साहित्यिका गिरिजाबाई केळकर यांचा २५ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
आपल्या देशात मातृशक्तीचे भरीव योगदान आहे. मग ते राजकारण असो, समाजकारण असो, क्रीडा असो वा व्यापार... साहित्य क्षेत्रात तर महिलाशक्तीने आपल्या लेखणीद्वारे आणि विचारांद्वारे सतत नवीन विचार, सामाजिक परिवर्तनाची तळमळ आणि स्त्रीशक्तीला ऊर्जितावस्था देण्याचे कार्य केलेले आहे. संत मुक्ताबाई, बहिणाबाई, शांता शेळके अशा अनेक कवयित्री आणि साहित्यकार महिलांनी मराठी साहित्य सामान्य लोकांमध्ये रुजवले आणि फुलवले. असेच एक नाव म्हणजे गिरीजाबाई केळकर. त्यांचे साहित्यकार्य प्रेरणादायी आहे.
गिरिजाबाई केळकर यांचा जन्म १८८६ साली मुंबईत झाला. त्यांचे माहेरचे नाव द्रौपदी बर्वे होते. त्यांचे बालपण आणि शिक्षण गुजरातमध्ये पार पडले. १९०१ साली महादेवराव केळकरांशी विवाह झाल्यानंतर त्या महाराष्ट्रात आल्या. वाचनाच्या आवडीतून गिरिजाबाई केळकरांनी मराठी भाषा उत्तम अवगत केली. दर शुक्रवारी हळदीकुंकवाच्या निमित्ताने त्या स्त्रियांना घरी बोलावून वाचायला शिकवत असत. मासिके-वर्तमानपत्रांमधील गमतीदार मजकूर त्या त्यांना वाचून दाखवत. गिरिजाबाई केसरी वर्तमानपत्राचे संपूर्ण वाचन करत. नंतर त्यांनी लेखनही करायला सुरुवात केली. पतीला न सांगताच त्यांनी एक लेख 'ज्ञानप्रकाश'ला पाठवला. तो संपादकांना पसंत पडून छापून आल्यावर त्यांनी नियमितपणे लेख पाठवायला सुरुवात केली. अशा प्रकारे त्यांचा लेखनप्रवास सुरु झाला. गिरिजाबाईंनी विपुल व वैविध्यपूर्ण लेखनातून समाजात आपले स्थान प्रस्थापित केले. त्यांचे लेखन विशेषतः स्त्री-जीवन, दुःख आणि संघर्ष यांचा प्रवास सांगणारे होते. सन १९३१मध्ये लिहिलेल्या 'संसार सोपान' या पुस्तकाच्या प्रास्ताविक प्रकरणात दिलेले काव्य, स्त्रीच्या भूमिका आणि महत्त्वाचे दर्शन घडवते :
“गृहिणी गृहाची शोभा। गृहिणी सुखाचा गाभा।
गृहिणी आनंदाचा ठेवा। ऐशी गृहिणी लाभे तो भाग्यवंत देवा॥”
गिरिजाबाईंच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सामान्य जीवनातील घटकांच्या आधारावर लिहिलेले आहे. त्यांचे निबंध, कथा आणि नाटके घरगुती जीवनावर आधारित होती. त्यांच्या लेखनातून ठाम विचार आणि समाजाच्या प्रगतीसाठी सकारात्मक विचारसरणी दिसते. त्यांच्या लेखनात सुगृहिणी व सुगरण होण्याची प्रेरणा दिसते. महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या बाबतीत त्यांनी केलेले मार्गदर्शन लक्षात घेतल्यास त्यांचे योगदान लक्षात येईल. गिरिजाबाईंनी स्त्री-शिक्षण, संस्कार आणि आंतरपारिवारिक संबंधांचे महत्त्व लक्षात घेतले आणि त्यावर आधारित अनेक साहित्यरचना केल्या. त्यांनी मनोरंजन, ज्ञानप्रकाश आणि खानदेश वैभव अशा विविध तत्कालीन नियतकालिकांमध्ये लेख लिहिले. तसेच पुरी हौस फिटली, अंगठीचा प्रभाव, स्वभावचित्रे, पुष्पहार, स्त्रियांचा स्वर्ग अशा कादंबऱ्या आणि कथासंग्रहांमधून घरगुती आणि सामाजिक जीवनावर प्रकाश टाकला. गिरिजाबाईंनी स्त्री-शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले. 'द्रौपदीची थाळी' ही आत्मवृत्तपर कादंबरी त्यांचे विचार आणि स्त्री-जीवनाचे अत्यंत सूक्ष्म निरीक्षण आहे. त्यामध्ये पतिपरायण स्त्रीचे साधे, सुंदर आणि जिव्हाळ्याने भरलेले चित्र आहे.
१९२८मध्ये मुंबईत आयोजित नाट्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष झाल्या. त्यांच्या लेखनाने आणि समाजकार्यातील योगदानाने त्यांनी त्या काळातील महिला साहित्यकारांमध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले. गिरिजाबाई केळकर यांचे जीवन आणि लेखन आजही त्या काळातील स्त्री-समाजाची दुरवस्था आणि त्यांच्या संघर्षाचे प्रतीक मानले जाते. अशा या प्रेरणादायी साहित्यिकेचा आपला ठसा आजही समाजावर आहे आणि त्यांची कार्ये व विचार आधुनिक स्त्री-समाजासाठी महत्त्वाचे आहेत. स्त्रीच्या जीवनातील जटिलता, तिचे दुःख आणि तिचा संघर्ष मांडणारी एक अनोखी लेखिका म्हणजे गिरिजाबाई केळकर. त्यांचे लेखन केवळ एक कलेचे माध्यम नव्हे, तर एका संपूर्ण समाजाला जागरूक करणारा आवाज होता. गिरिजाबाईंनी समाजाच्या मानसिकतेत परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला. 'गृहिणी घराची शोभा' या काव्यपंक्तीपासून ते 'द्रौपदीची थाळी'सारख्या आत्मकथेपर्यंत त्यांचे प्रत्येक शब्द स्त्री-जीवनाच्या अनेक पैलूंना अधोरेखित करतात. २५ फेब्रुवारी १९८० रोजी त्यांचे निधन झाले.
अशा या थोर लेखिकेला वंदन!
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment