाथ सप्रे हे दिवाणी न्यायाधीश होते; पण लहानपणीच त्यांचे निधन झाले. सप्रे यांचे बालपण मालगुंड (जि. रत्नागिरी) येथे आजोबांकडे गेले. लहानपणापासूनच त्यांना बुद्धिबळाची आवड होती. ते लाकडाचे तुकडे कापून स्वतः बुद्धिबळ तयार करत असत. अतिशय बुद्धिमान असलेले संस्कृतचे अनुवादक बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर हे त्यांचे आजोबा (आईचे वडील). त्यांच्याकडे रामचंद्र यांचे शिक्षण झाले. मुंबई विद्यापीठाची त्या काळातील बीएससी पदवी प्राप्त असलेले सप्रे ब्रॉडवे लॅबोरेटरीज या कंपनीत ऑफिस असिस्टंट म्हणून काम करत होते. लहानपणीच पितृछत्र हरपले असले, तरी ते आजोबांकडून बुद्धिबळ खेळायला शिकले. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर ते आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ एकलव्याप्रमाणे साधना करून शिकले. सुरुवातीला ते भारतीय नियमांनुसार खेळत; पण नंतर मुंबईतील इस्माईल कॉलेजमध्ये असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय नियमांचा अभ्यास केला. 

१९५५मध्ये आंध्र प्रदेशातील एलुरू येथे झालेली पहिली राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा त्यांनी आंध्रच्या धारभ व्यंकय्यासोबत संयुक्तपणे जिंकली. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी १९५६ आणि १९६० मध्ये जागतिक ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. खेळाडू म्हणून खेळण्याव्यतिरिक्त त्यांनी सन १९७०च्या दशकात पाच राष्ट्रीय निवड स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणूनही काम केले. सप्रे हे एक उत्कृष्ट बुद्धिबळ विश्लेषक म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांच्या स्मरणार्थ के. जी. एन. सरस्वती फाउंडेशन आणि चेसमेन रत्नागिरी यांच्यातर्फे सप्रे स्मृती जलद व अतिजलद बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली जाते.

रामभाऊ यांचे व्यक्तिमत्त्व वेगळेच होते. जे काही करायचे ते बुद्धिबळ खेळासाठीच असा निश्चय करून एक प्रकारे सेवाव्रतच त्यांनी अंगीकारले होते. बुद्धिबळ खेळासाठी जास्तीत जास्त वेळ देता यावा म्हणून कमी पगाराच्या खासगी नोकरीमध्ये त्यांनी समाधान मानले. बुद्धिबळ खेळासाठी त्यांनी घरगुती कार्यक्रमांना दुय्यम स्थान दिले. त्या काळी बुद्धिबळ खेळाला आजच्याइतकी समाजमान्यता नव्हती. स्पर्धा होत असल्या, तरीही आजच्याएवढी बक्षिसेही मिळत नव्हती. स्वखर्चाने स्पर्धेत सहभाग घ्यावा लागत होता. सरकारी पाठिंबाही नगण्य स्वरूपाचा असायचा. अशा प्रतिकूल कालखंडात रामभाऊंनी बुद्धिबळ संस्कृती वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केला. रुईया व पोतदार या मुंबईतील नामांकित विद्यालयांत बुद्धिबळ प्रशिक्षक म्हणून सप्रे सर अनेक वर्षे जात असत. बुद्धिबळ खेळाविषयी अधिक माहिती व्हावी, तसेच खेळाचा प्रसार प्रचार व्हावा म्हणून स्पोर्ट्स वीक, मिड डे, इंडियन एक्स्प्रेस यांसारख्या वृत्तपत्रांमधून नामवंत खेळाडूंचे डाव, कूटप्रश्न इत्यादी माहिती ते लिहीत असत. बुद्धिबळ खेळाडू हेच त्यांचे नातेवाईक असे मानून मुंबईतील छोट्या जागेतही व्हरांड्यात त्यांचा बुद्धिबळाचा पट मांडलेला असायचा. तेथे बसून वेगवेगळ्या खेळाडूंशी ते खेळत असत. 

मुंबईतील अनेक नामवंत बुद्धिबळ खेळाडू रामभाऊंकडे खेळण्यासाठी येत असत. मुंबई तसेच राष्ट्रीय बुद्धिबळ फेडरेशनच्या कार्यकारिणीवर अनेक वर्षे कार्यरत राहिलेल्या रामचंद्र सप्रे सरांची बुद्धिबळ खेळातील कारकीर्द खूप मोठी आहे. वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत सारे आयुष्य त्यांनी बुद्धिबळ खेळासाठी व्यतीत केले. बुद्धिबळ खेळाचा प्रसार प्रचार व्हावा म्हणून उत्तरायुष्यात त्यांनी संघटनात्मक कार्यावर त्यांनी भर दिला. १८ मे १९९९ रोजी त्यांचे निधन झाले.

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 18-05-2026 News publication date | Time: 07:55 AM News publication time | Views: 242 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 18-05-2026 News publication date | Time: 07:55 AM News publication time | Views: 242 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement