वि. वा. शिरवाडकर - अमृत महाराष्ट्र

वि. वा. शिरवाडकर

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिन आणि मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) या निमित्ताने त्यांच्या साहित्यप्रवासाचा धावता आढावा...

वि. वा. शिरवाडकर मुख्य फोटो
मुख्य फोटो

'पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा,' 'वेडात मराठे वीर दौडले सात,' 'सुंदर साजिरा श्रावण आला,' 'किनारा तुला पामराला...', 'उठा उठा चिऊताई' अशा हृदयस्पर्शी कविता ऐकल्या, की आठवतात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज... सिद्धहस्त कवी, कथाकार, नाटककार व कादंबरीकार. त्यांचे लेखन मराठी साहित्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणारे होते. २७ फेब्रुवारी या त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठीला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे; पण मराठी भाषा अभिजात आहे ती कुसुमाग्रजांसारखे प्रतिभावान कवी आणि साहित्यिकांमुळेच. कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्यप्रवासाचा हा धावता आढावा.

विष्णू वामन शिरवाडकर असे त्यांचे पूर्ण नाव. ते कुसुमाग्रज या टोपणनावाने काव्यलेखन करत. २७ फेब्रुवारी १९१२ रोजी पुण्यात त्यांचा जन्म झाला, तर शिक्षण नाशिकमध्ये झाले. बीए झाल्यावर १९३४ ते १९३६ या काळात ते चित्रपट व्यवसायात होते. पुढे १९४९पर्यंत पुणे, मुंबई व नाशिक येथील विविध नियतकालिकांमध्ये संपादक म्हणून त्यांनी काम केले. नंतर ते नाशिकला स्थायिक झाले. काही पाठ्यपुस्तकांचे संपादनही त्यांनी केले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी सत्याग्रह केला होता.

जीवनलहरी (१९३३), विशाखा (१९४२), किनारा (१९५२), मराठी माती (१९६०), स्वगत (१९६२), हिमरेषा (१९६४) व वादळवेल (१९७०) हे त्यांचे काही प्रकाशित काव्यसंग्रह. विशाखा हा त्यांचा काव्यसंग्रह म्हणजे आधुनिक मराठी काव्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. कवीच्या क्रांतिप्रवण आणि विजिगीषू मनोवृत्तीचा व ध्येयवादी प्रीतीचा भव्य व उदात्त कल्पनाचित्रांनी व संपन्न शब्दांनी केलेला स्फूर्तिदायक आविष्कार त्यातील विविध कवितांतून आढळतो. ‘अग्निसंप्रदायी काव्य’ या नावाने एक परंपराच नंतर मराठी काव्यात निर्माण झाली. त्यांची कविता संघर्षातून अवतरते. 

'विशाखा'नंतरची त्यांची कविता अधिक अंतर्मुख होऊन सामाजिक संघर्षाबरोबरच मानसिक व तात्त्विक संघर्षाकडे वळली. वाढत्या वयाबरोबर कवीच्या अंतर्जीवनाशी सतत एकरूप होऊन वाढत जाणारी कविता दुर्मीळ असते. कुसुमाग्रजांचे काव्य या अर्थाने अनन्यसाधारण आहे. केशवसुतांच्या क्रांतिकारक काव्याशी त्यांचे लेखन साधर्म्य आढळते. आधुनिक काव्य हा कुसुमाग्रजांच्या चिंतनाचाही विषय असून, त्यांनी काही मार्मिक काव्यसमीक्षात्मक निबंधही लिहिले आहेत.

शिरवाडकरांच्या स्वतंत्र नाटकांत दुसरा पेशवा (१९४७), कौंतेय (१९५३), आमचं नाव बाबुराव (१९६६), ययाती आणि देवयानी (१९६६), वीज म्हणाली धरतीला (१९७०), नटसम्राट (१९७१) यांचा समावेश होतो. दूरचे दिवे (१९४६), वैजयंती (१९५०), राजमुकुट (१९५४), ऑथेल्लो (१९६१) व बेकेट (१९७१) ही त्यांची उत्कृष्ट रूपांतरित नाटके आहेत. प्रकृतीने गंभीर व रचनाशिल्पाच्या दृष्टीने रेखीव व निर्दोष असलेल्या त्यांच्या नाटकांत प्रभावी व्यक्तिमत्त्वांच्या अंतःकलहाचे सखोल दर्शन घडते. मार्मिक नाट्यदृष्टी, काव्यात्म भाषाशैली व स्वतंत्र आशयानुकूल रचनातंत्र या गुणामुळे प्रयोगदृष्टीनेही त्यांची नाटके यशस्वी झाली आहेत. 

१९७४मध्ये त्यांच्या नटसम्राट या त्यांच्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव (१९४६), जान्हवी (१९५२) व कल्पनेच्या तीरावर (१९५६) या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांच्या कथासंग्रहांत फूलवाली (१९५०), सतारीचे बोल आणि इतर कथा (१९६८), काही वृद्ध, काही तरुण (१९६१), प्रेम आणि मांजर (१९६४) व निवडक बारा कथा (१९६८) यांचा अंतर्भाव होतो. काव्यात्मता व विचारप्रेरकता हे त्यांच्या कथासाहित्याचे विशेष होत. कालिदासाच्या मेघदूताचे मराठी रूपांतर (१९५६), समिधा (१९४७) हा मुक्तकाव्यांचा संग्रह, आहे आणि नाही (१९५७) हा लघुनिबंधसंग्रह, तसेच काही बालकथा व बालगीते यांचाही समावेश त्यांच्या लेखनात होतो. अन्य मराठी कवींचे काही काव्यसंग्रहही त्यांनी संपादित केले आहेत. १९६४मध्ये गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि काळाराम मंदिर सत्याग्रहात सहभाग घेतला होता. अशा या थोर साहित्यिकाचे १० मार्च १९९९ रोजी निधन झाले. 

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 27-02-2026 News publication date | Time: 01:55 AM News publication time | Views: 276 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 27-02-2026 News publication date | Time: 01:55 AM News publication time | Views: 276 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement