देशभक्तांचे कार्य मशालीसारखे मानले, तर त्यांच्या पत्नीचे कार्य निश्चितच नंदादीपासारखे होते. त्या कार्याची ओळख करून देणाऱ्या पुस्तकाचा परिचय...
‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी राष्ट्रभक्तीच्या यज्ञकुंडात आपल्या जीवनाची समिधा हसत हसत समर्पित करणाऱ्या देशभक्तांची जीवनचरित्रे म्हणजे राष्ट्रभक्तीच्या धगधगत्या मशाली आहेत. एक पाय तुरुंगात आणि दुसरा बाहेर अशा देशभक्तांशी लग्न करून त्यांची सहधर्मचारिणी होणे हे अग्निदिव्यच होते. हे अग्निदिव्य ज्या महिलांनी पार पाडले त्यांच्या कार्याचा गौरव केला जात नाही. देशभक्तांचे कार्य मशालीसारखे मानले, तर त्यांच्या पत्नीचे कार्य निश्चितच नंदादीपासारखे होते. म्हणून तर अशा महिलांचा ‘समईच्या शुभ्रकळ्या’ म्हणून कार्यगौरव करणे समर्पक ठरते.’
या प्रस्तावनारूपातील शब्दांमधूनच ‘समईच्या शुभ्रकळ्या’ या पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित होते. या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबाराव सावरकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, र. धों. कर्वे अशा देशभक्तांच्या सहधर्मचारिणींविषयीची माहिती आहे. या महिलांनी अशा थोर पुरुषांसोबत संसार करताना काय आणि किती त्याग केला असेल याला सीमा नाही, हे पुस्तक वाचून समजते. सावरकर यांची काळ्या पाण्याची शिक्षा, त्यांच्या घरात वेळोवेळी पोलिसांकडून पडणाऱ्या धाडी, त्यात महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागू नयेत म्हणून या महिलांनी घेतलेली काळजी, त्यांचे तापट, लहरी स्वभाव झेलत, त्यांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल संसाराची, मुलांची काळजी त्यांनी कशी घेतली, हे सारे वाचून त्यांच्या त्यागाची कल्पना येते. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, या उक्तीचा या पुस्तकाच्या पानापानातून प्रत्यय येतो. या साऱ्या माउलींच्या कार्याला त्रिवार वंदन!! आवर्जून वाचावे आणि प्रेरणा घ्यावी असे पुस्तक.
पुस्तकाचे नाव - समईच्या शुभ्रकळ्या
लेखिका - वसुधा परांजपे
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment