रत्नपारखी - अमृत महाराष्ट्र

रत्नपारखी

बोधकथा - १७

रत्नपारखी मुख्य फोटो
रत्नपारखी अतिरिक्त फोटो

एका गावातला एक तरुण अतिशय साधा, भोळा आणि प्रेमळ होता. कोणी कसेही वागो; पण त्याने आपला चांगुलपणा कधीच सोडला नव्हता. परंतु एक वेळ अशी येते, जेव्हा संयमाचा बांध फुटतो आणि आपल्याला स्वत:च्या चांगुलपणाचाही राग येऊ लागतो. मन व्यवहारी होते, स्वार्थी होते. परंतु हा बदलही आपल्याला सहन होत नाही. कारण चांगले वागणे हा आपला स्थायीभाव असतो. त्या तरुणाच्या बाबतीतही तेच झाले. तो अतिशय अस्वस्थ होता. त्याने गावातल्या एका साधूबाबांकडे जाऊन शंका विचारली. साधू महाराजांनी त्याला आपल्या सदऱ्याच्या खिशातून काढून एक अंगठी दिली आणि म्हणाले, 'पुढचा आठवडाभर ही अंगठी तू तुझ्याजवळ ठेव आणि त्याची किंमत किती मिळू शकेल याचा शोध घे. फक्त काही केल्या ही अंगठी विकू नकोस!'

प्रश्न आणि उत्तर यांचा काहीही संबंध नसताना साधूमहाराजांनी दिलेले काम पाहून तरुण निराश झाला. परंतु त्याने दिलेले काम पूर्ण करायचे त्याने ठरवले. तो एका व्यापाऱ्याजवळ गेला. त्याला अंगठी दाखवली. तो त्या अंगठीचे हजार रुपये देईन म्हणाला. तरुण मुलगा दुसऱ्या व्यापाऱ्याकडे गेला, त्या व्यापाऱ्याने दहा हजारांची बोली लावली. तिथून तो एका सोनाराकडे गेला. सोनाराने अंगठी नीट पाहिली आणि म्हणाला 'एक लाख रुपये देतो, पण ही अंगठी मलाच विक!' तरुण मुलगा गोंधळला. तिथून तो एका रत्नपारख्याकडे गेला. त्याने मोल ठरवायला वेळ लावला; पण त्याने जे उत्तर दिले ते ऐकून तरुण मुलगा चक्रावला. तो म्हणाला, 'माझी सगळी संपत्ती देऊ केली तरी या अंगठीचे मोल मला फेडता येणार नाही.'

हे ऐकून गोंधळलेला तरुण साधूमहाराजांकडे परत आला. त्याने सगळी हकीकत सांगितली. त्यावर साधूमहाराज म्हणाले, 'बाळा, अंगठीची किंमत ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार सांगितली. जो खरा रत्नपारखी होता, त्याने ही अंगठी अमूल्य आहे असे सांगितले. याचाच अर्थ आपले गुण ओळखणारा आणि त्या गुणांची कदर करणारासुद्धा तेवढाच गुणवान असावा लागतो. जे लोक तुझी किंमत करत नाहीत, ते त्यांच्या कुवतीप्रमाणे तुझ्याशी व्यवहार करतात; मात्र जे तुला ओळखतात त्यांना तुझी किंमत, योग्यता समजते. तू ही अंगठी आहेस हे आधी ओळख आणि तुझी किंमत सामान्य व्यापाऱ्याने ओळखावी अशी अपेक्षा करू नकोस. तू तुझा चांगुलपणा कायम ठेव. कोणीतरी रत्नपारखी आयुष्यात नक्कीच भेटेल.'
(संकलित)

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 27-01-2026 News publication date | Time: 11:57 AM News publication time | Views: 194 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 27-01-2026 News publication date | Time: 11:57 AM News publication time | Views: 194 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement