२६ फेब्रुवारी या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या व्यापक कार्याचा अल्प परिचय...
विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर. क्रांतिसूर्य भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर! या नावातच तेज आहे. त्यांचे नुसते नाव ऐकले तरी आपल्या मनात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी केलेल्या अतुलनीय बलिदानाच्या कथा डोळ्यांसमोर येतात. २६ फेब्रुवारी हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांच्या व्यापक कार्यकर्तृत्वाचा अल्प परिचय करून देणारा हा लेख.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी नाशिकपासून काही अंतरावर असलेल्या भगूर या गावी झाला. थोरले गणेश आणि सर्वांत धाकटे डॉ. नारायण हे त्यांचे दोन भाऊ होते. सावरकरांचे शिक्षण भगूर, नाशिक, पुणे आणि मुंबई येथे एलएलबीपर्यंत झाले. पुढे बॅरिस्टर ही पदवी त्यांनी लंडनला जाऊन घेतली. अगदी लहानपणापसून सावरकरांचा वाचनाकडे ओढा होता. त्यात विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला, रामायण-महाभारत, विविध बखरी आणि इतिहासग्रंथ, तसेच मोरोपंत, वामन इत्यादींचे काव्यग्रंथ अशा साहित्याचा समावेश होता. संस्कृत साहित्याचाही त्यांचा अभ्यास चांगला होता. विविध वृत्तपत्रांच्या वाचनातून देश-विदेशांतील परिस्थितीचे तल्लख भानही त्यांना येत गेले होते. सावरकर हे वृत्तीने कवी होते आणि लहान वयापासून त्यांचे वक्तृत्वही उत्तम होते. १८९७ साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीत इंग्रज सैनिकांनी घरोघरी जाऊन तपासण्या करताना नागरिकांवर जे अत्याचार केले, त्याचा सूड घेण्यासाठी चापेकर बंधूंनी या तपासण्यांवर देखरेख करणारा पुण्याचा कमिशनर रँड याचा खून केला. चापेकर बंधूंना फाशी देण्यात आले. त्यांच्या बलिदानाचा सावरकरांच्या मनावर खोल ठसा उमटला आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा देण्याचा निश्चय केला. १८९९मध्ये सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी त्यांनी ‘राष्ट्रभक्त समूह’ हे गुप्त मंडळ स्थापन केले. तरी आपली चळवळ सामान्य लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून त्यांनी जानेवारी १९००मध्ये ‘मित्रमेळा’ची स्थापना केली.
त्यांच्या या चळवळीतून अनेक निष्ठावंत कार्यकर्ते जोडले गेले. शिवजयंती उत्सव, गणेशोत्सव, मेळे यांच्या माध्यमातून लोकजागृती घडवून आणणाच्या प्रयत्न मित्रमेळाने केला. सावरकरांनी ठिकठिकाणी मित्रमेळ्याच्या शाखा उभारून स्वातंत्र्यासाठी सशस्त्र उठाव करण्याची तयारी असलेल्या तरुणांचे व्यापक जाळे निर्माण केले. पुढे १९०४मध्ये या मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ या संस्थेत झाले. क्रांतिकारक म्हणून ‘जोसेफ मॅझिनी’ या इटालियन देशभक्ताचा आदर्श त्यांच्यासमोर होता. त्याचप्रमाणे आयर्लंड आणि रशियातील क्रांतिकारकांचेही सावरकरांना आकर्षण होते. गनिमी काव्याचे धोरण, सैन्यात व पोलिसांत गुप्त क्रांतिकारकांची भरती करणे, रशियासारख्या परराष्ट्रांशी गुप्त संधान बांधणे, इंग्रजी सत्तेच्या केंद्रांवर आणि प्रतिनिधींवर हल्ले करणे, शस्त्रास्त्रे साठवणे इत्यादी मार्ग अवलंबून इंग्रजांना पुरते सळो की पळो करून सोडावे, असे सावरकरांना वाटत होते. मित्रमेळ्याचे काम करत असताना सावरकरांचे लेख, कविता असे साहित्य ठिकठिकाणी प्रसिद्ध होत होते आणि प्रभावीही ठरत होते.
पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी विदेशी कपड्यांची होळी केली होती. परिणामतः त्यांना दंड भरावा लागला आणि महाविद्यालयाच्या वसतिगृहातून काढून टाकण्यात आले. एलएलबी झाल्यानंतर लंडनमध्ये बॅरिस्टरीचे शिक्षण घेण्यासाठी नऊ जून १९०६ या दिवशी सावरकरांनी लंडनकडे प्रयाण केले. लंडनमध्ये असलेले क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे त्यांना हे शक्य झाले. लंडनमध्ये असताना सावरकरांनी साहित्यनिर्मिती, प्रकट चळवळी आणि समारंभ, गुप्त क्रांतिकार्य या माध्यमातून कार्य सुरू केले. लंडनमधील आपल्या प्रकट स्वरूपाच्या कार्यासाठी ‘फ्री इंडिया -सोसायटी’ची स्थापना करून त्या संस्थेतर्फे शिवोत्सव, १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा महासोहळा, श्रीगुरूगोविंदसिंग यांचा जन्मदिवस, विजयादशमीचा उत्सव असे विविध उत्सव सावरकरांनी घडवून आणले. लंडनला सावरकरांबरोबर असलेले सेनापती बापट यांनी बाँब तयार करण्याचे तंत्र काही रशियन क्रांतिकारकांच्या साह्याने जाणून घेतले होते. ही माहिती भारतात क्रांतिकारकांच्या विविध केंद्रांवर पाठवण्यात आली होती. पुढे वसई येथे बाँबचा कारखाना काढण्यात आला. सावरकरांनी काही पिस्तुले मिळवून तीही भारतात पाठवली होती. ब्रिटिशांच्या दडपशाहीचा एक भाग म्हणून बाबाराव सावरकर यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. त्यांची सारी मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनीच ‘अभिनव भारत’चे एक सदस्य मदनलाल धिंग्रा यांनी एक जुलै १९०९ रोजी भारतमंत्र्याचे स्वीय सहायक कर्झन वायली यांचा लंडनमध्ये गोळ्या झाडून खून केला. याच्या निषेधार्थ पाच जुलै रोजी लंडनच्या ‘कॅक्स्टन हॉल’ मध्ये भरलेल्या सभेत सावरकरांनी निषेधाच्या ठरावाला विरोध केला. ठरावावरच्या भाषणात 'न्यायालयीन निर्णय होण्यापूर्वीच धिंग्रांना गुन्हेगार ठरवणे हे न्यायालयाच्या अधिकारांवर अतिक्रमण होते,' असा युक्तिवाद सावरकरांनी वृत्तपत्रांना पत्र पाठवून केला. सावरकरांच्या हालचालींमुळे त्यांना बॅरिस्टरीची सनद मिळण्यातही अडचणी उत्पन्न झाल्या होत्या.
अहमदाबाद येथे व्हाइसरॉयवर बाँब टाकण्याच्या प्रकरणात त्यांचे धाकटे बंधू नारायणराव सावरकर यांनाही अटक झाली होती. या सुमारास त्यांना न्यूमोनियाही झाला. त्यातून बरे झाल्यावर ते पॅरिसला गेले. तेथे ते भिकाजी रुस्तुम कामा यांच्याकडे राहिले. दरम्यानच्या काळात नाशिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याचा खून झाला. या वधासाठी वापरलेली पिस्तुले सावरकरांनी भारतात पाठविलेल्या पिस्तुलांपैकी असल्यामुळे हे सर्व प्रकरण सावरकरांपर्यंत पोहोचले. त्यानंतर तेथे सावरकरांच्या नातेवाईकांचा आणि सहकाऱ्यांचा पोलिसी छळ सुरू झाला. या परिस्थितीत पॅरिसला राहून अटक टाळण्यापेक्षा लंडनला जाऊन अटक होण्याचा धोका आपण पत्करावा असे त्यांनी ठरवले. १३ मार्च १९१० रोजी त्यांना अटक झाली. पुढे चौकशीसाठी त्यांना भारतात नेले जात असताना त्यांनी समुद्रात उडी घेतली आणि ते मार्सेलिसच्या किनाऱ्यावर फ्रेंच हद्दीत आले. परंतु त्यांचे हे साहस कामी आले नाही. सावरकरांना हिंदुस्थानात आणून त्यांच्यावर दोन खटले चालवण्यात आले. जॅक्सनच्या वधाला साह्य केल्याचा, तसेच अन्य काही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. २४ डिसेंबर १९१० आणि ३० जानेवारी १९११ रोजी या दोन्ही खटल्यांचा निकाल लागून सावरकरांना पन्नास वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यांची सगळी मिळकतही जप्त करण्यात आली. सावरकरांना चार जुलै १९११ रोजी अंदमानात नेण्यात आले. काथ्या वळणे, कोलू फिरवणे अशी अतिशय कष्टाची कामे त्यांना तुरुंगात करावी लागली. तिथल्या हालअपेष्टांमुळे त्यांचे शरीर खंगत गेले. अंदमानातील राजबंद्यांना संघटित करून त्यांनी त्यांच्या काही मागण्यांची तड लावली. बंदिवानांमध्येही त्यांनी अभ्यासाची आवड उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना साक्षर बनवण्याचे कार्यही त्यांनी तेथे केले.
१९२१मध्ये सावरकरांना अंदमानामधून हिंदुस्थानात आणण्यात आले आणि रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. सावरकरांची १९२४मध्ये दोन अटींवर तुरुंगातून मुक्तता करण्यात आली - रत्नागिरी जिल्ह्यात ते स्थानबद्ध म्हणून राहतील आणि पाच वर्षे राजकारणात सहभागी होणार नाहीत. जवळपास साडेतेरा वर्षे सावरकर रत्नागिरीत होते. या काळात त्यांनी अस्पृश्यता निवारण, धर्मांतर करून गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेणे, भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धी या चळवळी केल्या. अस्पृश्य व उच्चवर्णीय यांच्यात सामाजिक समरसता व्हावी म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न केले. अस्पृश्यांना मंदिर प्रवेशबंदी असल्यामुळे त्यांनी भागोजीशेठ कीर या दानशूर सद्गृहस्थाकडून १९३१ साली सर्व हिंदूंसाठी प्रवेश असलेले पतित पावन मंदिर बांधून घेतले. धर्मांतरितांना पुन्हा हिंदू धर्मात सन्मानपूर्वक प्रवेश देऊन त्यांनी त्यांची लग्ने हिंदू समाजात लावून देण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यासाठी आर्थिक साह्यही केले.
१० मे १९३७ रोजी सावरकरांची बिनशर्त मुक्तता करण्यात आली. त्यानंतर ते हिंदू महासभेत गेले आणि त्या पक्षाचे नेतृत्वही त्यांच्याकडे आले. सावरकरांनी हिंदू महासभेतर्फे निःशस्त्र प्रतिकाराचे दोन लढे दिले : भागानगर आणि भागलपूर. सावरकर सनदशीर मार्गांनी आपल्या चळवळी चालवत होते. तरी सशस्त्र लढ्यावरचा त्यांचा विश्वास ढळला नव्हता. इंग्रजांविरुद्ध अखेरची लढाई सशस्त्र लढायची वेळ आली, तर आपल्या भारतीय तरुणांना सैनिकी शिक्षण असणे आवश्यक आहे, ही त्यांची स्पष्ट भूमिका होती. ‘अखंड, एकात्म हिंदुस्थान’ हेच त्यांना अभिप्रेत होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, याचा त्यांना आनंद झाला. परंतु देशाची फाळणी झाली, देशाचे तुकडे झाले, याचे त्यांना खूप दुःख झाले. फाळणीनंतर हिंदूंवर झालेले अत्याचार, रक्तपात यांनीही ते व्यथित आणि संतप्त झाले होते. या भावना त्यांनी उघडपणे व्यक्त केल्या. त्याचदरम्यान १९४८ साली महात्मा गांधींची हत्या झाली. त्यात सावरकरांचा सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली. परंतु नंतर त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. १९४९मध्ये घटना समितीकडे त्यांनी तीन सूचना केल्या : देशाचे नाव भारत ठेवावे, हिंदी ही राष्ट्रभाषा करावी आणि नागरी लिपी ही राष्ट्रलिपी करावी.
१९६६मध्ये त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यांनी प्रायोपवेशन करून जीवनाचा अंत करण्याचे ठरविले. २६ फेब्रुवारी १९६६ रोजी मुंबई येथे त्यांचे देहावसान झाले. सावरकर हे प्रखर हिंदुराष्ट्रवादी होते. उत्कट काव्य आणि साहित्यनिर्मितीमुळे ते अजरामर आहेत. सागरा प्राण तळमळला, अनादी मी अनंत मी, जयोस्तुते अशा अनेक कविता, रानफुले (१९३४) हा काव्यसंग्रह, त्यातील ‘कमला’ हे खंडकाव्य, काही स्फुट काव्ये, माझी जन्मठेप हा आत्मचरित्रपर ग्रंथ , माझ्या आठवणी (जन्मापासून नाशिकपर्यंत), भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने (२ खंड) आणि शत्रूच्या शिबिरात हे त्यांचे अन्य काही उल्लेखनीय ग्रंथ होत. मला काय त्याचे? किंवा मलबारांतील मोपल्यांचे बंड आणि काळे पाणी या त्यांच्या दोन कादंबऱ्या. उःशाप (१९२७), संन्यस्त खड्ग (१९३१) आणि उत्तरक्रिया (१९३३) ही त्यांनी लिहिलेली नाटके. त्यांच्या इंग्रजी ग्रंथांत वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स, १८५७, हिंदुपदपादशाही, हिंदुराष्ट्र दर्शन, हिस्टॉरिक स्टेटमेंट्स आणि लेटर्स फ्रॉम द अंदमान (जेल) यांचा समावेश होतो. मुंबईत १९३८मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धी यांचे महत्त्व सांगितले होते. १९४३मध्ये सांगली येथे भरलेल्या नाट्यशताब्दी महोत्सवाचे ते अध्यक्ष होते. त्याच वर्षी त्यांना नागपूर विद्यापीठाकडून डी. लिट. ही सन्माननीय पदवी देण्यात आली.
सावरकर यांच्यावर जितके लेखन करावे तेवढे थोडे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान समजायला, त्यांच्या लेखणीचा अर्थ कळायला एक जन्म पुरे पडेल, असे वाटत नाही. अशा विश्वरत्नाला त्रिवार वंदन!
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment