रामकृष्ण परमहंस - अमृत महाराष्ट्र

रामकृष्ण परमहंस

आध्यात्मिक गुरू, महान संत आणि विचारवंत स्वामी रामकृष्ण परमहंस यांची १८ फेब्रुवारी ही जयंती. त्या निमित्ताने त्यांचा अल्प परिचय...

रामकृष्ण परमहंस मुख्य फोटो
मुख्य फोटो

रामकृष्ण परमहंस हे महान संत, आध्यात्मिक गुरू आणि विचारवंत होते. सर्व धर्मांच्या एकतेवर त्यांनी भर दिला. देवाचे दर्शन घडू शकते यावर त्यांचा लहानपणापासूनच विश्वास होता. त्यामुळे त्यांनी भगवंताच्या प्राप्तीसाठी कठोर साधना केली. मानवतेचे पुजारी असलेल्या स्वामी रामकृष्ण यांची १८ फेब्रुवारी ही जयंती. त्या निमित्ताने त्यांचा परिचय करून देणारा हा लेख...

स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा जन्म १८ फेब्रुवारी १८३६ रोजी बंगालमधील कमरपुकुर गावात एका गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. गदाधर चट्टोपाध्याय हे त्यांचे मूळ नाव. रामकृष्ण परमहंस यांचे कुटुंब अतिशय धार्मिक होते आणि त्यांच्या वडिलांनीच त्यांना रामकृष्ण हे नाव दिले. बारा वर्षे गावातील शाळेत शिकल्यानंतर रामकृष्ण यांनी पारंपरिक शिक्षण सोडले. त्यांना त्यात रस नव्हता. ते धार्मिक शिक्षण घेतलेल्या लोकांशी संवाद साधत असत. त्यामुळे पुराण, रामायण, महाभारत आणि भागवत पुराणात ते पारंगत झाले. त्यांना बंगाली लिहिता-वाचता येत होते. रामकृष्ण परमहंस लहानपणापासूनच कालिमातेचे निस्सीम भक्त होते. रात्रंदिवस ते कालिमातेच्या पूजनात लीन असत. कालिमातेचे दर्शन व्हावे, यासाठी त्यांनी वयाच्या १७व्या वर्षी कुटुंबाचा त्याग करून आपले सर्वस्व कालिमातेच्या चरणी अर्पण केले. 

वडील खुदीराम यांचा रामकृष्णांवर विशेष प्रभाव होता. रामकृष्ण यांच्या परमहंस या उपाधीबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जातात. वास्तविक पाहता जे आपल्या इंद्रियांवर संपूर्णपणे नियंत्रण मिळवतात, ज्या व्यक्तीकडे ज्ञानाचे असीम भांडार आहे, त्यांना ही उपाधी दिली जाते. रामकृष्णांकडे दोन्ही गोष्टी होत्या. त्यामुळे त्यांना परमहंस ही उपाधी देण्यात आली. गुरू तोतापुरी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करून गदाधर म्हणजेच रामकृष्ण यांना परमहंस पद प्राप्त झाले. त्यांचे सर्वांत प्रसिद्ध अनुयायी स्वामी विवेकानंद होते. 

रामकृष्ण परमहंसांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. इंद्रियांवर विजय मिळवल्यानंतर एक महान तत्त्वज्ञ आणि विचारवंत म्हणून त्यांनी समाजाला अनेक उपदेश केले. रामकृष्णांच्या ज्ञानाच्या प्रभावामुळेच नरेंद्रनाथ दत्त स्वामी विवेकानंद झाले. भारतासह जागतिक पातळीवर विवेकानंदांनी आपल्या ज्ञानाच्या, बुद्धीच्या आणि उपदेशाच्या जोरावर विशेष ठसा उमटवला. अमेरिकेतील शिकागो येथील भाषणामुळे स्वामी विवेकानंद जगविख्यात झाले. आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. बेलूर येथील मठाद्वारे याचे संचालन केले जाते. विवेकानंद रामकृष्णांना ठाकूर असे संबोधायचे. विवेकानंदांप्रमाणे अनेक शिष्य रामकृष्णांनी घडवले. रामकृष्णांनी एकही ग्रंथ वाचला नव्हता. काही पुराणे-प्रवचने ऐकली होती. आध्यात्मिक साधनेतून घेतलेला साक्षात अनुभव हा त्यांच्या विचारांचा एकमेव आधार होता. सारे बोलणे प्रचीतीचे होते. त्यामुळे स्वामी दयानंद, बंकिमचंद्र चटर्जी, पं. ईश्वरचंद्र विद्यासागर किंवा केशवचंद्र सेन अशा नामवंत व्यक्तीही त्यांच्या आध्यात्मिक धारणेच्या दर्शनाने प्रभावित झाल्या. बलराम बसू, डॉ. रामचंद्र दत्त, साधू नागमहाशय, महेंद्रनाथ गुप्त, गिरीशचंद्र घोष, सुरेंद्रनाथ मित्र हे त्यांचे प्रमुख गृहस्थाश्रमी शिष्य होते. या शिष्यांनी समाजासाठी मोठे कार्य केले. रामकृष्ण परमहंस अखेरचे सात-आठ महिने घशाच्या कर्करोगाने आजारी होते. १६ ऑगस्ट १८८६ रोजी कलकत्त्यामधील काशीपूरच्या उद्यानगृहात त्यांनी महासमाधी घेतली. 

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 18-02-2026 News publication date | Time: 05:55 AM News publication time | Views: 117 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 18-02-2026 News publication date | Time: 05:55 AM News publication time | Views: 117 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement