उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम होणार अधिक प्रभावी
अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांतील युवक-युवतींसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण (ईडीपी) कार्यक्रम राबवण्यात येतो. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अमृत संस्थेच्या विभागीय कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला अमृत संस्थेचे अमरावती विभाग व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, तसेच ईडीपी बॅचचे प्रशिक्षक तुषार लोटांगणे उपस्थित होते.
ईडीपी प्रशिक्षण अधिक प्रभावी करण्याबाबत या बैठकीत विभागीय व्यवस्थापक, जिल्हा व्यवस्थापक, उपव्यवस्थापक आणि तुषार लोटांगणे यांच्यात सविस्तर चर्चा झाली. आगामी काळात नवीन ईडीपी सत्रे सुरू करणे, तसेच प्रशिक्षणामध्ये व्यवसाय नियोजन, डिजिटल मार्केटिंग, स्वयंरोजगार संधी, उद्योग व्यवस्थापन आणि व्यक्तिमत्त्व विकास यांसारखे महत्त्वाचे घटक समाविष्ट करण्याबद्दल या वेळी चर्चा करण्यात आली.
तुषार लोटांगणे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रशिक्षक असून, व्यवसायवृद्धी व व्यवसाय प्रशिक्षण क्षेत्रात त्यांची विशेष हातोटी आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक युवकांना उद्योजकतेची दिशा मिळत आहे. ही बैठक ईडीपी प्रशिक्षण अधिक परिणामकारक व रोजगाराभिमुख करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment