दादोजी कोंडदेव - अमृत महाराष्ट्र

दादोजी कोंडदेव

दादोजी कोंडदेव यांच्या स्मृतिदिनानिमित्त (सात मार्च) त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा...

दादोजी कोंडदेव मुख्य फोटो
मुख्य फोटो

दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणात त्यांचे पालक, शिक्षक आणि मार्गदर्शक होते. त्यांचा जन्म १५७७ साली झाला. दादोजी कोंडदेव हे मूळचे पाटस परगण्यातील गावाचे कुलकर्णी होते. शहाजीराजांच्या पुणे जहागिरीवर देखरेख ठेवण्यासाठी खुद्द शहाजीराजांनी विश्वासाने नेमलेले ते एक विश्वासू कारभारी होते. 

दादोजीसुद्धा आदिलशहाचे चाकर होते. ते कोंढाणा किल्ल्याचे (सध्याचा सिंहगड) सुभेदार होते. आदिलशाही सरदार मुरारपंत याने इ. स. १६३०च्या दरम्यान पुण्यावर हल्ला करून सर्वत्र जाळपोळ केली व पुणे उद्ध्वस्त केले. गाढवाचा नांगर फिरवला. त्यामुळे पुणे ओसाड पडले. पुंड-पाळेगार मनमानी करू लागले. सर्वत्र अराजक माजले. त्यातच इ. स. १६३१मध्ये पुण्यात भीषण दुष्काळ पडला. अशा कठीण प्रसंगी सर्व मुलूख पुन्हा लागवडीखाली आणण्याचे आणि पुण्याच्या कारभाराची चोख व्यवस्था ठेवण्याचे काम दादोजी कोंडदेव यांनी केले. पुण्यातील भीषण परिस्थिती पाहून दादोजी कोंडदेव यांनी अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. शेतकऱ्यांचे उत्पन्न चांगले होत नाही तोपर्यंत त्यांच्याकडून शेतसारा घेतला नाही. त्यानंतरही शेतसारा घेण्याची पद्धत बदलली. शेतकऱ्याच्या शेतात जेवढे उत्पादन होत होते, त्याच प्रमाणात त्याच्याकडून शेतसारा घेतला गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. त्यांनी जंगली प्राणी आणि लुटारू यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्व नागरिकांना शस्त्रे दिली. 

त्यांनी आणखी एक पद्धत अमलात आणली. ती म्हणजे शेतकऱ्याकडून सारा घेण्याच्या कामी मावळे कामावर ठेवले, जेणेकरून त्यांच्या हातालाही काम मिळाले आणि त्यांचा उदरनिर्वाह होऊ लागला. अशा प्रकारे विजापूरच्या आदिलशाहीने जे पुणे शहर उद्ध्वस्त केले होते, ते पुणे दादोजी कोंडदेव यांनी पुन्हा वसवले. दादोजींनी तेथील रानटी जनावरांचा बंदोबस्त केला, शेतीला प्रोत्साहन दिले आणि गावे पुन्हा वसवली. दादोजी कोंडदेव कडक शिस्तीसाठी आणि न्यायप्रियतेसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी शेतीसाठी जमिनीच्या करात सवलती देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यांनी शिवरायांच्या निवासासाठी पुण्यात लाल महाल बांधून घेतला. याच कारणाने शहाजीराजे भोसले यांनी जेव्हा जिजाऊसाहेब आणि बालशिवबांना पुण्यात पाठवले, तेव्हा त्यांच्या देखरेखीची जबाबदारीही दादोजी कोंडदेव यांच्यावर सोपवली होती. ते शहाजीराजांचे अत्यंत विश्वासू आणि प्रामाणिक कारभारी म्हणून ओळखले जात. दादोजी कोंडदेव यांनी शिवरायांना प्रशासन, न्यायदान आणि शस्त्रास्त्रविद्येचे प्राथमिक शिक्षण दिले. ते ज्याप्रकारे घोड्यावर मांड ठोकत त्याप्रमाणे कोणालाही जमत नसे. हे तंत्र त्यांनी शिवबांना शिकवले. १६३६पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे जवळपास १३ वर्षे ते शिवरायांच्या सोबत होते. दादोजी कोंडदेव यांचा मृत्यू सात मार्च १६४७ रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी झाला. (काही ठिकाणी १६४९ सालाचा उल्लेख आहे.) त्यांच्या निधनानंतर शिवरायांनी पुणे जहागिरीचा पूर्ण ताबा स्वतःकडे घेतला. 

छत्रपती शिवाजी महाराज हे एक अलौकिक तेज होते. परंतु ज्याप्रमाणे प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण दैवी अवतार असतानाही त्यांना गुरूंकडून विद्या शिकावी लागली त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांसारख्या हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम राजमाता जिजाऊ, तसेच दादोजी कोंडदेवांसारख्या गुरूंनी केले. अशा या उत्तम पैलू पाडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. अशा थोर राजाला आणि त्यांच्या थोर गुरूंना शतश: प्रणाम!

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 07-03-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 78 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 07-03-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 78 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement