रक्तदान आणि आरोग्य शिबिराचेही आयोजन
नांदेड : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ आणि २० फेब्रुवारी रोजी अमृतपेठ खुल्या बाजारपेठेचे आयोजन केले आहे. रिंग रोडवरील अंबिका मंगल कार्यालय येथे ही बाजारपेठ भरणार असून, स्वदेशी वस्तूंच्या प्रसारासाठी हा विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. यासोबतच सामाजिक जबाबदारी म्हणून अमृत संस्थेने या दोन दिवसांत विशेष शिबिरांचे आयोजन केले आहे. त्यात रक्तदान शिबिराचा समावेश असून, शिवजयंतीच्या निमित्ताने रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या व्यतिरिक्त तज्ज्ञ डॉक्टरांकडून सर्वांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार असून, नेत्र तपासणी शिबिरात डोळ्यांची तपासणी करून विकारांबाबत मोफत सल्ला दिला जाणार आहे.
'स्वदेशी वस्तूंच्या वापराला चालना देण्यासाठी आणि स्थानिक कारागिरांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या 'अमृत' संस्थेने हे पाऊल उचलले आहे. नांदेडमधील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाला भेट देऊन लाभ घ्यावा,' असे आवाहन अमृत संस्थेचे उपविभागीय व्यवस्थापक ओंकार शेटे, जिल्हा व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी, जिल्हा उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी, अमृतसखी मनीषा कुनसावळीकर, चिन्मय पाटील, आशिष पांडे यांनी केले आहे.
अमृतपेठ बाजारपेठेविषयी :
या बाजारपेठेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शंभर टक्के स्वदेशी वस्तूंची उपलब्धता. ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या दर्जेदार वस्तू खरेदी करता येतील. यामध्ये प्रामुख्याने खालील वस्तूंचा समावेश असेल.
खाद्य व वस्त्रप्रावरणे : अस्सल महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ, हातमाग (हँडलूम) वस्तू आणि तयार कपडे.
सजावट व दागिने : गृहोपयोगी सजावटीच्या वस्तू आणि आकर्षक ज्वेलरी.
सेवा क्षेत्र : बँकिंग सेवा, विमा सेवा यांची माहिती देणारे स्टॉल्स आणि मुलांसाठी खेळणी.
दिनांक : १९ आणि २० फेब्रुवारी २०२६.
वेळ : सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत.
स्थळ : अंबिका मंगल कार्यालय, रिंग रोड, नांदेड
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment