सुधा मूर्तींच्या प्रेरक पुस्तकाचा परिचय...
सुधा मूर्ती सिद्धहस्त लेखिका आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनातील अनुभव त्यांच्या लेखणीतून प्रभावीपणे उतरतात. त्याची प्रचीती त्यांची पुस्तके वाचताना येते. 'वाइज अँड अदरवाइज' हे पुस्तकही त्याला अपवाद नाही. देशाच्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागास भागांमध्ये सुधा मूर्ती यांनी भटकंती केली आहे. त्या पायी फिरल्या आहेत. त्यांनी बसनेही प्रवास केला आहे. या भागात अठराविश्वे दारिद्र्यात राहणाऱ्या माणसांच्या दारात आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या सुविधा नेऊन पोचवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत.
त्यांच्या या कार्यामुळेच समाजाच्या विविध स्तरांतील असामान्य व्यक्तींच्या सहवासात त्या आल्या. मग ते मुंबईतून उठून जाऊन भूकंपग्रस्त गुजरातमध्ये स्थायिक होणारे एक निर्धन कुटुंब असो, हुंड्यासाठी बळी गेलेल्या एका तरुणीची माता असो... नाहीतर मोठ्या रकमेचा चेक देणगी म्हणून पाठवणारा अनामिक दाता असो... या सर्वांमुळे, त्यांच्या हृदयाला स्पर्श करून जाणाऱ्या कहाण्यांमुळे आणि त्यांच्या मुलखावेगळ्या जीवनविषयक तत्त्वज्ञानामुळे सुधा मूर्तींचे जीवन समृद्ध होऊन गेलं आहे. एक प्राध्यापिका आणि एक समाजसेविका या दोन्ही नात्यांनी त्यांना जे काही विलक्षण अनुभव आले, ते त्यांनी या पुस्तकातून आपल्यापुढे मांडले आहेत. विनोदाची झालर असलेल्या त्यांच्या घरगुती, मनमोकळ्या लेखनशैलीतून तयार झालेले हे पुस्तक सुधा मूर्ती यांचे कार्य आणि त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान यांचे व्यापक दर्शन घडवणारे आहे.
पैसा, घर, मोठ्या पगाराची नोकरी यांमुळे जीवन कधीच समृद्ध होत नाही, तर ते समृद्ध होते ते आपल्या जीवनात आलेल्या सामान्य माणसांमुळे. त्या सामान्य माणसांनी दिलेली असामान्य शिकवण म्हणजे अनुभव असतो आणि अशा अनुभवांनीच आयुष्य समृद्ध होते, गरज असते ती त्या माणसांच्या निरीक्षणाची आणि त्या अनुभवावरून आपल्यात येणाऱ्या परिपक्वतेच्या जाणिवेची आणि हेच आपल्याला या पुस्तकातून मिळते. त्यामुळे हे अवश्य वाचावे असे पुस्तक आहे.
पुस्तकाचे नाव : वाइज अँड अदरवाइज
मूळ लेखिका : सुधा मूर्ती
मराठी अनुवाद : लीना सोहोनी
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment