सुमधुर गीतांचे जनक - ज्येष्ठ संगीतकार वसंत देसाई

आपल्या अनेक गीतांनी आणि जादूई संगीतरचनांनी मराठी रसिकांवर भुरळ घालणारे ज्येष्ठ संगीतकार वसंत देसाई यांची आज जयंती; त्यानिमित्त त्यांच्या सप्तसुरांच्या प्रवासाचा हा छोटासा लेख-

सुमधुर गीतांचे जनक - ज्येष्ठ संगीतकार वसंत देसाई मुख्य फोटो
मुख्य फोटो

ज्येष्ठ संगीतकार वसंत देसाई यांचा जन्म ९ जून १९१२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील सोनवडे येथे झाला. वसंत देसाई यांचे बालपण कोकणात गेले. त्यांचे वडील कृष्णाजी व आई मुक्ताबाई होत्या. त्यांच्या मातोश्री मुक्ताबाई या प्रसिद्ध कीर्तनकारांच्या कन्या असल्याने लहानपणापासून वसंतरावांच्या कानावर भजन, कीर्तन, दशावतारी संगीत यांचे संस्कार झाले व त्यांना त्याची गोडीही लागली. त्यांचे शालेय शिक्षण सोनवडे येथेच झाले. त्यांना लहानपणी सर्कशीचे खूप आकर्षण वाटायचे, म्हणून ते कोकणातून कोल्हापूर येथे त्यांच्या काकांकडे आले; परंतु सर्कशीत न जाता ते प्रभात फिल्म कंपनीत गेले. मूकपटांतून त्यांनी किरकोळ भूमिकाही केल्या. सन १९३० मध्ये प्रभातच्या ‘खूनी खंजर’ या मूकपटात त्यांना छोटी भूमिका मिळाली. त्याच सुमारास प्रभात फिल्म कंपनीच्या ‘अयोध्येचा राजा’ (१९३१) या पहिल्या बोलपटात त्यांनी संगीत दिग्दर्शक गोविंदराव टेंबे यांचे साहाय्यक म्हणून काम केले, तर सन १९३४ साली प्रभात फिल्म कंपनीचे कोल्हापुराहून पुण्यास स्थलांतर झाल्यावर वसंतरावांनी केशवराव भोळे आणि मा. कृष्णराव फुलंब्रीकर यांच्यासारख्या संगीत-अभ्यासकांबरोबर साहाय्यक म्हणून काम केले. त्यांच्या सहवासात राहून त्यांनी गाण्यातील स्वर, तान, मुरकी इ. संगीत-विशेष समजून घेतले व रसानुकूल भावदर्शन आपल्या गाण्यात आणण्याचे कसब आत्मसात केले. स्वतंत्र स्वररचनेचे तंत्रही त्यांनी हाताळले. कोल्हापुरातील वास्तव्यात ते गायन समा, देवल क्लब या संगीत संस्थेत जात असत. तेथे त्यांना शास्त्रीय संगीतातील दिग्गज उस्ताद अलाउद्दीन खाँ, उस्ताद अब्दुलकरीम खाँ, उस्ताद मंजी खाँ आणि रामकृष्णबुवा वझे यांचा सहवास लाभला. याचाही परिणाम त्यांची शास्त्रीय संगीतातील रुची वाढण्यात झाला.

काहीतरी वेगळे करण्याच्या ध्येयाने ते कोल्हापूरला आले. तिथे प्रभातमध्ये असताना पडेल ते काम करीत असत. त्यांचे आयुष्य घडण्याला इथूनच सुरुवात झाली. देवल क्लबमध्ये असताना अल्लादियां खाँ व मंजी खाँ यांसारख्यांचे गाणे ऐकून त्यांचे कान तयार झाले. ‘अयोध्येचा राजा’तील पहिली नांदी ही नाटकातल्या नांदीप्रमाणे होती. या नांदीमध्ये वसंत देसाईंचा आवाज होता. म्हणजेच बोलपटांची सुरुवात देसाईंच्या आवाजाने झाली असे म्हटले तर वावगे होणार नाही. त्यांनी सुरुवातीला अनेक हिंदी चित्रपटांमध्ये गीते गायली. प्रभातमध्ये संगीत, पार्श्वसंगीत देण्यास सुरुवात झाली होती. ‘संत ज्ञानेश्वरा’मध्ये गाडीवानाची भूमिका, संगीतासाठी बैलांचे खूर व बैलगाडीचा आवाज, विविध पक्ष्यांचे आवाज, ग्रामीण वाद्यांचा सुयोग्य वापर अशी त्यांची अनेक संगीतविशेष सांगता येतील. केशवराव भोळे, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव ह्या प्रभातच्या सुरुवातीच्या काळातील दिग्गज संगीत दिग्दर्शकांसोबत ते तयार झाले. पुढे ते शांतारामबापूंबरोबर राजकमलमध्ये आले. त्यांचा पहिला स्वतंत्रपणे संगीत दिलेला चित्रपट होता- शकुंतला (हिंदी). राजकमलच्या या शकुंतलाने उत्पन्नांचे सर्व रेकॉर्ड्स मोडले. पहिला तमाशाप्रधान चित्रपट ‘राम जोशी’मधील ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या लावण्यांना वसंतरावांनी फक्कड चाली दिल्या. कवी होनाजी बाळा यांच्या जीवनावर काढलेल्या ‘अमरभूपाळी’ या चित्रपटातील ‘घनश्याम सुंदरा’ ही भूपाळी अप्रतिम स्वररचनेमुळे खरोखरच अमर झाली आहे. अभिजाततेने ओतप्रोत भरलेल्या नृत्यांवर आधारित ‘झनक झनक पायल बाजे’चे संगीत वसंत देसाईंनी अजरामर केले आहे. त्यांनी त्यासाठी भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण वाद्यांचा अभ्यास केला. पं. शिवकुमार शर्मा, पं. सामताप्रसाद, सुदर्शन, गोपीकृष्ण व मृदंगवादक रामदास या सर्वांना त्यांनी राजकमलमध्ये पाचारण केले. ‘झनक झनक’ने अफाट यश संपादन केले आणि त्यांची कीर्ती सगळीकडे झाली. आचार्य अत्रे यांनी १९५६ मध्ये काढलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाचे संगीत वसंत देसाईंचे होते. श्यामच्या आईमध्ये ६ गाणी होती. मराठमोळे वातावरण निर्माण करणारे अप्रतिम पार्श्वसंगीत त्यांनी या चित्रपटास दिले. म्हणूनच या चित्रपटाच्या यशातील मोठा वाटा वसंतरावांकडे जातो.

वसंत देसाईंनी एकूण २० मराठी चित्रपटांना संगीत दिले. ‘छोटा जवान’मधील ‘माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू’ हे गाणे किंवा ‘मोलकरीण’मधील ‘देव जरी मज’ किंवा ‘दैव जाणिले कुणी’ ही गाणी सर्वश्रुत आहेत. ‘इये मराठीचिये नगरी’तील गीतांचे संगीतही प्रसंगानुरूप होते. त्यांनी पाठ्यपुस्तकांतील अनेक कवितांना, जसे- या बाई या, देवा तुझे किती, माझ्या मामाची रंगीत गाडी, लेझिम चाले जोरात, घाल घाल पिंगा वाऱ्या, आनंदी आनंद गडे इत्यादी कवितांना सोप्या, सुंदर चाली दिल्या. शास्त्रीय रागांवर आधारित असंख्य गाणी त्यांनी हिंदी-मराठीतून दिली. शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गजांना त्यांनी चित्रपट माध्यमात आणले. मा. वसंत देसाई यांनी ‘गुड्डी’ चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेलं ‘हमको मनकी शक्ती देना’ हे प्रार्थना गीत गेली अनेक वर्षे देशभरातल्या शाळांमधून गायले जाते. वसंतरावांनी संगीतबद्ध केलेल्या ‘बोले रे पपीहरा’, ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’, ‘सुखाचे हे सुख श्रीहरी मुख’, ‘काय माझा आता पाहतोसी अंत’ या गाण्यांमुळे वाणी जयराम प्रसिद्ध झाल्या. जवळजवळ ६५ हिंदी-मराठी चित्रपटांचे ते संगीत दिग्दर्शक होते. चित्रपट-नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले. त्यांच्या ‘ए मालिक तेरे बंदे हम’ या गीताला पाकिस्तानात राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला. १९६२ च्या चीन युद्धाच्या वेळचे ‘जिंकू किंवा मरू’ या ग. दि. माडगूळकर यांच्या गीताला त्यांनीच चाल लावली होती. सन १९४२ ते १९७६ या कालावधीत मा. वसंत देसाई यांनी एकूण ४६ चित्रपटांना उत्कृष्ट संगीत दिले. वसंत देसाई यांच्या स्वरसाजाने समृद्ध झालेल्या ‘पंडितराज जगन्नाथ’ या नाटकाने मराठी रंगभूमीची संगीत परंपरा पुन्हा सुरू केली. या नाटकातील ‘जय गंगे भागिरथी’ आणि ‘नयन तुझे जादुगार’ ही गाणी खूप गाजली. याशिवायही जय जय गौरीशंकर, देव दीनाघरी धावला, देह देवाचे मंदिर, शाबास बिरबल इत्यादी नाटकांना त्यांनी संगीत दिले. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. मा. वसंत देसाई हे सन १९७३ मध्ये मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी काही चित्रपटांत भूमिकाही केल्या होत्या. हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये स्वतः गायलेली उत्तम गाणी त्यांनी दिली. सन १९६० ते १९७५ मध्ये संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन करून त्यांना संगीत दिले. त्यांनी १३ लघुपटांनाही संगीत दिले. अशा या थोर संगीतकार आणि कलाकाराचे २२ डिसेंबर १९७५ रोजी निधन झाले.
-संदर्भ- प्रहार वृत्त

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 09-06-2026 News publication date | Time: 11:18 AM News publication time | Views: 11 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 09-06-2026 News publication date | Time: 11:18 AM News publication time | Views: 11 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement