सोलापूर जिल्ह्यातील हेमाडपंती स्थापत्यशैलीतील वारसा
देवगिरीच्या यादवांच्या काळात एकचक्रानगर म्हणून भरभराटीला आलेले आजचे वेळापूर (जि. सोलापूर) हे गाव केवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावरील प्रमुख टप्पा नाही, तर ते एक अद्भुत प्राचीन ऐतिहासिक आणि धार्मिक केंद्र आहे. येथे सुमारे सव्वासातशे वर्षांपूर्वीचे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील हरनारेश्वर महादेव म्हणजेच अर्धनारीनटेश्वर मंदिर दिमाखात उभे असून, आजही ते भाविक आणि इतिहासप्रेमींसाठी आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरत आहे.
देवगिरीच्या यादवांची उपराजधानी अन् ऐतिहासिक शिलालेख
यादव साम्राज्याच्या दक्षिण सीमेवर असल्याने वेळ (म्हणजेच सीमा) या शब्दावरून या गावाचे नाव वेळापूर असे पडले. माणदेशावर लक्ष ठेवण्यासाठी यादवांचे हे लष्करी ठाणे आणि उपराजधानी होती. यादव राजे रामचंद्रदेव यांचे अधिकारी ब्रह्मदेवराणा आणि बाईदेवराणा या बंधूंनी इ. स. १३०० ते १३०५ या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केला. डॉ. शां. भा. देव यांच्या ग्रंथात उल्लेख असलेले व मंदिराच्या परिसरात आढळणारे तीन शिलालेख या ऐतिहासिक वास्तूची साक्ष देतात. शिलालेखांमध्ये या देवाचा उल्लेख वटेश्वर असा करण्यात आला आहे.
मंदिराची रचना आणि सप्तसूर निघणारे वीरगळ
हेमाडपंती पद्धतीचे हे मंदिर संपूर्ण दगडी बांधणीचे आहे. मंदिराच्या परिसरात पुरातत्त्व खात्याने एक संग्रहालय उभारले आहे. तिथे अनेक प्राचीन वीरगळ जतन करून ठेवण्यात आले आहेत. यातील काही वीरगळांचे वैशिष्ट्य असे, की त्यावर बोटाने टिचकी मारल्यास किंवा हात फिरवल्यास त्यातून 'सप्तसूर' (संगीत) उमटतात.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment