डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त (एक मार्च) त्यांच्या जीवनकार्याचा संक्षिप्त आढावा...
दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती - समाजात खरंच अशी काही माणसे असतात, जी आपला संपूर्ण जन्म समाजसेवेसाठी आणि लोककल्याणासाठी अर्पण करतात. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी. एक मार्च या त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा...
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे एक मार्च १९२२ रोजी नानासाहेबांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्यात चारशे वर्षांपासून समाजप्रबोधनाच्या कार्याची परंपरा आहे. त्यांचे मूळ आडनाव शांडिल्य असे होते. दर्यासारंग आंग्रे यांनी धर्माधिकारी ही पदवी दिली. तेव्हापासून त्यांचे नाव धर्माधिकारी असे पडले आणि त्यांनी त्या नावाला समर्पक असे कार्य केले. धर्मजागृतीसाठी कार्य करताना श्री बैठकीची संकल्पना अमलात आणली. १९४३ साली रेवदंडा येथे ‘श्रीसमर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती’ स्थापन केली. बैठकीत होणार्या अध्यात्माचा प्रसार आज जगभर चालू आहे. मराठी भाषेतून बैठका सुरू झाल्या. आज हिंदी, तामीळ, बंगाली, कन्नड या भाषांतूनही निरूपण केले जाते. सुरुवातीच्या बैठकांमध्ये केवळ महिला आणि पुरुषच असत; मात्र त्यानंतर याचा प्रभाव इतका वाढला की बालोपासनासुद्धा सुरू केली गेली. आज खूप मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार झालेला आहे. अध्यात्माचे धडे देऊन नानांनी सामान्यजनांना योग्य दिशा दाखवली आहे. मार्गदर्शन केले आहे. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, अज्ञान, स्त्रियांवरील अत्याचार, जातिभेद अशा समस्यांवर नानांनी आपल्या संस्कारांनी समस्या निराकरण केले आहे.
अध्यात्माचे धडे देताना नानासाहेबांनी शेकडो खेडी, गावे, वनवासी भाग व्यसनमुक्त केला. त्या भागात संस्काराचे बीज पेरून समाजाची प्रगती केली. या कार्यासाठी त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने (मरणोत्तर) गौरवण्यात आले. संतांच्या वाङ्मयाच्या आधारावर शिकवण देऊन त्यांनी जनजागृती केली. आपल्या सामाजिक आणि देशाच्या ऋणांची जाणीव करून देताना नेहमी ते म्हणत, की 'देशाने मला काय दिले यापेक्षा मी देशाला काय दिले, हे पाहणे जास्त महत्त्वाचे.' मनुष्य ही एकच जात आहे आणि मानवता हा एकच धर्म आहे, असे ते मानत. त्यांच्या संस्कारातून त्यांनी राष्ट्रीय एकात्मता आणि एकता निर्माण केली. समाजात परिवर्तन करायचे असेल, तर संतांचे विचार समाजात सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजेत असा त्यांचा ठाम विश्वास होता. यासाठी यांनी भारतीय समाजरचनेचा, संस्कृतीचा, परंपरांचा, चाली-रूढी-प्रथांमधील त्रुटींचा आणि मर्यादांचा बारकाईने अभ्यास केला होता.
नानासाहेबांची व्यापक व अभूतपूर्व शिकवण सर्वदूर पोहोचवण्यासाठी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने गरजू मुलांना नि:शुल्क साहित्याचे वाटप, आदिवासी लोकांना जातीच्या दाखल्याचे वाटप, आदिवासी जनतेला शिधापत्रिका वाटप, माळीण दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, संजय गांधी उद्यानात कुरण व्यवस्थापन, अनेक ठिकाणी पाणपोया, गारंबी धरणाचे गाळ काढण्याचे काम करून जनतेच्या विकासात मदत केली व सामाजिक सुधारणा केली. पर्यावरणाचे संतुलन साधले जावे म्हणून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान पर्यावरण संरक्षण, संवर्धन, संतुलन टिकवण्यासाठी कार्य करत आहे. त्यासाठी त्यांनी वृक्षारोपण, झाडे लावा झाडे जगवा, ग्रामस्वच्छता अभियान, तलाव आणि विहिरी यातील गाळ काढणे अशा अनेक उपक्रमांचे आयोजन केले. भविष्यात पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी या उपक्रमामार्फत जनजागृती केली जाते. होळकरवाडी, लोणावळा, माणगाव, पनवेल, मुरुड, ठाणे, माथेरान येथे वृक्षारोपण केले. इतकेच नव्हे, तर त्याचे संवर्धनदेखील केले. पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज आहे हे अचूकपणे जाणून सर्वांना वेळोवेळी वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. शहरी आणि ग्रामीण भागातील, तसेच डोंगराळ भागातील सर्वसामान्यांना उत्तम आरोग्यसेवा प्रदान करण्यासाठी प्रतिष्ठानातर्फे वेळोवेळी नि:शुल्क आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते. औषधांचा नि:शुल्क पुरवठादेखील केला जातो. सुशिक्षित असूनही समाजात विविध अंधश्रद्धा, अज्ञान, अनिष्ट रूढी, अघोरी परंपरा पाळल्या जातात. म्हणून डॉ. नानासाहेबांनी अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केले. अज्ञानापोटी अंधश्रद्धेच्या कचाट्यात अडकलेला समाज त्यांनी स्वत: पाहिला होता. संतपरंपरेची शाश्वत शिकवण एकदा अंतरी रुजली, की मनुष्य बुद्धिवादी निरीक्षक होतो. प्रत्येक परिस्थितीकडे तो डोळसपणे बघतो. स्वत:च्या संकटावर मात करण्याची ताकद या संस्कारातून मिळते. नानासाहेबांनी सात दशकांपूर्वी आरंभलेली श्री बैठकीची व्यवस्था आजही सुरळीत चालू आहे. या बैठकीतून लोकांना आत्मिक, धार्मिक पाठबळ मिळाले आहे. त्यांच्या कार्याने अनेकांना प्रेरणा मिळाली आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटावा असे त्यांचे योगदान आहे. आठ जुलै २००८ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांना आणि त्यांच्या कार्याला शतश: प्रणाम!
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment