अकोल्याजवळील बोरगाव मंजू येथे विटांमध्ये उभारलेले प्राचीन कृष्ण मंदिर सुंदर चतुर्भुज कृष्णमूर्ती, वैशिष्ट्यपूर्ण दगडी द्वारशाखा आणि दुर्मीळ शिल्पकलेमुळे ऐतिहासिकदृष्ट्या अभ्यासनीय ठरते.
अकोल्यापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर अमरावती रोडवर बोरगाव मंजू हे गाव आहे. गावातील सरकारी रुग्णालयाजवळ हे जुने कृष्ण मंदिर आहे. मंदिर विटांमध्ये बांधलेले असून दगडी पायावर उभे आहे. मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे.
सर्वसाधारणपणे जुन्या मंदिरांची रचना सभामंडप आणि गर्भगृह अशा स्वरूपाची आढळते. मात्र, या मंदिराची रचना काहीशी वेगळी आहे. येथे केवळ गर्भगृह असून सभामंडप नाही. अंदाजे १२ × १२ फूट आकाराच्या या गर्भगृहात चोथऱ्यावर काळ्या दगडातील भगवान कृष्णाची अतिशय सुंदर चतुर्भुज मूर्ती विराजमान आहे. सुमारे चार फूट उंचीची ही बासरी वाजवणाऱ्या कृष्णाची मूर्ती लक्षवेधी आहे. भक्तांनी मूर्तीला सुंदर मुकुट घालून विविध अलंकारांनी सजवले आहे.
मंदिराच्या आतील छताला गोल घुमटाकार रचना आहे. छतामध्ये अनेक चिमण्यांनी घरटी केलेली आहेत. त्यामुळे मंदिरात प्रवेश करताच त्यांच्या चिवचिवाटाने परिसर अक्षरशः दणाणून जातो.
मंदिराचा सर्वात विशेष भाग म्हणजे येथील दगडी द्वारशाखा. मंदिराची बहुतांश रचना जुन्या विटांमध्ये केलेली असली, तरी प्रवेशद्वाराची द्वारशाखा मात्र दगडात कोरलेली असून सुंदर शिल्पाकृतींनी सजवलेली आहे.
ही द्वारशाखा तीन थरांमध्ये तयार करण्यात आली आहे. बाहेरील थर खांबाच्या आकाराचा असून, दोन्ही बाजूंच्या तळाशी सुंदर देवींची शिल्पे कोरलेली आहेत. दुसऱ्या थरात विविध स्त्रीशिल्पे असून त्यामध्ये बासरी तसेच विविध वाद्ये वाजवणाऱ्या स्त्रीशिल्पांचाही समावेश आहे. तिसऱ्या थरात सुंदर नक्षीकाम केलेले असून, तळाशी कलश धारण केलेल्या स्त्रीचे शिल्प आहे.
द्वारशाखेच्या ललाटबिंबावर, म्हणजेच प्रवेशद्वाराच्या वरील पट्टीच्या मध्यभागी, भगवान महावीरांची ध्यानमुद्रेतील मूर्ती कोरलेली दिसते. मंदिराच्या स्थापत्यातील हा एक विशेष आणि अभ्यासनीय भाग आहे.
मंदिराचा कळसही विटांमध्ये बांधलेला असावा. कळसाच्या भागावर बैल, माकड तसेच काही साधूंची शिल्पे दिसतात. मंदिराजवळच एक जुनी विहीरदेखील आहे. मंदिराला भेट देताना ही विहीरसुद्धा आवर्जून पाहण्यासारखी आहे.
या मंदिराचा नेमका इतिहास, बांधकामाचा काळ आणि स्थापत्याशी संबंधित अधिकृत माहिती सध्या माझ्यासाठी अज्ञात आहे. गावात विचारपूस करूनही मंदिराबाबत विशेष माहिती मिळू शकली नाही. मंदिराची सध्याची अवस्था पाहता ही वास्तू काहीशी दुर्लक्षित असल्याचे जाणवते.
या मंदिराच्या इतिहासाबाबत किंवा बांधकामाच्या काळाबाबत कोणाकडे अधिक माहिती असल्यास, कृपया ती शेअर करावी. आपल्या परिसरातील अशा दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तूंची माहिती जतन होणे आणि पुढे पोहोचणे गरजेचे आहे.
साभार - संदिप साखरे
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment