बोधकथा - ३५
पुढच्या आयुष्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेल्या अब्राहम लिंकन यांच्या जीवनातील ही कथा आहे. ते लहानपणी अतिशय गरिबीत वाढले. घरची परिस्थिती हलाखीची. त्यामुळे त्यांना औपचारिक शिक्षण फारसे घेता आले नाही; पण त्यांची ज्ञानाची भूक प्रचंड होती. शिक्षण हेच विकासाचे सर्वांत प्रभावी साधन आहे, याची त्यांना जाणीव झाली होती.
लहान वयातच त्यांनी प्रचंड वाचनाची आवड जोपासली होती. मिळेल त्यांच्याकडून ते वाचनासाठी पुस्तके मागून आणत. कधी कधी एखादे पुस्तक मिळवण्यासाठी ते मैलोनमैल चालत जात. त्यांनी इसापनीती, रॉबिन्सन क्रुसो, बायबल यांसारखी पुस्तके वाचली. त्यातील कथांनी त्यांचे केवळ मनोरंजन केले नाही, तर मानवी स्वभाव, नैतिकता आणि जीवनमूल्ये यांचे आकलनही वाढवले.
दिवसभर शेतात काम करून, घरची कामे आटोपून ते रात्री चुलीच्या मंद प्रकाशात पुस्तक वाचत बसत. त्यांच्या आई नॅन्सी हॅंक्स लिंकन यांनी लहानपणापासून शिकण्याची ओढ त्यांच्या मनात रुजवली होती. त्यांच्या निधनानंतर सावत्र आई सारा बुश जॉन्स्टन लिंकन यांनीही त्यांना तितक्याच प्रेमाने पाठबळ दिले आणि वाचनाची आवड जोपासली.
“दी लाइफ ऑफ जॉर्ज वॉशिंग्टन” हे पुस्तक वाचायची त्यांना फार इच्छा होती. त्यांनी ते पुस्तक उसने आणले; पण एका रात्री वादळ झाले. ते झोपेत असताना खिडकीतून पावसाचे पाणी आत आले आणि ते पुस्तक पूर्ण भिजून खराब झाले. ही चूक आपलीच आहे, असा विचार करून लिंकन थेट पुस्तकाच्या मालकाकडे गेले. त्यांनी घडल्या प्रकाराबद्दल सांगितले आणि पुस्तकाची नुकसानभरपाई म्हणून शेतात काम करण्याची तयारी दर्शवली. पैसे नसल्यामुळे त्यांनी काही दिवस मेहनत करून त्या पुस्तकाच्या किमतीची परतफेड केली. त्यांच्या प्रामाणिकपणाने आणि जबाबदारीच्या भावनेने सर्व जण प्रभावित झाले.
त्यांची जिज्ञासा केवळ पुस्तकांपुरती मर्यादित नव्हती. त्यांनी कायदा, राजकारण आणि वक्तृत्व यांचा स्वतःच अभ्यास केला. हाच स्वअभ्यास त्यांच्या पुढील आयुष्यातील यशाचा पाया ठरला.
बोध : आयुष्यात मोठे व्हायचे असेल, तर ज्ञानप्राप्तीची तळमळ, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची जाणीव यांना पर्याय नाही.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment