आपल्या क्रांतिकारक वृत्तीसाठी आणि काव्य प्रतिभेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पंडीत रामप्रसाद बिस्मिल यांनी ब्रिटिश वसाहतवादी राजवटीविरुद्धच्या लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या क्रांतीकार्याचा आढावा घेणारा हा लेख -
पंडीत रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म ११ जून १८९७ रोजी उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर जिल्ह्यातील एका गावात मुरलीधर आणि मूलमती यांच्या घरी झाला. बिस्मिल आर्य समाजात (सन १८७५ मध्ये दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेली संस्था) सामील झाले आणि 'बिस्मिल' (अर्थात 'जखमी' किंवा 'अस्वस्थ') या टोपणनावाचा वापर करून एक प्रतिभावान लेखक व कवी बनले. जेव्हा त्यांनी प्रखर राष्ट्रवादी भारतीय आणि आर्य समाजाचे धर्मप्रचारक भाई परमानंद यांना सुनावण्यात आलेल्या मृत्युदंडाबद्दल वाचले, तेव्हा त्यांच्या मनात प्रथमत: क्रांतीचे विचार रुजले. तेव्हा ते १८ वर्षांचे होते आणि त्यांनी 'मेरा जन्म' या कवितेतून आपल्या व्यथा व्यक्त केल्या. त्यांचा स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक पद्धतीने लढण्यावर विश्वास होता.
बिस्मिल यांनी 'मातृवेदी' नावाची एक क्रांतिकारी संघटना स्थापन केली. सन १९१८ साली बिस्मिल आणि दीक्षित मैनपुरी कटात सामील झाले, ज्यामध्ये त्यांनी त्याकाळी प्रतिबंधित असलेल्या साहित्याचे वाटप केले.
२८ जानेवारी १९१८ रोजी त्यांनी त्यांचे दोन लेख लोकांना वितरित केले - 'देशवासियों के नाम संदेश' (देशवासियांना संदेश) आणि 'मैनपुरी की प्रतिज्ञा' (मैनपुरीचे व्रत). आपल्या पक्षासाठी निधी गोळा करण्याकरिता त्यांनी सन १९१८ साली तीन वेळा शासकीय तिजोरी लुटली. सन १९२० मध्ये त्यांनी सचिंद्रनाथ सन्याल आणि जादुगोपाल मुखर्जी यांच्यासोबत हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन (एचआरए) ची स्थापना केली. या संस्थेचा जाहीरनामा त्यांनी तयार केला होता. त्यात बिस्मिल यांनी एचआरएच्या जाहीरनाम्याचा उद्देश, सशस्त्र क्रांतीद्वारे संयुक्त भारतीय संघराज्याची स्थापना करणे हे सर्व नमूद केले होते. सन १९२५ मधील काकोरी रेल्वे दरोडा ही एचआरएची सर्वात मोठी क्रांतीकारी कारवाई होती, जिचा उद्देश क्रांतीकारी कार्यांसाठी निधी मिळवणे आणि इंग्रजांच्या नजरेत येणे हा होता. बिस्मिल आणि त्यांचे साथीदार चंद्रशेखर आझाद व अशफाकुल्ला खान यांनी लखनौजजवळील काकोरी येथे एक ट्रेन लुटण्याचा निर्णय घेतला. ते त्यांच्या प्रयत्नात यशस्वी झाले, परंतु हल्ल्यानंतर एका महिन्याच्या आतच त्यांना एचआरएच्या इतर डझनभर सदस्यांसह अटक करण्यात आली आणि काकोरी कट प्रकरणाअंतर्गत त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. त्याची कायदेशीर प्रक्रिया १८ महिने चालली. बिस्मिल, लाहिरी, खान आणि ठाकूर रोशन सिंग यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
एकीकडे बिस्मिल यांचे क्रांतीकार्य चालू होते तर दुसरीकडे त्यांच्या विपुल लेखनात हिंदी आणि उर्दूतील देशभक्तीपर कवितांचा समावेश होता; त्यांच्या स्फूर्तीदायी विचारांनी भारतीयांना स्वातंत्र्य लढ्यात सामील होण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या कवितांमधून सामाजिक समस्यांविषयीची चिंता आणि समानता व मानवी प्रतिष्ठेची तत्त्वे यांचाही समावेश होता. फाशी जाण्यापूर्वी लिहिलेल्या आपल्या शेवटच्या पत्रात, त्यांनी राष्ट्रसेवेसाठी हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र येऊन लढा देण्यावर जोर दिला होता. त्यांना १९ डिसेंबर १९२७ रोजी गोरखपूर तुरुंगात फाशी देण्यात आली. त्यांच्यावर राप्ती नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि नंतर त्या जागेचे नाव राजघाट असे ठेवण्यात आले.
- संदर्भ - www.drishtiias.com
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment