संत गाडगेबाबा - अमृत महाराष्ट्र

संत गाडगेबाबा

लोकजागृती करणारे आधुनिक मराठी संत गाडगेबाबा यांचा २३ फेब्रुवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

संत गाडगेबाबा मुख्य फोटो
मुख्य फोटो

संत गाडगेबाबा म्हणजे थोर आधुनिक मराठी संत आणि समाजसुधारक. २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील शेणगावमध्ये त्यांचा जन्म झाला. डेबूजी झिंगराजी जाणोरकर हे त्यांचे संपूर्ण नाव.

त्यांना लहानपणापासूनच भजन-कीर्तनाची आवड होती. समाजसुधारणा व लोकशिक्षणासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. ते निरक्षर असले, तरी त्यांची भाषा सर्वसामान्यांच्या हृदयाला जाऊन भिडणारी होती. गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशाच्या काही भागांसह त्यांनी महाराष्ट्रात कीर्तने करून लोकजागृती केली. भजन­कीर्तनांतून प्रश्नोत्तररूपी संवाद हे त्यांच्या कीर्तनांचे वैशिष्ट्य होते. चोरी करू नये, तसेच चैन, देवाची यात्रा, दिवसवार हे प्रकार कर्ज काढून करू नये, देवा-धर्माच्या नावाने नवससायास करू नयेत, यासाठी मुक्या प्राण्यांचा बळी देऊ नये, शिवाशीव पाळू नये, दारू पिऊ नये, हुंडा देऊ-घेऊ नये, आई-वडिलांची सेवा करावी, भुकेल्याला अन्न द्यावे, मुलांना शिकवल्याविना राहू नये, असे समाजप्रबोधनाचे विषय त्यांच्या कीर्तनांमध्ये प्रामुख्याने असत. ‘गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा’ असा गजर ते मुद्द्याच्या शेवटी करत आणि त्यात श्रोत्यांनाही सामील करून घेत.

अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे व एक काठी (सोटा) असा त्यांचा वेश असे. त्यामुळे ते गाडगे महाराज, गाडगेबाबा, गोधडे महाराज या नावांनीही प्रसिद्ध होते. काही भागांमध्ये ते चिंधेबुवा, लोटके महाराज, चापरेबुवा, वट्टीसाधू या नावांनीही परिचित होते. लोकजागृतीसाठी प्रवास करत असतानाच अमरावतीजवळ २० डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले. वांद्रे (मुंबई) येथील पोलीस केंद्रात आठ नोव्हेंबर १९५६ रोजी झालेले त्यांचे गाजलेले कीर्तन अखेरचे ठरले. अमरावतीमध्ये येथे समाधी आहे.

गाडगेबाबा हे लोकजागृती करणारे संत म्हणून ओळखले जातात. अंधश्रद्धा, जातिभेद, अस्वच्छता आणि अनिष्ट रूढी यांविरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढा दिला; परंतु त्यांचा हा संघर्ष संस्कृतीविरोधी नव्हता, तर भारतीय समाजाची नैतिक व आध्यात्मिक मुळे जपून समाजसुधारणा करणे ही त्यांची भूमिका होती. म्हणूनच, त्यांनी धर्म, परंपरा किंवा सांस्कृतिक सातत्य यांचा संपूर्ण निषेध न करता त्यातील विकृतींवर प्रहार केला.

गाडगेबाबांनी जातिभेद, अस्पृश्यता अशा समाजातील दोषांचे निर्मूलन करण्यासाठी संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांच्या भक्तिपरंपरेचा आणि कीर्तनाचा आधार घेतला. अस्पृश्यता निवारणाचे काम करताना कुठल्याही जातीला शिव्याशाप न देता, त्यांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले आणि माणसांतच देव पाहण्याची शिकवण दिली. देवळातला देव आणि माणसांतला देव यातील फरक त्यांनी स्पष्ट केला. गरजूंना मदत करण्याचा संदेश त्यांनी दिला.

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 23-02-2026 News publication date | Time: 11:28 AM News publication time | Views: 56 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 23-02-2026 News publication date | Time: 11:28 AM News publication time | Views: 56 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement