नांदेड जिल्ह्याच्या उमरी तालुक्यातील गोरठा गावातील तीर्थक्षेत्र
नांदेड जिल्ह्याच्या उमरी तालुक्यातील गोरठा (किंवा गोरटे) हे गाव संतकवी श्री दासगणू महाराज यांच्या वास्तव्याने आणि कार्यामुळे एक पवित्र तीर्थक्षेत्र बनले आहे.
श्री दासगणू महाराज (१८६८-१९६२) हे शिर्डीच्या साईबाबांचे परमभक्त, थोर कीर्तनकार आणि संतकवी होते. त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे महिपती मानले जाते. १९३८-३९च्या सुमारास गोरठा येथील आनंदीबाई देशमुख यांच्या आग्रहाखातर महाराज या गावी आले. येथील शांत आणि प्रसन्न वातावरण त्यांना खूप आवडले आणि त्यानंतर ते दर वर्षी विश्रांतीसाठी व साधनेसाठी येथे दीर्घ काळ वास्तव्य करू लागले.
दासगणू महाराजांनी पंढरपूर येथे देह ठेवला; मात्र गोरठा हे त्यांच्या साधनेचे मुख्य केंद्र राहिले आहे. येथे महाराजांचे सुंदर समाधीमंदिर आहे.
ध्यानमंदिर : समाधी मंदिराच्या वरच्या मजल्यावर एक अत्यंत शांत ध्यानमंदिर आहे. येथे सकाळी प्रार्थना, करुणाष्टके आणि १० मिनिटांचे मौनयुक्त ध्यान केले जाते. येथे श्रीवरद नारायणाची सुंदर प्रतिमा आहे.
कीर्तनमंडप : संस्थानात एक भव्य कीर्तनमंडप असून, येथे विविध आध्यात्मिक कार्यक्रम आणि उत्सव साजरे होतात.
मंदिर परिसरात श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि श्री शनिदेवाचेदेखील छोटे मंदिर आहे. साधकांच्या निवासासाठी आणि विश्रांतीसाठी मानसविहार ही सोय उपलब्ध आहे.
महाराजांच्या पश्चात त्यांचे पुत्र आणि शिष्य स्वामी वरदानंद भारती (पू. अप्पा) यांनी या संस्थानचा कार्यभार सांभाळला आणि महाराजांचा वाङ्मयीन व आध्यात्मिक वारसा पुढे नेला. आज श्री दासगणू महाराज प्रतिष्ठानमार्फत या ठिकाणाचे व्यवस्थापन पाहिले जाते.
येथे येणाऱ्या साधकांसाठी नि:शुल्क भोजन आणि निवासाची व्यवस्था आहे; मात्र रात्रीच्या मुक्कामासाठी संस्थानची पूर्वपरवानगी आवश्यक असते. या ठिकाणी शांतता, स्वच्छता आणि सात्त्विकतेला खूप महत्त्व दिले जाते. केवळ कुतूहल म्हणून येण्यापेक्षा साधना करण्याच्या उद्देशाने येणाऱ्यांचे येथे स्वागत केले जाते.
कसे पोहोचता येते?
रेल्वे : दक्षिण-मध्य रेल्वेवरील उमरी हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे (नांदेड-निझामाबाद मार्ग). उमरीपासून गोरठा केवळ तीन किलोमीटर अंतरावर आहे.
रस्ते मार्ग : नांदेड ते गोरठा हे अंतर साधारण ४५ किलोमीटर आहे. नांदेडहून मुदखेड किंवा भोकरमार्गे खासगी वाहनाने किंवा बसने येथे येता येते. उमरीहून ऑटो रिक्षा सहज उपलब्ध होतात.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment