महिलांचे आरोग्य आणि पर्यावरण यांचे संरक्षण करणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या निर्मितीचा उद्योग
रत्नागिरी जिल्ह्याच्या दुर्गम व डोंगराळ भागात वसलेल्या हरचिरी गावाती एका प्रेरणादायी उद्योजिकेची ही कथा आहे. ही केवळ उद्योजिकेची यशोगाथा नाही, तर तिच्या सामाजिक बांधिलकीचीही कहाणी आहे. समाजशास्त्र विषयात पदवी (बीए, सोशिऑलॉजी) प्राप्त केलेल्या सौ. रश्मी विनोद प्रभुदेसाई यांनी ग्रामीण महिलांच्या आरोग्याच्या गंभीर प्रश्नावर उपाय शोधून ‘फॅबनॅप’ या सॅनिटरी नॅपकिन्सच्या ब्रँडच्या माध्यमातून एक प्रभावी सामाजिक-व्यावसायिक चळवळ उभी केली आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे रत्नागिरी जिल्हा उपव्यवस्थापक अवधूत मुळ्ये यांनी नुकतीच सौ. रश्मी यांच्या उद्योगाला भेट देऊन पाहणी केली. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील घटकांकरिता ही यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी आणि आदर्श घ्यावा अशी आहे.
दुर्गम भागात राहून उद्योग सुरू करणे म्हणजे अपुऱ्या पायाभूत सुविधा, वाहतुकीची अडचण, बाजारपेठेचा अभाव, कच्च्या मालाची उपलब्धता आणि जनजागृतीचा अभाव अशा अनेक अडचणी असतात; मात्र या सर्व अडचणींवर मात करून सौ. रश्मी प्रभुदेसाई यांनी आपल्या जिद्दीच्या, चिकाटीच्या आणि समाजभानाच्या जोरावर हा उद्योग यशस्वी करून दाखवला.
ग्रामीण भागातील महिलांमध्ये मासिक पाळीच्या काळातील स्वच्छतेबाबत अद्यापही पुरेशी माहिती नसल्याने अनेक महिलांना विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. ही परिस्थिती लक्षात घेऊन सौ. रश्मी यांनी सुरक्षित, आरोग्यपूर्ण व पर्यावरणपूरक (बायोडिग्रेडेबल) सॅनिटरी नॅपकिन्स तयार करण्याचा धाडसी निर्णय घेतला. सुरुवातीला केवळ एका साध्या हँड मशीनपासून सुरू झालेला हा प्रवास आज ‘फॅबनॅप’ या विश्वासार्ह ब्रँडपर्यंत पोहोचला आहे. विविध प्रदर्शनांमध्ये सहभाग, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, महिलांशी थेट संवाद आणि परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार उत्पादन यामुळे ‘फॅबनॅप’ने अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. कारण ही पॅड्स महिलांच्या आरोग्यासाठी सुरक्षित असून, पर्यावरणासाठीही घातक नाहीत.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सौ. रश्मी प्रभुदेसाई यांना आतापर्यंत दोन मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचा ‘उद्योगिनी’ पुरस्कार त्यांना मिळाला आहे. तसेच रत्नागिरीच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने ‘सन्मान नारीशक्तीचा’ उपक्रमात ‘लघुउद्योजिका’ म्हणून त्यांचा गौरव केला आहे. हे पुरस्कार त्यांच्या उद्योगकौशल्यासोबतच सामाजिक योगदानाची पावती आहेत.
या यशस्वी प्रवासामागे त्यांना त्यांचे पती म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नर्सरीचे मालक विनोद प्रभुदेसाई यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व मोलाचे प्रोत्साहन लाभले आहे. “कठीण परिस्थितीतही हार न मानता पुढे जाण्याचा आत्मविश्वास त्यांनी मला दिला,” असे सौ. रश्मी प्रभुदेसाई सांगतात. या उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी महिला कामगारांना रोजगाराच्या संधी, योग्य वेतन आणि सन्मान देऊन महिला सक्षमीकरणालाही मोठा हातभार लावला आहे. जिल्हा परिषद आरोग्य केंद्रे, अनाथाश्रम, वैद्यकीय शिबिरे, आपत्ती काळातील मदतकार्य आणि स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या सासवड येथील आश्रमाला फॅबनॅप सॅनिटरी नॅपकिन्स मोफत वितरित करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
'सीएमईजीपी' योजनेअंतर्गत मिळालेल्या कर्जाच्या साह्याने उभारलेल्या या उद्योगात उत्पादित झालेली सॅनिटरी पॅड्स आज रत्नागिरीसह संपूर्ण महाराष्ट्रात शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, सामाजिक संस्था व कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. दुर्गम भागातून उभी राहिलेली ही यशस्वी उद्योजिका हेच सिद्ध करून दाखवते, की योग्य संधी, त्या संधीचे सोन्यात रूपांतर करण्याची इच्छाशक्ती, कुटुंबाचे पाठबळ आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रामाणिक जिद्द असेल, तर कोणतीही अडचण यशाच्या आड येत नाही. आपणही या आरोग्य चळवळीमध्ये वितरक म्हणून सहभागी होऊ शकता.
अधिक माहितीसाठी संपर्क
सौ. रश्मी विनोद प्रभुदेसाई
मोबाइल - 9969816532, 9423845600
.....
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment